Saturday 30 March 2013

रानडे इन्स्टिट्यूट : लायब्ररी । आजची रद्दी व उद्याचा काळ

ही नोंद पक्षपातीपणाने केलेली आहे. पण हा कोणाचं नुकसान करणारा पक्षपातीपणा नाही. एका अर्थी भावनिक भूमिका घेऊन होत असलेली ही नोंद आहे. शिवाय, त्यात 'रेघे'संबंधी एक मुद्दा आहेही, पण त्यावर स्पष्टपणे काही बोलता येणार नाही.
***

ह्या नोंदीची सुरुवात आजच्या 'लोकसत्ते'मधे गिरीश कुबेरांनी 'आठवावं असं काही...!' या शीर्षकाखाली 'बुक-अप!' या त्यांच्या सदरामधे लिहिलेल्या लेखातून झाली. हॅरॉल्ड इव्हान्स यांच्या 'गुड टाइम्स, बॅड टाइम्स' या पुस्तकाबद्दल कुबेरांनी लिहिलंय. आपण पुस्तक वाचलेलं नाही, पण हा लेख मुळातून वाचता येईल.

आपला विषय थोडा वेगळा आहे.

या लेखात कुबेर सुरुवातीला एक असं म्हणतात : मग पुण्यात पत्रकारितेची पदवी घेत असताना रानडे इन्स्टिट्यूटच्या वाचनालयात हॅरॉल्ड इव्हान्स यांचं हे पुस्तक हाताळायला मिळालं. चांगली पुठ्ठ्याच्या बांधणीची काळ्या कागदावर सोनेरी अक्षरानं नावं लिहिलेली प्रत होती. अत्यंत आदरणीय अशी. त्या पुस्तकाला हात लावला तरी लेखकाचं वजन कळेल अशी. वाचायचा प्रयत्न केला, पण फारसं काही तेव्हा त्यातलं कळलं नाही.

आणि शेवटाकडे एक असं म्हणतात : वर्तमानपत्र जरी एक दिवसापुरतं असलं तरी चांगला, लिहिता संपादक काळाला पुरून उरतो तो असा..
***


रानडे इन्स्टिट्यूटच्या ज्या लायब्ररीचा उल्लेख कुबेरांच्या लेखात आलाय, त्या संदर्भात तिथे शिकून गेलेल्या एका विद्यार्थ्याने आपल्याकडे एक मजकूर आधी पाठवलेला. तो आपण आज इथे नोंदवूया. वाचनाच्या सोईसाठी बहुधा इथे ओळी मोडलेल्या असाव्यात, पण हा गद्य मजकूर आहे.


लायब्ररी : एक
लायब्ररीत पेपर खूप पडलेत
रद्दीचे गठ्ठेच्या गठ्ठे
प्रत्येक महिन्याचा गठ्ठा सुतळीने बांधलेला
फक्त कामापुरते लोक आता ते गठ्ठे सोडतात
त्यातल्या बातम्या नाहीतर फोटो कापतात
आणि स्वतःच्या कामाला घेऊन जातात
पण बाकी त्या पेपरांकडे कोणाचं लक्ष नाही
म्हणजे लक्ष देऊन उपयोग नाहीच म्हणा
त्याच्यात सगळ्या शिळ्या बातम्या
म्हणजे छापल्या तेव्हा शिळ्या नव्हत्या
पण मग हळूहळू शिळ्या होत गेल्या
आता रोज नवंनवं काहीतरी घडतंच की
मग काहीतरी जुनं होणारच की

ते पेपर लायब्ररीत पडलेत म्हणून
नाहीतर रद्दीवाल्याकडे तरी गेले असते
पण आता ते इथे साठून ऱ्हाणार
ह्या लायब्ररीची परंपराच आहे ती
अनेक गोष्टी साठवून ठेवायच्या
मग त्या कामाच्या नसल्या तरी
कित्येक पुस्तकं, ज्ञानकोश, विश्वकोश, डिक्शनऱ्या
पीएचडीचे थिसीस, डेझर्टेशनं असं सगळं
जुनाट लाकडी कपाटांमध्ये
तिथे धूळ खात पडलंय
पेपरसुद्धा धूळ खातात
पण त्यांना कपाटात ठेवलेलं नाही
एका कोपऱ्यात पडून ते कपाटांबाहेरची धूळ खातात

पावसाळ्यात एक कुत्रा येतो
आणि त्या गठ्ठ्यांवर झोपतो
इतर वेळी तो बाहेर कुठेही झोपतो
पण पावसाळ्यात इथे येतो
आणि शांतपणे त्या पेपरांवर झोपतो
तसे पावसाळ्यात ते गठ्ठे कुबट होतात
पण कुत्र्याला त्या कुबटपणाचा फारसा त्रास होत नसावा
कारण तो शांतपणे त्या पेपरांवर झोपलेला असतो.
(रविवार, २४ जानेवारी २०१०)
***



लायब्ररी : दोन
लायब्ररीच्या दगडी भिंती
त्या भिंतींमधे
शंभर वर्षं बसून राहिलेले
अनेक दगड
प्रत्येक दगड वेगवेगळा
वेगवेगळा ओबडधोबडपणा असणारा

ऊन पाऊस वारा
अनेक वेळा आले नि गेले
दगड आपले जसेच्या तसे
जागच्या जागी
दगडांवर साचलेत
धुळीचे कण
असंख्य कण म्हणता येणार नाहीत
कारण मोजायचे तर मोजता येतील
पण काम अवघड होईल
आणि मोजून उपयोग काय

दगडांवरच्या त्या धुळीच्या कणांमध्ये
अनेक शब्दांचे कण
माणसांच्या तोंडून बाहेर पडलेले
मोबाईलमधून बाहेर पडलेले
पुस्तकांमधून बाहेर पडलेले
वेगवेगळ्या अर्थांनी वापरलेले
एकमेकात अडकून
धुळीत एकत्र झालेले
अनेक शब्दांचे कण

प्रत्येक दगडाच्या ओबडधोबडपणात
अडकलेला ओबडधोबड अर्थ
कधी कधी दिसणारा
पण दिसला तरी
अस्पष्ट दिसणार
सपाट स्पष्टता नाही

दगडांना हात लावला की
हाताला धूळ लागते
धूळ झटकली की
शब्द खाली पडतात 
(७ फेब्रुवारी २०१०)
***


एका कादंबरीतला ओबडधोबड मजकूर :

दगडी इमारतीच्या मागच्या बाजूच्या भागात लायब्ररीची छोटी जागा आहे. चौकोनी काचांची दारं असलेली पंधरा बुटकी जुनाट लाकडी कपाटं – तीन जरा मोठी लोखंडी कपाटं – कपाटांमधून एक छोटासा बोळ – उजवीकडे वळून एक दगडी पायरी – डावीकडे एक छोटीशी खोली – तिथे जरा मोठं टेबल, चारपाच खुर्च्या – एका कोपऱ्यात एक बंद लाकडी दार – दगडी पायरीच्या उजवीकडे थोडा लांब बारका बोळ – डावीकडच्या भिंतीत मोठ्या लाकडी चौकोनी धुरकट काचांच्या खिडक्या – त्याच भिंतीत लांबच्यालांब काळा कडाप्पा लावलेला टेबलासारखा वापरायला – बाकी इकडेतिकडे सातआठ खुर्च्या – तिकडेइकडे आठसात पेपर – वरती एक बंद एक चालू असे दोन पंखे – पंख्यांच्या वर आणि उरलेल्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये कोळीष्टकं.

२००८चा ऑगस्ट होता. आणि तो डिपार्टमेन्टच्या अंधाऱ्या लायब्ररीत. बाहेर पाऊस पडेल असं वातावरण होतं. बाहेरच्या झाडांच्या फिकट सावल्या कडाप्प्यावर. लोकसत्ता – सकाळ – इंडियन एक्सप्रेस – प्रभात – नवाकाळ – टाईम्स ऑफ इंडिया – नवभारत टाईम्स – केसरी – महाराष्ट्र टाईम्स – डीएनए – हिंदुस्तान टाईम्स – फ्री प्रेस जर्नल – एशियन एज – हिंदू -  हे पेपर त्या दिवशीचे वाट्टेल तसे पसरलेले. दुपारी तीनपर्यंत ते खूपच अस्ताव्यस्त होऊन जातात. जुन्या पेपरांची उंच रद्दी कडाप्प्याच्या एका कोपऱ्यात.
----------
‘इकॉनॉमिस्ट’मधे वाचकांच्या पत्रव्यवहारात चे गव्हेराला एकाने bloodthirsty satan म्हटलेलं. एवढं काय गरज नव्हती. पण ठिकाय. इकॉनॉमिस्टसुद्धा शेवटी एक वर्तमानपत्रच होतं, आठवड्याला येणारं. दोनशे रुपये किंमतीत बारका अंक. गुडलक चौकातल्या स्टॉलवर किती अंक संपतात माहीत नाही. पण लायब्ररीत एक अंक न चुकता येतो, पांढऱ्या फोल्डरमधून.

इकॉनॉमिस्ट – टाईम – साधना – आऊटलूक – इंडिया टुडे – न्यूजवीक – फ्रंटलाईन – समाज प्रबोधन पत्रिका – अर्थबोध पत्रिका – नॅशनल जिऑग्राफिक – असे कित्येक अंक. वाचणारे वाचतात, न वाचणारे वाचत नाहीत. लायब्ररी आहे म्हणून असं नाही पण पत्रकारितेचा आणि वाचनाचा संबंध आहे असं एक आपलं म्हणण्यासारखं होतं. पण तसं म्हणण्यात अर्थ नव्हता, तरी दसनूरकर तसं म्हणतात.

काहीही असलं तरी हे असं सगळं लायब्ररीत येऊन साठत होतं. तो चे गव्हेराला शिव्या घालणारा अंक असाच कधीतरी २००८च्या पावसाळ्यातल्या एका महिन्यातल्या कुठल्यातरी आठवड्यातला. असं सगळं येऊन साठत होतं. काही नंतर कधीतरी रद्दीतपण जात असेल. काही कोणी घरी नेत असेल ते तिकडे. बाकी उरलेलं सगळं धुळीसारखं लायब्ररीत.

चांगलं आहे पण. लायब्ररीची ही सगळी धूळ आणि बाकी सगळं हे चांगलंच आहे. म्हणजे इकॉनॉमिस्ट, टाईमवाले एकाच बाजूचा बोंगा वाजवतात किंवा असा प्रत्येक छापील गोष्टीचा एकेक एकतर्फी बोंगा असतो हे सगळं खरंच. पण तरी लायब्ररी शांत आहे.
-----------

तो लायब्ररीत चाललेला. आत गेल्यावर उजवीकडच्या काचेच्या कपाटात एक 'एम. एन. रॉय' नाव एम्बॉस केलेला निळं बाईन्डिंग, कव्हर गेलेला खंड आहे, त्याची जागा कधीही हलत नाही, पण लक्ष जाईल एवढा आणि असा तो गप तिथे असतो. त्याच्यावर आडवं नेमकं आज संजय संगवईचं 'द रिव्हर अँड लाईफ' आहे, आकाशी रंगाचं, आकडे – मुद्दे – नर्मदेचं पाणी – धरण. त्याच्या बाजूला उभं गिचमिडीत अक्षरात नाव लिहिलेलं कुठल्यातरी कम्युनिकेशन थियरीचं पुस्तक आहे. अशा पुस्तकांची प्रचंड गिचमिड त्या कपाटात आहे, पण ती सोडून इतर पुस्तकं थोडी मधेच उपटलेली आहेत. खालच्या कप्प्यातल्या डाव्या कोपऱ्यात 'इंडिया – अ मिलियन म्युटिनीज नाऊ' असं व्ही. एस. नायपॉल सांगत होता आणि त्यातल्या मधल्या प्रकरणातून आधीचा सुरुवातीचा नामदेव ढसाळ म्हणाला की, 'स्वातंत्र्य हे कोणत्या गाढवीचं नाव आहे'. त्याच कप्प्यात खरं म्हणजे फिडेल कॅस्ट्रोचं छोटं ते 'माय अर्ली इयर्स'सुद्धा आहे. असायला काय कुठेही काहीही असू शकतं. 'अर्ली इयर्स'ला प्रस्तावना 'वन हन्ड्रेड इयर्स'च्या मार्खेजची. समोर गुलाबी सन्मायका लावलेल्या टेबलावर लोकसत्ता आणि एशियन एज एकमेकांशेजारी.

त्याने होते ते दोन पेपर घेतले नि तो आत गेला. आधीच कोणी ना कोणी येऊन वेगवेगळे पेपर आणलेले, ते होते कडाप्प्यावर, काही नीट घड्या, काही विस्कटलेले. बाकी अजून आतमधे कोणी नव्हतं. तो बसला. समोर खिडकीतून विचित्र प्रकाश, बाहेर हलणारी झाडं. थोडा वारा आला तेव्हा त्या कोपऱ्यातला पडायला आलेला एक पेपर पडला. खिडकीला लागलेली कोळ्याची जाळी हलली. ऊन हललं. थंड थोडं.
***

Tuesday 26 March 2013

थँक्स मायकल । रेघ : एक टप्पा

'झेड कम्युनिकेशन्स' ही मॅसेच्युसेट्स (अमेरिका) इथली माध्यमसंस्था तुमच्या माहितीची असेल तर तुम्हाला लगेच हे सांगायला हरकत नाही की, 'रेघे'वर आता 'झेड-नेट' व 'झेड-मॅगझिन' या दोन प्रकाशनांमधला मजकूर योग्य ते सौजन्य दाखवून आपण प्रकाशित करणार आहोत, त्यासाठी आवश्यक परवानगी आपण त्यांच्या संपादकांकडून घेतलेली आहे. त्यांचे सह-संस्थापक व सह-संपादक मायकल अल्बर्ट यांनी 'रेघे'ला ही परवानगी देत असल्याचं कळवलंय, त्यामुळे आता अधूनमधून त्यांच्या मदतीने आपण काही मजकूर इथे नोंदवू. हा मजकूर कोणाचा असू शकतो, तर रॉबर्ट फ्रिस्क, नोम चोम्स्की, जॉन पिल्जर या नि अशाच काही महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मंडळींचा असू शकतो. हे लोक 'झेड-नेट'हून 'रेघे'द्वारे आपल्यापर्यंत आता अधिकृतरित्या पोचू शकतील.

केवळ एका लहानशा ई-मेलला सहज प्रतिसाद देत मायकल यांनी 'रेघे'ला त्यांच्या प्रकाशनांमधले लेख मराठीत अनुवादित करण्याची परवानगी दिली, त्याबद्दल आपण आधी मायकल यांना 'थँक्स' म्हणूया. स्वतःच्या नावावर पंधराएक प्रकाशित पुस्तकं असलेल्या मायकल यांनी केवळ परवानगीच दिली असं नव्हे तर 'आमच्यासाठीही ही मोठी गोष्ट असेल' असं म्हटलं. एकूण चांगलं झालं.


मायकल अल्बर्ट आणि लिडिया सार्जन्ट या दोघांनी १९८६मधे 'झेड कम्युनिकेशन्स'ची स्थापना केली. तेव्हाच त्यांनी 'झेड मॅगझिन' या मासिक नियतकालिकाचीही सुरुवात केली. त्यानंतर १९९५ साली 'झेड-नेट', १९९८ साली 'झेड व्हिडियो' असा या संस्थेचा प्रवास होत आलेला आहे. याशिवाय 'झेड-बुक्स' असाही त्यांचा उपक्रम आहे. थोडक्यात सांगायचं तर, माध्यमांच्या बाजारापासून अंतर राखून चालणाऱ्या पर्यायी माध्यमांच्या प्रवाहांची गरज भागवण्याचे अनेक प्रयत्न जगभर सुरू असतात, त्यातला 'झेड कम्युनिकेशन्स' हा एक प्रयत्न आहे.




'झेड-नेट' व 'झेड-मॅगझिन' या दोन्ही ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणापासून माध्यमांच्या व्यवहारापर्यंत विश्लेषणाच्या पातळीवरचा मजकूर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होतो. अनेक मुलाखती, लेख यांच्या मदतीने जागतिक घडामोडींच्या प्रकाशात न येणाऱ्या बाजू 'झेड'च्या माध्यमातून वाचकांपुढे आणल्या जातात हे कोणीही तपासून घेऊ शकतं. मोठ्या प्रमाणावर स्वतंत्रपणे काम करणारी पर्यायी माध्यमांची एक व्यवस्था 'झेड-कम्युनिकेशन्स'वाल्यांची आहे.

'रेघे'पुरतं आपण 'झेड-नेट' व 'झेड मॅगझिन' यांनी प्रकाशित केलेला मुख्यत्त्वे माध्यमांसंबंधीचा मजकूर मराठीमधे अनुवादित करू, असं सध्या ठरवलंय. यात काही प्रमाणात जागतिक घडामोडींमधले काही इतर दृष्टिकोन वाचकांपुढे ठेवायलाही त्यांची मदत होईल. पण त्यांच्याकडून इथे येणारा मजकूर मुख्यतः माध्यमांविषयीचा असेल. आणि 'झेड'मधले लोक डाव्या विचारसरणीकडे झुकलेले आहेत, हे वाचक म्हणून काहींच्या लक्षात येऊ शकेल, किंवा या नोंदीमधे चिकटवलेल्या त्यांच्या 'लोगों'मधील विधानंही काही 'विरोध', 'बदल' अशा गोष्टींबद्दल बोलू पाहातायंत. कदाचित संस्थात्मक पातळीवर मोठी रचना करायला अशी विधानं आवश्यक असतील, पण 'रेघे'वर आपण असं काही करत नाही.



'रेघे'साठी काही मजकूर तयार करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर काही लोकांशी बोलून आपण अनेक प्रयत्न केले, पण त्यात काही फारसं जमून आलं नाही. आता 'झेड-कम्युनिकेशन्स'शी ही एक ढोबळ सहकार्याची बोलणी पक्की झाल्यामुळे वेगळा मजकूर येण्याच्या पातळीवर 'रेघे'ला मदत होईल. अधिक वेगळे दृष्टिकोन वाचकांपर्यंत पोचवण्याच्या प्रवासात एक वेगळा टप्पा आता येईल, असं दिसलं म्हणून आणि मायकल यांचे विशेष आभार मानणं आवश्यक आहे म्हणून ही नोंद.

Friday 22 March 2013

कादंबरीकार । पत्रकार । अनिरुद्ध बहल

अनिरुद्ध बहल
शेजारच्या या फोटोकडे पाहून हा माणूस कसा असेल असं तुम्हाला वाटतं? कोणीतरी साधा भोळा इसम दिसतोय हा तर. एका अर्थी हा इसम साधा असला तरी तितकासा भोळा नाही, हे आपल्याला कळू शकतं. पण त्यासाठी या इसमाच्या कामाची तपासणी करावी लागेल.

सध्याचं 'तेहेलका' साप्ताहिक जेव्हा केवळ वेबसाइटच्या रूपात सुरू होतं तेव्हा त्यांनी संरक्षण मंत्रालयातला भ्रष्टाचार उघडकीस आणला. त्यामध्ये जे मुख्य दोन पत्रकार सामील होते त्यातले एक अनिरुद्ध बहल आणि दुसरे मॅथ्यू सॅम्युअल. २००१ साली हे 'स्टिंग ऑपरेशन' करण्यात आलं. 'ऑपरेशन वेस्ट-एन्ड' या नावाने ते गाजल्याचं काहींना आठवत असेल. अस्तित्त्वातच नसलेला शस्त्रांचा प्रकार अस्तित्त्वात नसलेल्या शस्त्रनिर्मिती कंपनीकडून विकत घ्यावा, यासाठी या दोघांनी तेव्हाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधील मंडळींच्या गाठीभेटी घेतल्या. अर्थात, शस्त्र आणि कंपनी हे दोन्ही बनावट आहे याची काडीचीही कल्पना न आल्यामुळे लाच स्वरूपात पैसे घेऊन हा व्यवहार वरकरणी होऊन गेला. आणि त्यातून संरक्षण मंत्रालयातला भ्रष्टाचार उघड झाला. हे सगळं गुप्त कॅमेऱ्यांमधे रेकॉर्ड झाल्यामुळे पुढे भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष बंगारू लक्ष्मण, समता पक्षाच्या अध्यक्षा जया जेटली (तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निकटवर्तीय), काही सैन्याधिकारी या सगळ्यांचा कमी-अधिक बोऱ्या वाजत गेला. दहा वर्षांनी २०११मधे लक्ष्मण यांना दोषी घोषितही करण्यात आलं. हा व इतर तपशील आता अनेकदा चर्चिला गेला आहे.

आपण ह्या 'स्टिंग ऑपरेशन'चा उल्लेख केला तो अनिरुद्ध बहल यांच्या संदर्भात आणि त्यांच्याबद्दल आणखी काही खुलासा व्हावा यासाठी. याच अनिरुद्धनी पुढे संसदेत प्रश्न विचारण्यासाठी कसा पैसा घेतला जातो याबद्दलचं 'स्टिंग ऑपरेशन'ही (ऑपरेशन दुर्योधन, २००५) केलं. या 'कॅश-फॉर-क्वेश्चन' प्रकरणात अकरा खासदारांना आपली खासदारकी गमवावी लागली. हे ऑपरेशन अनिरुद्धनी 'कोब्रा पोस्ट' या त्यांनी २००३ साली सुरू केलेल्या वेबसाइटच्या माध्यमातूनच केलं होतं.

आता आपण २०१३ सालामधे आलो. आठवड्याभरापूर्वी याच अनिरुद्धनी काय केलं तेही कदाचित तुमच्या वाचनात आलं असेल. अगदी थोडक्यात सांगायचं तर, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक या बँकांमधल्या अधिकाऱ्यांकडे एका राजकीय नेत्याचा एजन्ट असल्याचं भासवून 'कोब्रा-पोस्ट'चा प्रतिनिधी गेला व त्याने आपल्याकडची काळ्या पैशाच्या रूपातली नकद रक्कम पांढऱ्या रूपात आणण्यासाठी काय करता येईल, याची विचारणा केली. त्यावर या बँकांमधल्या अधिकाऱ्यांनी आपली सर्वसामान्य खातेधारकांसाठी असलेली प्रक्रिया धाब्यावर बसवून चाललेल्या व्यवहारांची माहिती या 'एजन्टा'ला दिली आणि पॅन कार्डापासून कुठल्याच फुटकळ गोष्टींमधे न अडकवता आपण काळ्या पैशाला पांढरं करण्यासाठी कशी मदत करू शकतो, आपल्या योजनांमधे कसे पैसे गुंतवता येतील, बेनामी खातं कसं काढता येईल, याचा पाढा वाचला. हा पाढा म्हणजे आत्ताचं 'ऑपरेशन रेड स्पायडर'. यासंदर्भात काही बातम्या येऊन आता हे प्रकरण शांत झालेलं दिसतंय. संस्थात्मक पातळीवर जेव्हा मोठ्या प्रमाणातल्या पैशाचा व्यवहार (अफरातफरीचाही) असेल तेव्हा ग्राहकाची पुरेशी तपासणी न करता, केवायसी (नो युवर कस्टमर) नियमावली धाब्यावर बसवून व्यवहार केले जातात का? की, 'कोब्रा पोस्ट'ने उघडकीस आणलेले व्यवहार सुट्या घटना म्हणूनच झाल्या आहेत आणि संस्थात्मक प्रक्रियेतली छुपी पद्धत म्हणून त्यांचा संबंध जोडता येणार नाही? असे काही प्रश्न यातून विचारले जाऊ शकतात. यावर 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने (आरबीआय) कालच आपलं उत्तर दिलेलं आहे. या तीनही बँकांचा संस्थात्मक पातळीवर अशा व्यवहारामधे सहभाग नसल्याचं 'आरबीआय'ने स्पष्ट केलंय. काही व्यवहारांच्या पातळीवरच्या आरोपांवरून या बँकांमधे प्रक्रियात्मक भ्रष्टाचार असेल हे सिद्ध होत नाही, इत्यादी युक्तिवाद यासंदर्भात 'आरबीआय'ने केलेला आहे. त्यामुळे आता हे प्रकरणच वरकरणी संपल्यात जमा आहे. या प्रकरणात गुंतलेल्या अधिकारी वर्गावर निलंबनाची कारवाई झाल्याच्याही बातम्या येऊन गेल्या आहेत.

यानिमित्ताने खरोखरच्या सामान्य असलेल्या नागरिकांच्या मनात काही प्रश्न येऊ शकतात : एप्रिल २०११मधे भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरोधात 'दुसरं स्वातंत्र्ययुद्ध' झालं होतं, त्याचं नेतृत्त्व आता कुठे असेल? एकूण गुंतागुंत गृहीत धरली तरी राजकीय क्षेत्राच्या तुलनेत कॉर्पोरेट क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराविरोधात बोलणं कमी का असतं? मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी हे प्रकरण फारसं उचललं का नसावं?
***

आता आपण नोंदीच्या दुसऱ्या भागात मुख्यत्त्वे अनिरुद्ध बहल या इसमाभोवतीच काही बोलणार आहोत.

'ऑपरेशन रेड स्पायडर'संबंधी मराठीतून आलेल्या बातम्यांमधून आपल्याला काय समजू शकतं?

तर,

'सकाळ'च्या मते 'कोब्रा पोस्ट' हे एक मासिक आहे आणि अनिरुद्ध बहल हे त्यात काम करणारे पत्रकार आहेत.

'लोकसत्ते'च्या मते, हा एका वृत्त-संकेतस्थळाचा प्रमुख असलेला कोणीतरी पत्रकार आहे. ('कोब्रापोस्ट.कॉम' या वृत्तविषयक संकेतस्थळाचा प्रमुख असलेल्या अनिरुद्ध बहल या पत्रकाराने राजधानीत बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत आपण संबंधित बँकांच्या शाखांचे अनेक तासांचे चित्रीकरण केल्याचाही दावा केला.)

'महाराष्ट्र टाइम्स'च्या बातमीत ''कोब्रा पोस्ट'चे पत्रकार अनिरुद्ध बहल हे एका राजकीय नेत्याचे एजंट म्हणून या बॅंकांकडे गेले होते. त्यांनी काही ब्लॅक मनी व्हाइट करण्याची विनंती केली. तेव्हा पॅन किंवा केवायसी (नो युवर कस्टमर) क्रमांकाची मागणी न करता त्यांचे पैसे बँकेत स्वीकारले गेले. त्यातूनच या रॅकेटचा पर्दाफाश झाला' असं म्हटलंय.

या बातम्या तपशिलातून वाचता येतीलच. आणि त्यातील गोंधळही स्पष्ट होईल. एक तर, 'सकाळ'च्या संदर्भात 'कोब्रा पोस्ट' हे मासिक नाही हे स्पष्ट करावं लागेल. 'लोकसत्ते'ने 'पीटीआय'च्या बातमीचं भाषांतर केलंय, त्यातून अनिरुद्ध बहल हा कोणीतरी नवखा पत्रकार असल्याचं वाटू शकतं. आणि 'महाराष्ट्र टाइम्स'च्या बातमीत तपशिलाच्याच काही चुका आहेत. उदाहरणार्थ, ''केवायसी' क्रमांक' असली काही गोष्ट अस्तित्त्वात नाही, इत्यादी. भाषेबद्दल काहीच बोलायला नको.

वृत्तसंस्थेकडून आलेल्या बातम्या उप-संपादकीय पातळीवर भाषांतरित करताना प्रत्येक बातमीचा विषय आपल्याला मुळातून माहीत असण्याची शक्यता नाही, हे मान्य केलं तरी एकदम वेगळ्या विषयावरच्या बातमीचा तपशील इंटरनेटवर पाच मिनिटांच्या योग्य शोधाद्वारे थोडा अधिक पक्का करता येऊ शकतो, हे तत्त्व सांभाळलं तर आपलं काम करायलाही मजा येते आणि वर्तमानपत्राची किंमत देणाऱ्या वाचकांची किंमतही ठेवली जाते हे उप-संपादकीय मत नोंदवून पुन्हा अनिरुद्ध बहल नावाच्या कादंबरीकार-पत्रकाराकडे वळूया.

पहिली गोष्ट, अनिरुद्ध बहल यांच्यासंबंधी अत्यंत तपशिलावर लेख इंग्लंडच्या 'इंडिपेंडन्ट'मधे वाचता येईल.

आता तुम्ही 'न्यूजलाँड्री'वरच्या मुलाखतीचा हा व्हिडियो पाहू शकता :


अनिरुद्ध बहल हा माणूस मूळचा कादंबरीकार. 'बंकर थर्टीन', 'द एमिसरी' अशा त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत आणि त्या आपण वाचलेल्या नाहीत. तरी त्यांच्या मूळचा कादंबरीकार असण्याचा आणि त्यांच्या पत्रकारितेचा गंमतीशीर संबंध आहे, असं तेच म्हणतात म्हणून ही नोंद.

आपण आधी नोंदवलेल्या 'कॅश फॉर क्वेश्चन' प्रकरणात अनिरुद्धनी खासदारांना विचारण्यासाठी दिलेल्यातले उदाहरणादाखल दोन प्रश्न कसे होते पाहा :

1) Has the Railway Ministry placed any order for purchase of the Yossarian Electro Diesel engine from Germany? Is the ministry aware that the Tom Wolfe committee report in Germany has halted its induction into the Eurorail system?

कच्चं भाषांतर : जर्मनीकडून योसेरियन इलेक्ट्रो डिझेल इंजिन विकत घेण्यासंबंधी कोणता व्यवहार रेल्वे मंत्रालयाने केला आहे का? हे इंजिन युरोपीय रेल्वे यंत्रणेमधे सामावून घेण्याची प्रक्रिया जर्मनीतल्या टॉम वूल्फ समितीने सादर केलेल्या अहवालामुळे खंडित झाल्याची कल्पना मंत्रालयाला आहे का? 

2) Has the government given sanction for the seed trial of Salinger Cotton of Monsanto? If so, has a report been prepared on Catch-22 cotton so far?

कच्चं भाषांतर : मोन्सान्तो कंपनीच्या सॅलिंजर कापसाच्या बियाण्याच्या चाचणीला सरकारने परवानगी दिली आहे का? जर असेल, तर कॅच-२२ कापसासंबंधीचा अहवाल तयार झाला आहे का?

या प्रश्नांमधे अनिरुद्ध बहलांमधला कादंबऱ्यांचा वाचक सर्जनशील होतो. 'कॅच २२' ही गाजलेली अमेरिकी कादंबरी, तिच्यातला कॅप्टन युसेरियन, कादंबरीकार टॉम वूल्फ, 'कॅचर इन द राय'वाला जे. डी. सॅलिंजर यांची नावं वाट्टेल तशी वापरून हा माणूस त्या वरकरणी निरर्थक प्रश्नांमधे मसाला भरतो. याला आपले खासदार फशी पडले हे विशेष!

हे तपशिलातल्या गंमतीचं उदाहरण झालं, याशिवाय आपल्या कादंबरीकार असण्यातली लेखनाची आवड आणि पोटासाठी कमाईची गरज जिथे भागवता येईल त्या पत्रकारितेत अनिरुद्ध आले असं ते वरच्या व्हिडियो मुलाखतीत सांगतात. कादंबरीकाराच्या कल्पनाविश्वातून त्यांना 'अंडर-कव्हर' गोष्टी शोधायची आवड लागलेय का? कादंबरीकाराच्या विश्वातली रोमहर्षकता ते आपल्या पत्रकारितेतही शोधत असतील का? या रोमहर्षकतेचाच भाग म्हणून आणि लोकांच्या वागण्यातला बनावटपणा बाहेर काढण्यासाठी बनावट मुलाखतकार बनून 'व्ही टीव्ही'साठी त्यांनी (मुख्यत्त्वे) सेलिब्रिटींच्या मुलाखतींचा 'द टोनी बी शो' केला असेल का? कथानक कुठल्याही काळातलं असलं तरी कादंबरी समकालीन संदर्भांच्या संदर्भात लिहिलेली असण्याची शक्यता मोठी असते, हे गृहीतक पुढे ठेवलं तर पत्रकारितेतल्या मूल्यांशी तिची काही प्रमाणात सांगड बसते का?

मजेशीर प्रश्न आहेत.

याशिवाय एक प्रश्न वरती दिलेल्या व्हिडियोत पाहता येईल. 'ऑपरेशन वेस्ट-एन्ड'चं श्रेय मुख्यत्त्वे 'तेहेलका'चे संपादक म्हणून तरुण तेजपाल यांना मिळाल्यासंदर्भात बोलत असताना 'न्यूजलाँड्री'कडून हा प्रश्न येतो : ''अशा वातावरणात सत्त्व असलेल्यांपेक्षा जे स्वतःला बाजारात मांडू शकतात तेच लोक यशस्वी होतात?''

बहल : पण हे जगाच्या सुरुवातीपासूनच अस्तित्त्वात असलेलं तथ्य नाहीये का?

याच प्रश्नात जराशी भर घातली गेल्यानंतर बहल पुढे म्हणतात, ''आता दूरचित्रवाणीवरच्या बातम्यांकडे पाहा. पत्रकारितेतलं अ-आ-ई माहीत नसलेल्या निवेदकांनासुद्धा तिथे महत्त्व दिलं जातं. मी कधी कधी माध्यमशिक्षण देणाऱ्या संस्थांमधे व्याख्यानाला जातो. तिथली परिस्थिती पाहून वाईट वाटतं. बहुतेकांना टीव्हीवर अँकर व्हायचं असतं. त्यांना पत्रकारितेसाठी आवश्यक सचोटी, उत्कट तळमळ, पाच 'डब्ल्यूं'विषयी (का-कधी-कुठे-कसं-कोणी) त्यांना काहीच देणंघेणं नसतं. त्यांना फक्त प्रसिद्ध व्हायचं असतं.''
***

प्रश्न : कादंबरीकाराला / लेखकालाही प्रसिद्ध व्हायचं असतं. पण तो सत्त्वासह प्रसिद्ध होऊ इच्छितो का? म्हणजे सत्त्व सोडून प्रसिद्धीसाठी प्रसिद्धी यापेक्षा कादंबरीकाराला अपेक्षित प्रसिद्धी हे काहीतरी वेगळं असेल का?

उत्तर : माहीत नाही.
***


अनिरुद्ध बहल (फोटो - इथून)

Saturday 16 March 2013

पर्यायी माध्यमं । जॉन पिल्जर

जॉन पिल्जर
जॉन पिल्जर कोण, याची प्राथमिक किंवा तपशिलातली माहिती ज्यांना हवी असेल ती त्यांना त्यांच्या वेबसाइटवर जाऊन सापडू शकेल. तिथे त्यांची पुस्तकं, त्यांनी बनवलेले माहितीपट अशा विविध गोष्टींची माहिती आहे.

इथल्याइथे थोडक्यात सांगायचं तर, १९३९ साली ऑस्ट्रेलियात जन्मलेले पिल्जर इंग्लंडमधे गेली अनेक वर्षं पत्रकार म्हणून वावरतायंत. व्हिएतनामच्या युद्धापासून त्यांनी अनेक युद्धांचं वार्तांकन केलंय. पिल्जर यांनी सुरुवातीला वर्तमानपत्रांमधे काम केलं, शिवाय त्यांना ज्या विषयाचा अधिक खोलवरचा तपशील लोकांसमोर ठेवायचाय त्यासंबंधी ते स्वतंत्रपणे माहितीपटही बनवत आलेत. 'इयर झिरो : द सायलन्ट डेथ ऑफ कम्बोडिया' हा त्यांचा बहुधा पहिला माहितीपट होता. दोन वर्षांमागे त्यांचा 'द वॉर, यू डोन्ट सी' हा माहितीपट गाजला होता. त्यांच्या माहितीपटांचाही तपशील त्यांच्या वेबसाइटवर सापडू शकेल; त्यातील काही तिथे पाहाताही येतील. या शिवाय पिल्जर इंग्लंडमधल्या 'न्यू स्टेट्समन'साठी सदरही लिहितात. 

आपण 'रेघे'वर जी नोंद करतोय ती त्यांनी 'झेड मॅगझिन'ला दिलेल्या मुलाखतीतल्या फक्त तीन प्रश्नोत्तरांची. गेल्या १६ फेब्रुवारीला ती तिथे प्रसिद्ध झाली होती. आता बरोब्बर महिन्याभराने त्यासंबंधी 'रेघे'वर नोंद. वरच्या थोडक्यातल्या ओळखीतूनही वाचकांच्या लक्षात आलं असेल की, मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमधून सांगता न येणाऱ्या गोष्टी पिल्जर सांगू पाहात आहेत. 

एखादं मराठी वर्तमानपत्र फुटपाथवर बसून गजरा विकणाऱ्या व्यक्तीपासून ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीपर्यंत विविध पातळ्यांवर वाचलं जाईल. इंग्रजी वर्तमानपत्र असेल तर विद्यापीठात शिकणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत विविध पातळ्यांवर ते वाचलं जाईल. टीव्ही चॅनलांच्या बाबतीत बोलायचं तर त्यांचाही प्रेक्षक असाच विविध पातळ्यांवर लाखोंच्या संख्येने पसरलेला असेल आणि त्यातून जी माहिती प्रसिद्ध होत राहील, तो माहितीचा मुख्य प्रवाह. कारण अधिकाधिक लोकांना तो सहजी उपलब्ध आहे, तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचतो. या मुद्द्याभोवती मुख्य प्रवाहाचं महत्त्व एकदा आपण निश्चित केलं की मग त्यातल्या त्रुटी काढणं हेही एक महत्त्वाचं काम बनतं. आणि आता माध्यमांची जी रचना आहे त्या रचनेत तर (मुख्य प्रवाहात असलेल्यांना आणि नसलेल्यांनाही) ही जागरूकता अतिशयच आवश्यक आहे हे समजून घेऊन आणि त्यासाठी विविध मतं किमान ऐकून घेण्याची ताकद कमावून आपण पिल्जर यांचं म्हणणं काय आहे ते वाचायचा प्रयत्न करूया. 
***

प्रश्न : तुमची पत्रकारिता गेल्या काही वर्षांमधे कशा प्रकारे बदलल्याचं तुम्हाला जाणवतं? विशेषकरून इंटरनेटची वाढ किंवा अलीकडे गुगल, फेसबुक, ट्विटर यांच्या येण्यानं काही फरक पडला असेल तर तो कसा आहे? तुमच्या स्वतःच्या कामासंदर्भात निश्चित केलेली मूलभूत लक्ष्यं आणि पद्धती यांच्यावर कोणता परिणाम झाला किंवा त्यांच्या परिणामकारकतेवर कोणता परिणाम झाला? 'सोशल नेटवर्किंग'चा उदय आणि त्याचा पत्रकारितेवर आणि माहितीच्या प्रवाहावर पडलेला प्रभाव याकडे तुम्ही कसं पाहता?
पिल्जर : रोज सकाळी मी काही ठराविक वर्तमानपत्रं घ्यायचो. आता मी इंटरनेटवर जातो. हा बदल झालाय. गुगल अर्थातच भन्नाट आहे, पण त्यामधे आणि एखाद्या विषयाचा खोलवर अभ्यास करण्यासाठी गुंतवावा लागणारा वेळ, त्यासाठी आवश्यक असलेली धीर धरण्याची वृत्ती आणि कठोर परिश्रम यांच्यामधे फरक आहे. ट्विटर आणि फेसबुक हे तर मुख्यत्त्वे 'स्वतः'बद्दलच्याच गोष्टी आहेत; त्यातून लोकांना स्वतःशीच बोलता येतं आणि बहुतेकदा स्वतः मूर्ख बनता येतं. खरं तर ते आपल्याला एकमेकांपासून अजून विभक्तही करू शकतात : आणि स्मार्ट फोन, तुटक माहिती, फुटकळ मतबाजी यांच्या बुडबुड्यांच्या जगात आपल्याला गुरफटून टाकू शकतात. (त्यापेक्षा) विचार करणं ही जास्त आनंददायी गोष्ट आहे, असं मला वाटतं.

प्रश्न : मुख्य प्रवाहातील माध्यमांमधे सतत वावर असूनही त्यांच्यावर कठोर टीका करणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात. शिवाय पर्यायी माध्यमांचं समर्थनही तुम्ही जोमाने करत आलायंत. पर्यायी माध्यमांशी संबंधित व्यक्तींचं काय चुकलं असं तुम्हाला वाटतं? या माध्यमांना अधिक लोकांपर्यंत पोचणं न जमण्यामागे, संवादाची अधिक मोठी माध्यमं उभी करता न येण्यामागे काय कारणं असतील? त्यांच्या रचनेत, धोरणांमधे, मजकुरामधे काही घोळ असेल का? त्यात काही सुधारणा हवेय का?
पिल्जर : तुमच्या म्हणण्याशी मी सहमत नाही. 'पर्यायी' माध्यमांनी त्यांचा वाचक/प्रेक्षक निर्माण केलेला आहे, त्यांच्यापर्यंत ती पोचतातही आणि त्याचे काही सकारात्मक परिणामही दिसून आलेत. लॅटिन अमेरिकेत कित्येक वस्त्यांमधल्या लोकांना कम्युनिटी रेडियोचं व्यासपीठ मिळालंय. व्हेनेझुएलामधे 'स्वतंत्र' माध्यमांवर (म्हणजे एकाधिकारशाही असलेल्या माध्यमांवर) ह्युगो चावेझ दबाव आणतायंत असा प्रचार करणारे लोक तिथल्या कम्युनिटी रेडियोच्या अभूतपूर्व वाढीकडे पाहात नाहीत. इक्वेडोर, बोलिव्हिया, अर्जेन्टिनामधेही हेच चित्र आहे. अमेरिकेत 'पॅसिफिका रेडियो' हे याचं खूपच प्रेरणादायी उदाहरण ठरेल. डेनिस बर्नस्टनचे कार्यक्रमही यात धरता येतील. इंटरनेटवर 'झेड-नेट' अनेक लोकांपर्यंत पोचतं. शिवाय टॉम फीलीचं 'इन्फर्मेशन क्लिअरिंग हाउस', 'ट्रूथ-आउट', आणि 'द रिअल न्यूज' अशी अनेक उदाहरणं आहेत.

प्रश्न : भविष्यात अधिकाधिक लोकांपर्यंत टीकात्मक व दूरदर्शी मजकूर पोचेल याच्या कोणत्या शक्यता तुम्हाला दिसतात? असं होण्यासाठी पर्यायी माध्यमांमधे कोणत्या सुधारणा करता येतील किंवा मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना त्यांच्या हेतू आणि तर्कसंगतीविरोधात असूनही चांगलं काम करण्यासाठी भाग पाडता यावं यासाठी काय करावं लागेल?
पिल्जर : तथाकथित मुख्य प्रवाहातील माध्यमं आपल्या तर्कसंगतीविरोधात काहीही करणार नाहीत. प्रस्थापित व्यवस्थेचीच एक पुरवणी म्हणून ती असतात; एडमण्ड बर्कनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ते 'चौथा स्तंभ' वगैरे नाहीत. पण ते अखंडही नाहीत. मी माझी पूर्ण कारकिर्द मुख्य प्रवाहात घालवली. माझी जागा आणि माझा कोपरा जपण्यासाठी मला खूप ऊर्जा खर्च करावी लागली. बहुतेकदा ती शब्दशः लढाई असते. पण मी त्यातून मार्ग काढायला शिकलो, कधीकधी कामाचं ठिकाण बदलूनही ते करावं लागलं. तरुण आणि मूल्य मानणाऱ्या पत्रकारांनी मार्ग काढायला शिकणं आवश्यक आहे.

आत्ता आपल्याला तातडीने काय पाहिजे असेल तर ते म्हणजे 'पाचवा स्तंभ'. कॉर्पोरेट माध्यमांच्या एकाधिकारशाहीला आव्हान देऊ शकणारा, लोकांच्या म्हणण्याला व्यासपीठ देऊ शकणारा, टीव्ही - वर्तमानपत्रं - माध्यम शिक्षण देणाऱ्या संस्था यांच्या उद्ध्वस्ततेवर मात करून उभा राहणारा, पत्रकार आणि पत्रकारिता शिकवणाऱ्या शिक्षकांना आपली बोटचेपी भूमिका सोडण्याचं आवाहन करणारा आणि वेगळी दृष्टी देणारा पाचवा स्तंभ. व्यावहारिक पातळीवरून बोलायचं तर नवीन व स्वतंत्र पत्रकारितेच्या प्रयत्नांना लोकांच्या माध्यमातून निधी पुरवण्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. स्कॅन्डेनेव्हियामधे हे यशस्वी झालेलं दिसतंय.
***




- पिल्जर यांच्या वेबसाइटवर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूच्या पट्टीवर हे सापडतं.

संदेशामधील लपलेले हेतू आणि त्याला वेढून असलेली कल्पितं यांची जाणीव न ठेवता केवळ संदेशवाहक म्हणून पत्रकारांनी स्वतःकडे पाहणं पुरेसं नाही : जॉन पिल्जर
***

Wednesday 13 March 2013

त्या 'गल्ली'च्या निमित्ताने हेन्री कार्तिअर ब्रेसाँ

'गल्ली' (galli.in) हे ऑनलाइन मॅगझिन तुमच्या पाहण्यात आलंय का? नसेल, तर पाहाण्यासारखं आहे.

'Galli is a repository of photo stories from India, made possible by generous contributions from established and emerging photographers from across the world' - अशी इंग्रजीतली या मॅगझिनरूपी छायाचित्र संग्रहालयाची ओळख त्यांनीच करून दिलेली आहे. २०११च्या ऑगस्टपासून सुरू असलेल्या या संग्रहालयात अधूनमधून भर पडत जातेय. भारताशी संबंधित फोटो आणि त्यासंबंधीचा लहानसा मजकूर, अशा स्वरूपात हे काम सुरू आहे.

'माध्यमं' असा एक विभाग आपण 'रेघे'वर करून ठेवलेला आहे. त्यात या 'गल्ली'ची नोंद करून ठेवायला हवी.

फोटोची गंमत अशी की तो पाहिल्यावर आपसूक चित्र उभं राहातं. शब्दांच्या बाबतीत असतं तसं वाचकाला चित्र उभं करायचं काम त्यात नाही. वाचकाच्याऐवजी तिथे प्रेक्षक असतो. तर असं काहीसं काम कमी झाल्यामुळे त्यावर प्रतिसादही तसा संख्येने मोठा येऊ शकतो. आपण 'रेघे'वर तीनेक हजार शब्दांच्या नोंदी टाकून त्या कोण वाचणार आणि त्यावर काय विचार करणार, असं होण्याऐवजी हे फोटोंचं काम अधिक लोकांना पाहायला मजा येऊ शकेल. तेही काही वाईट नाही.

त्यामुळे आत्ता आपण 'गल्ली'बद्दल फार शब्दांमधे बोलण्याऐवजी ज्याला त्याला आपापल्या वेळेच्या सोईनुसार तिथे जाऊन चक्कर टाकून येता येईल एवढ्यापुरती ही नोंद करून ठेवू. आत्ताच्या एक मार्चला त्यांनी विदर्भातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांवरची फोटोमालिका प्रसिद्ध केलेय.
***


'गल्ली'च्या निमित्ताने 'फोटोजर्नलिझम' आणि त्यानिमित्ताने हेन्री कार्तिअर ब्रेसाँ हे साहजिकपणे येणारच.

ब्रेसाँ
फोटो कोणीही काढू शकतं. पण हेन्री कार्तिअर ब्रेसाँ (२२ ऑगस्ट १९०८ - ३ ऑगस्ट २००४) या माणसाने काढलेले फोटो फारच वेगळे. फोटोजर्नलिझममधला हा दादा माणूस ९५ वर्षं पृथ्वी न्याहाळत होता आणि त्यातले काही क्षण आपल्या 'लायका' कॅमेऱ्यात साठवत होता. पहिलं त्याचं एक म्हणणं नोंदवूया :  ''कॅमेरा म्हणजे माझ्यासाठी एकप्रकारची रेखाटन-वही आहे, सहजज्ञान आणि उत्स्फूर्ततेचं एक साधन आहे. कॅमेरा म्हणजे अशा क्षणाचा मास्टर की, जो दृश्यात्मकतेद्वारे एकाच वेळी प्रश्न विचारतो आणि निर्णयही घेतो. जगाला 'अर्थ देण्याच्या' प्रयत्नामधे आपण व्ह्यू-फाइंडरमधून जी फ्रेम निश्चित करतो, त्यात गुंतलेलं असायला हवं. यासाठी एकाग्रता, मनाची शिस्त, संवेदनशीलता आणि भूमितीची समज  हवी. साधनांच्या काटेकोर वापरातूनच आपल्याला भावनांच्या सहजतेपर्यंत पोचता येतं. फोटोग्राफ घेणं म्हणजे.. आपलं डोकं, डोळे आणि हृदय एकाच अक्षात ठेवणं.''
असा अक्ष सापडणं सोपं नाही.


ब्रेसाँच्या गल्लीतला फोटो [फ्रान्स, १९३२ (फोटो : इथून)]

ब्रेसाँचे बरेच फोटो 'मॅग्नम'च्या वेबसाइटवरच्या ब्रेसाँच्या खोलीत जाऊन पाहाता येतील.

''फोटोग्राफी ही एका अर्थी मानसिक प्रक्रिया आहे. आपल्याला काय म्हणायचंय ते स्पष्ट असावं लागतं. आपल्या धारणा काय आहेत, आपल्याला एखाद्या परिस्थितीबद्दल, समस्येबद्दल काय वाटतं, हे स्पष्ट असायला हवं. फोटोग्राफी म्हणजे (ती परिस्थिती) लिहून काढण्यासारखं आहे, तिची चित्रं काढण्यासारखं, रेखाटनं काढण्यासारखं आहे.

फोटोग्राफीमधे सर्जनशील भाग फारच थोडा असतो. चित्रकार तपशील स्पष्ट करू शकतो, लेखकही तसं करू शकतो, पण आपल्याला तो क्षण पकडायला लागतो, तो निर्णायक क्षण, तो असतोच. मी ते पाहिलंय, मी तिथे जाऊन आलोय, मी ते पाहिलंय.'' : असं ब्रेसाँ म्हणून गेले.

शिवाय,

''लोकांचे फोटो काढण्यामध्ये नक्कीच काहीतरी भयानक आहे. एकप्रकारे ते (मर्यादेचं) उल्लंघनच असतं, त्यामुळे त्यात संवेदनशीलता नसेल तर ते असभ्यपणाचं ठरतं'' : असंही ब्रेसाँ म्हणून गेले.

फोटोग्राफी म्हणजे फार काही बोलायला नको. पाहणंच बरं.
***


फोटोग्राफी म्हणजे जगाची 'आय-लेव्हल' पकडणं असतं का?

की, फोटोग्राफी म्हणजे 'मर्यादांचं उल्लंघन' असतं? (फोटो : रेघ)

Monday 11 March 2013

मनोहर ओक : वीस वर्षं

मनोहर ओक : निधन १० मार्च किंवा ११ मार्च १९९३ : त्यानिमित्त 'रेघे'वर नोंद -

दुर्गा भागवत, 'दुपानी'मधे, पान क्रमांक शंभर : 
मन्या ओक वारल्याची बातमी सतीश काळसेकरने दिली. तुकाराम-बीज टाळून मन्या दहा मार्चला, खाणे-औषध वगैरे सोडून स्वेच्छेनेच हे जग सोडून गेला. एक दिवस मध्ये गेला आणि बारा तारखेला मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिका लागली.

आजचा लोकसत्ता, दैनंदिनी प्रकारच्या सदरामधली नोंद : ११ मार्च १९९३ मनोहर ओक यांचे निधन.
***


'झौझंझः' या अनियतकालिकात अंदाजे १९७०च्या सुमारास प्रसिद्ध झालेला मजकूर ('नवाक्षर दर्शन'च्या मदतीने) :
 मनोहर ओक याचा मजकूर

...हे स्थानांची अफरातफर करून राहिलेल्या लेखकांनो! हे लांड्या प्रकाशकांनो! तुमची वेळ भरत चालली; ठेपून चुकली! एक तर तुमचे लांडे उद्योग ताबडतोब बंद करा, नाहीतर - स्वतःच्या पोटव्यासपीठावरून चालवलेली तुमची बडबड, फडफड, चित्-तूप करा- नाहीतर ठोकबंद व्यापार सोडून खुल्ले- रोख आरपार व्हा. नाहीतर जे केलंत त्याबद्दलचं काय? जे न केलंत त्याबद्दलच घ्या! लेखकांचे (अर्थात आधुनिक) लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन बनणे सोडून द्या. पार्ट टाईम जॉब तुम्हाला लांच्छनास्पद आहे. न पेक्षा हेरा! हेरा टिपून एकेक! शिकारी कुत्रे व्हा! सांस्कृतिक मंडळांच्या दलालांनो, पगाराच्या नेच्यावर पुढे डकलणारं तुमचं तट्टू चणे खाऊ द्या. मी म्हणतो चणें! चणचंणित चंद हे बेलपत्रकारांनो, उद्धरा उद्धरा तुमचे सहज अवघ्याची तळी उचला. रडीं, गाणी, गाऱ्हाणीं. चूक, तक्रार आणि विराणीं. हे टुकारांनो! ह्यातून वखारी पिकतात, बुखारी फणफणून द्यात. साजरे होऊ द्यात सण-ताप तुमचे. लेखणीमागे उभे रहा न ढेकणीं. नाहीतर शहाणे व्हा. सिक्युरिटीच्या कडेकोट वेढ्यातील मरण आरास-विचकूं नका कवळी तुमचीं. फोडा तुरुंग नाहीतर हे पाणी तुमच्या नाकातोंडात घुसेल. पायातून गळ्यापर्यंत गळवंड घुसळून येतील भोंवरे. फटाफट कानांचे पडदे फाटतील तुमच्या. टचाटच डोळ्यांची द्राक्षं उडतील नाहीतरी- पाहिजे तर रुद्राक्ष धरा.
***


'अंतर्वेधी' : सुरुवातीचा (पान सात व आठवरचा) मजकूर :

कादंबरी. प्रास प्रकाशन.
मुखपृष्ठ : बाळ ठाकूर
समजा कीं तुम्ही एका हजार पाकळ्या असलेल्या कमळाच्या मध्यभागीं बसलांत. एक एक एकेक पाकळ्यांनी टोकं वळत मोडत-मुडपत मिटत्ये संध्याकाळ. सगळा सांवल्यासांवल्यांचा जमणारा सघन काळोखसमुद्र. वेढणारा अंवतालभंवताल. आणि एकाएकी नादानुसंधान बांधलं जातं, जें असतं तुमच्या जागरतेचं- आवरून बसणारं अवधान वेध घेतं. छिद्रांत जाऊन बुटून मुरूं पाहणारं पाणी. तो सूक्ष्म आवाज. अवघ्या पाण्याचे लोट थोपवून निमूट निमुळतं होऊन अणी एवढ्या छिद्रांत ओपनिंग शोधत सर्वस्व व्यापून टाकणारा गुंजारवभारव.

आणि टक्कन डोळे उघडून तुम्ही बाहेर येतां. एकटक झालेली नजर एकदम पुसली जाते. एकदमच भलत्या प्रदेशांतून भलत्या प्रदेशांत डिपोर्ट केल्यासारखे तुम्ही येऊन पडतां. असं कांहीं दिवस होतं.

पुढं असेच कांही दिवस गेले कीं गुंजारव हळूंहळूं मोठा होणारा. ओंठ मिटून मोठा होणारा फुगा. एक वरल्यावर वावरणारा ढग. निर्लिप्त. कोंडींत प्रेशराइज करणारा आणि - अणी - भुंगा - गाज वाढत, गाजत तुमचं कडबोळं वळून सुरगांठ न सोडवतांच तडक आरपार. तुटकतुटक रेषांचे अनुकार, अनुनाद, दाखव वाजवणारा.

परत येयची खूण तुम्हांला माहीत नसते. तुमच्या गतीची तुम्हाला कल्पनाहि नसते. येतांना भलभलते पदार्थ, वस्तू दिसतात. हांती लागतात. कधींच न पाहिलेल्या वस्तूंचा अजबखाना. एक और तळघर मोकळं झालेलं. लाख सिद्धी-इलमांची भांडारं. जडजड कुलपांच्या अवजड चाव्या. सगळे शिकराव तिथं सुप्त झालेले. एक पसरलेलं वाळवंट. कुठूनहि कुणीकडे रस्ते. सगळ्या निरुद्देश दिशा. चमचमलेले पुंजके. पोरस सफेद, काळे भुजंग, लाल निखर, नीळ-नवले, पिवळेप्रखर. भुळभुळलेले जांभुळे. कुळकुळलेली करड, भरड भरड पडलेली ड्राय पिग्मेंट पावडर. आणि भेलकांडत झोंके खात जागीं गच्च होणारं विमान. अडून उघडतात डोळे. मिट्ट काळोखांत चमचमत्या चांदण्या पसरलेल्या. असे दिवस कांहीं प्रकारचे.

एखादवेळेस असेच तुम्ही पडलां असतां समजा पाकळ्या मिटून बंदी झालेल्या कमळांत आणि रानांतून एका हत्तीनं येऊन देठ पिरगळून कमळ सोंडेंत धरून तें फेंकून दिलं तर - तुम्ही काय कराल?
***



प्रकाशक : लोकवाङ्मय गृह. दुसरी आवृत्ती : १९९९
संपादन : चंद्रकान्त पाटील / तुळसी परब
मुखपृष्ठावरील चित्र : जॉर्जीओ मोरांडी, इटली

माणसानं बोल्लेलं आठवावं पण...

माणसानं बोल्लेलं आठवावं पण
सगळंच आठवलं तर
बोलताच येणार नाही

बोलणं आणि वागणं यांचा
अर्थाअर्थी संबंध नसतो
वाटणं आणि बोलणं आणि वागणं यांचाही

निष्कर्ष काढण्यात आपण
मागे राहतो
आणि आयुष्य फोफाटत पुढे

निष्कर्षही आपमतलबी असतात
मनसुब्याच्या कोषात रेशीम लपेटून

इच्छा आपली असोन द्यावी
अपेक्षेत सक्तीचे गुलाम खिंकाळतात

नजरेच्या पुलावर स्मितं झेलावी
एक बहर दरम्यान विखरून जावी

क्षणाग्रावरून मारावे सूर
आता, नंतर, विसरावे तीर

जे घडलं त्यास तिथेच
मोहर लावावी
जे न घडलं ते
भापवू नाई

हे सर्व म्हणताना
एकटक असावं
मग काय म्हणता याची
पर्वा नाही.

पान ३१
***

मनोहर ओक
चित्र : बाळ ठाकूर ('...ऐंशी कविता'च्या मलपृष्ठावरून)

मनोहर ओक : पुस्तकं -
आयत्या कविता - बाजारात अनुपलब्ध
अंतर्वेधी (कादंबरी) - बाजारात अनुपलब्ध
चरसी (कादंबरी) - बाजारात अनुपलब्ध
मनोहर ओकच्या ऐंशी कविता - बाजारात उपलब्ध
***

Friday 8 March 2013

साहिर लुधियानवी । अश्रूंची गाणी । माधव मोहोळकर

साहिर लुधियानवी (८ मार्च १९२१ - २५ ऑक्टोबर १९८०) यांची आज जयंती. त्यानिमित्त आपण 'रेघे'वर ही नोंद करत आहोत.

साहिर लुधियानवी
***

हिंदी चित्रपटांमधली गाणी आपल्याला कळू शकतात. म्हणजे शब्द सरळ कळू शकतात.

कभी खुद पें कभी हालात पें रोना आया
बात निकली तो हर एक बात पें रोना आया

हे साहिरचं म्हणणं आपल्याला कळू शकतं. मग तो मूळ चित्रपट कसाही असला, त्याचं चित्रीकरण कसंही असलं तरी त्या गाण्याचा अर्थ आपल्यापर्यंत पोचू शकतो.

कौन रोता है किसी और की ख़ातिर ए दोस्त
सब को अपनी ही किसी बात पें रोना आया
 
अशा ओळींमधून शक्य तेवढा अर्थ आपल्यापर्यंत पोचत असतो. त्यातून आपल्याला काही मिळत जातं. पण हे झालं हिंदीपुरतं मर्यादित. उर्दू ज्यांना येत असेल त्यांना साहिरमधला कवी उलगडून शोधायला खरी मजा येईल. पण आपल्याला उर्दू येत नसेल, तरी साधारण हिंदीच्या बळावर थोडीथोडी समजू शकेल, अशी अवस्था असू शकते. अशा अवस्थेत आपल्या मदतीला माधव मोहोळकर येऊ शकतात. त्यांचं 'गीतयात्री' हे पुस्तक 'मौजे'नं काढलेलं. सुंदर पुस्तक. मोहोळकर सोलापूरकडचे. नंतर मुंबईत प्राध्यापक होते. बहुधा 'गीतयात्री' नि 'मोहोळ' अशी त्यांची दोनच प्रकाशित पुस्तकं आहेत. आपली ही नोंद मोहोळकरांपेक्षा साहिरबद्दल अधिक आहे, त्यामुळे लगेचच 'गीतयात्री'मधल्या 'अश्कों में जो पाया है वो गीतों में दिया है...' या साहिरवरच्या लेखाकडे वळू. या लेखात मोहोळकर म्हणतात :

कवी आणि गीतकार ही साहिरची दोन्ही रूपं पुढं पुढं माझ्या मनात नकळत एकमेकांत मिसळून गेली होती. पण त्यानं भावजीवनात पहिल्यांदा अकस्मात प्रवेश केला तो कवी म्हणूनच. हिंदी-उर्दूचं आकर्षण नुकतंच मनात निर्माण झालं होतं असा तो काळ. चोरूनमारून पाहता येतील तितके चित्रपट पाहायचे, एखाद्या हॉटेलात बसून रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत गाणी ऐकायची आणि कुणाकडं तरी बसून मनसोक्त रेडियो ऐकायचा. त्या काळात हैद्राबादला गेलो असताना उन्हाळ्यातल्या एका रात्री सहज रेडियो लावला अन् एका उर्दू कवीचा स्वर कानात आला : ''मेरी महबूब! कहीं और मिला कर मुझसे...''

त्या कवीच्या कवितावाचनात खोटा आवेश नव्हता. जाणूनबुजून केलेले नाटकी चढउतार नव्हते. घोगऱ्या, खालच्या आवाजात तो अगदी सरळपणे कविता वाचत होता. पण त्या सरळपणातही आपण जे सांगत आहोत त्यावरचा त्याचा ठाम विश्वास जाणवत होता. साहिर आपली 'ताजमहाल' कविता वाचत होता. आपल्या प्रेयसीला वारंवार आवर्जून सांगत होता : तू दुसरीकडं कुठं तरी मला भेटत जा... ताजमहालाच्या छायेत प्रेम करावंसं वाटत नव्हतं त्याला. एकमेकांना भेटण्यासाठी संकेतस्थळ म्हणून त्याला ताजमहाल पसंत नव्हता. समोरची बाग, यमुनेचा किनारा, नक्षी कोरलेल्या संगमरवरी भिंती, सुंदर-सुंदर कमानी, या साऱ्यांचं वर्णन करून तो तिला सांगत होता :
ये चमनज़ार, ये जमना का किनारा, ये महल,
ये मुनक्कश दरो-दीवार, ये महराब, ये ताक।
इक शहनशाह ने दौलत का सहारा लेकर,
हम गरीबों की मोहब्बत का उड़ाया है मज़ाक।
          मेरी महबूब! कहीं और मिला कर मुझसे।

उर्दू चांगलं येत नसल्यामुळं कवितेतला शब्द न् शब्द काही कळला नाही, पण कवितेतला भाव मात्र तीरासारखा खोलपर्यंत पोचला. खरं म्हणजे 'शहनशहाच्या मुमताजवरील अमर प्रेमाचं चिरंतन प्रतीक म्हणजे ताजमहाल', असं निबंधात वगैरे लिहायला खूप आवडायचं वय होतं ते. पण साहिरनं ताजमहालविषयीच्या साऱ्या रोमँटिक कल्पनांना हादरा दिला. त्याच्या दृष्टीनं ताजमहाल म्हणजे एका बादशहानं आपल्या संपत्तीचा उपयोग करून गरिबांच्या प्रेमाची केलेली क्रूर थट्टा! ज्यांनी खरोखरच ताजमहाल बांधला ते हजारो शोषित कलावंत जगाला अज्ञातच राहिले. ज्यांनी शहाजहानचं स्वप्न साकार केलं त्यांनीही आपल्या आयुष्यात प्रेम केलं असेलच. त्यांच्या प्रेमाची स्मारकं कुठं आहेत? त्या कबरींवर कुणी दिवा तरी लावला की नाही हेही माहीत नाही :
मेरी मेहबूब! उन्हें भी तो मोहब्बत होगी,
जिनकी सन्नाई ने बख्शी है इसे शक्ले-जमील।
उनके प्यारों के मकाबिर रहे बे-नामो-नमूद,
आज तक उनपे जलाई न किसी ने कंदील।

आपल्याच मनात कुठंतरी खोल-खोल होतं अन् आपल्यालाच माहीत नव्हतं असं काहीतरी साहिर सांगतोय, असं कविता ऐकताना राहून राहून वाटत होतं. पुढं ताजमहालवर बऱ्याच कविता वाचल्या; पण तसं कधी वाटलं नाही. तसं पाहिलं तर सुमित्रानंदन पंतांच्या 'ताज'मध्येही मानवतावादी दृष्टिकोण प्रकट झाला होता :
हाय! मृत्यु का ऐसा अमर, अपार्थिव पूजन?
जब विषण्ण, निर्जीव पड़ा हो जग का जीवन!
स्फटिक सौध में हो शृंगार मरण का शोभन,
नग्न, क्षुधातुर, वासविहीन रहें जीवित जन।

पण पंतांच्या कवितेतील प्रौढ चिंतन आणि संयमशील अभिव्यक्तीपेक्षा साहिरच्या भावुक पोटतिडिकेनं मन अधिक आकर्षून घेतलं होतं. आणि कुसुमाग्रजांच्या 'ताजमहाल'मध्ये तर
कीं कालिंदीवर करण्याला जलकेली
कुणि यक्षलोकिंची रूपगर्विता आली
          त्या नितळ दर्पणीं विवस्त्र होउनि पाही
          निज लावण्याची उसासलेली वेली
यासारख्या एकापेक्षा एक बहारदार उत्प्रेक्षांच्या लडींतच मन गुंतून पडायचं. ताजमहालच्या सौंदर्यवर्णनात कवी इतका रममाण झालेला वाटायचा, की अखेरीस कामांध शहांनी राणीवशात ओढलेल्या 'शत अनामिकांचें त्या हें कबरस्तान' या म्हणण्याचा मनावर फारसा परिणाम व्हायचा नाही. खरं सांगायचं तर त्या शेवटच्या कलाटणीपेक्षा सुरुवातीचं सौंदर्यवर्णनच मन मोहून टाकायचं. साहिर ताजमहालच्या सौंदर्यात स्वतः रमला नाही. आपली प्रतिक्रिया त्यानं तीव्रतेनं व्यक्त केली होती :
इक शहनशाह ने दौलत का सहारा लेकर
हम गरीबों की मोहब्बत का उडाया है मजाक!

या ओळींचा त्या काळात मनावर इतका जबरदस्त परिणाम झाला होता की संधी सापडेल तिथं आम्ही त्यांचा उपयोग करत होतो. वर्गातला निबंध असो, इतिहास असो की वक्तृत्वाची चढाओढ असो, श्रोत्यांना जिंकायला तर ते आमचं हुकुमाचं पान होतं. पण पुढं पुढं त्या ओळी जरा भडक वाटायला लागल्या अन् त्या कवितेतल्या दुसऱ्याच ओळींनी पाठपुरावा करायला सुरुवात केली. त्या ओळींत साहिरनं विचारलेला प्रश्न कुणाच्याही हृदयात दीर्घ काळपर्यंत घुमत राहील असा होता :
अनगिनत लोगों ने दुनिया में मोहब्बत की है,
कौन कहता है कि सादिक न थे जज़्बे उनके?
लेकिन उनके लिए तशहीर का सामान नहीं,
क्योंकि वे लोग भी अपनी ही तरह मुफलिस थे।

... असंख्य लोकांनी जगात प्रेम केलंय. कोण म्हणतो, त्यांच्या भावना सच्च्या नव्हत्या? पण त्यांच्याजवळ जाहिरातबाजीची साधनं नव्हती; कारण ते लोकही आपल्यासारखेच कंगाल होते!

प्रेम करायला लागणारं भावनाप्रधान मन तर जवळ होतं, पण सुखी, ऐषआरामाचं आयुष्य मात्र नव्हतं अशा साऱ्याच तरुणांना साहिर हा आपला कवी वाटला होता...
 (पान ११७-११९)

मोहोळकर बोलत असताना खरंतर आपण साहिरवर वेगळं काय बोलणार असं होतं. तेवढं आपलं त्याबद्दलचं ज्ञान नाही. आपण एक सामान्य प्रेक्षक किंवा वाचक म्हणून पाहिलं तर फक्त भारावून जाता येतं. मोहोळकरांसारखे लोक मदत करतात आणि त्या भारावण्यामागचं लॉजिक थोडंसं स्पष्ट करतात. पण थोडंसंच, कारण ह्याबाबतीत पूर्ण स्पष्टता अशी काही गोष्ट असू शकणं अवघड आहे. आणि बरं हे की, केवळ कवी असण्याच्या स्थितीबद्दल भारावण्याऐवजी आपण साहिरच्या शब्दांनी भारावून जातोय. कवी असणं म्हणजे जे असेल ते साहिरच्या शब्दांना माहीत असतं. पण बहुतेकदा पोकळ शब्दच आजूबाजूला वावरत असतात आणि त्यामुळे कवीही बरेचदा पोकळ असण्याची शक्यता वाढते, आताच्या फेसबुकादींच्या शब्दचुकार, स्वप्रसिद्धीच्या काळात ही शक्यता अधिकच, त्यामुळे आपल्या स्थितीचा गवगवा जास्त, पण शब्दांची स्थिती बिकट अशी परिस्थिती होते.

आपण साहिरबद्दल बोलत होतो आणि मोहोळकरांच्या साक्षीने बोलत होतो. जग ही एक तमाम लोकांच्या सोयीने तयार झालेली गोष्ट आहे आणि अशी सोईसोईनेच ती चालत राहाते. सोईसोईनेच तिथले व्यवहार होतात. मुळात सगळ्या गोष्टी म्हणजे निव्वळ व्यवहारच बनलेल्या असतात आणि नैतिकतेचा व्यवहार, प्रामाणिकपणाचा व्यवहार, समंजसपणाचा व्यवहार, स्तुतीचा व्यवहार, कवितेचा व्यवहार, प्रेमाचा व्यवहार इत्यादी. असे हे झुंडींचे व्यवहार असतात. 'व्यवहार' या शब्दाचा आपण इथे घेतलेला अर्थ आहे तो 'सोईने केलेली कृती'. त्यामुळे साहिरच्या कवितांच्या ओळी 'सुविचारा'सारख्या 'शेअर' केल्या जातील व्यवहार म्हणून. ते सगळं जगात एकीकडे सुरू राहणार हे अगदीच पक्कं असलं तरी साहिरसारखे लेखक या सगळ्यावर आपल्यापुरती शब्दांनी मात करून ठेवतात :

ये  महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया
ये इंसान के दुश्मन समाजों की दुनिया
ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।


हर इक जिस्म घायल, हर इक रूह प्यासी
निगाहों में उलझन, दिलों में उदासी
ये दुनिया है या आलम-ए-बदहवासी
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

यहाँ इक खिलौना है इसां की हस्ती
ये बस्ती हैं मुर्दा परस्तों  की बस्ती
यहाँ पर तो जीवन से है मौत सस्ती
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

जवानी भटकती हैं बदकार बन कर
जवान जिस्म सजते है बाज़ार बन कर
यहाँ प्यार होता है व्योपार  बन कर
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

ये दुनिया जहाँ आदमी कुछ नहीं है
वफ़ा कुछ नहीं, दोस्ती कुछ नहीं है
जहाँ प्यार की कद्र कुछ नहीं है 
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

जला दो इसे फूक डालो ये दुनिया
मेरे सामने से हटा लो ये दुनिया
तुम्हारी है तुम ही संभालो ये दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।


पण जग काही हटवलं जात नाही, आणि त्या जगाच्या व्यवहारांमधेच साहिरसारख्यांचे शब्द कायम असतात. जगाच्या बोगसपणाच्या जाणिवेची तीव्रता जितकी जास्त तितका शब्दांचा मजबूतपणा जास्त. साहिरच्या बाबतीत असे मजबूत शब्द आले कुठून याचं मोहोळकरांनी त्यांच्या मतानुसार आपल्याला सांगितलेलं उत्तर 'गीतयात्री'मधे संपूर्ण वाचता येईल. तूर्तास, गुरुदत्तच्या 'प्यासा'च्या संदर्भात या उत्तराचे धागे मोहोळकर कसे उलगडतात ते पाहू :

कवीचं मन आणि भोवतालचं जीवन यांतील विसंगती समर्थपणे शब्दांतून व्यक्त करू शकेल असाच गीतकार हवा होता 'प्यासा'साठी. नुसताच गीतकार नव्हे तर कवी वाटेल असा गीतकार! गीत लिहिणारा, पण ते गीत कविताही आहे याची जाणीव ठेवणारा. कवी विजय गातोय ते गाणं नाही तर अनुभूतीची कविता आहे, जिवंत कविता आहे, जातिवंत कविता आहे असं वाटायला लावणारा. गुरुदत्तला नुसता गीतकार नको होता, नुसता कवीही नको होता. त्याला हवा होता गीतकार कवी! पहिल्यांदा कवी, गीतकार नंतर. कवी विजयनं सामान्य गीतं गायली असती तर श्रेष्ठ कवी म्हणून तो विश्वासार्ह वाटला नसता. आणि तो श्रेष्ठ कवी जर वाटला नसता तर त्याच्या उपेक्षेचंही काही वाटलं नसतं. साहिरशिवाय दुसरा कोणीही गीतकार कवी विजयसाठी लिहू शकणार नाही हे गुरुदत्तनं ओळखलं होतं. साहिरजवळ कवी विजयचं मन होतं अन् ते जीवनही तो जगला होता. मग 'प्यासा'सारख्या चित्रपटात कवि-नायकासाठी लिहिताना त्याची प्रतिभा साहजिकच फुलून आली. गीतकार कवीत नकळत मिसळून गेला. त्याच्यासाठी त्याला वेगळं काही लिहावंच लागलं नाही. साहिरनं जे काही लिहिलं ती आत्माभिव्यक्तीच होती. 'ये दुनिया जहाँ आदमी कुछ नहीं है'मधली शोषित-दलित मानवजातीविषयीची आत्मीयता आणि 'इसको ही जीना कहते हैं तो यूँ ही जी लेंगे'मधली असफल प्रेमजीवनातली दारुण निराशा...

सुरुवातीपासून साहिरच्या कवितेत हेच दोन सूर लागले.
 (पान १५१)

यापुढेही मोहोळकर काही सांगतात. साहिरच्या कवितेतले हेच दोन सूर अनेक तरुण-तरुणींच्या हृदयाला भिडले. कारण जगात साहिरसारखंच हृदय असणारी, निष्ठा असणारी माणसं काही कमी नव्हती. आणि तो एकटाच काही जगावर नाराज नव्हता. त्याच्यासारखेच अनेक जण जगावर रुष्ट होते, असं ते म्हणतात.

पण तरी केवळ हृदयातली निष्ठा पुरेशी असते का हो? नसावी. कदाचित साहिरचे शब्द समजून घेण्यापुरतीच ती पुरेशी असेल, पण साहिर होण्यासाठी त्यापलीकडचंही काही लागत असेल का? हृदयातल्या निष्ठेचं आणखी काहीतरी करावं लागत असेल का? तर, याचं उत्तर 'होय' असं असावं.

नोंदीचा शेवट मात्र मोहोळकरांच्या आणि साहिरच्या शब्दांनीच व्हायला हवा :

अश्रूंतून जे मिळालं ते साहिरनं आपल्या गीतांतून, काव्यातून दिलं. जगाची तक्रार असो वा नसो, आपण तर त्याच्यावर प्रेम केलं. त्याच्या दोषांसह. ऐकलेली गाणी मधुर असतात; न ऐकलेली त्याहून मधुर. साहिरनं छेडलेले दोन्ही सूर अंतःकरणाला स्पर्श करून गेले. सुखदुःखांत साथ देऊन गेले. पण तारांवरून निसटून गेलेले सूर ऐकायला मिळाले नाहीत याची हुरहूर मनात आहेच:

अश्कों में जो पाया है वो गीतों में दिया है
इस पर भी सुना है कि ज़माने को गिला है
जो तार से निकली है वो धुन सबसे सुनी है
जो साज़ पे ग़ुजरी है वो किस दिल को पता है
(पान १५१-१५२)


मुखपृष्ठ : पद्मा सहस्त्रबुद्धे । मौज । रू. १५०/-

***

Monday 4 March 2013

'प्रतिमान' या हिंदी पत्राच्या प्रकाशनासंबंधीचं टिपण

- आदित्य निगम

आदित्य निगम दिल्लीमधल्या 'सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज्' (सीएसडीएस) या संस्थेसोबत काम करतात. त्यांनी 'काफिला'वर लिहिलेल्या 'लीपिंग अक्रॉस अ ट्रबल्ड हिस्ट्री - लाँच ऑफ प्रतिमान' या लेखाचा मराठी अनुवाद त्यांच्या परवानगीने 'रेघे'वर नोंदवून ठेवतो आहे. भाषा आणि माध्यमं यांच्यासंदर्भात काही मुद्दे या लेखातून हाताशी लागू शकतात, म्हणून ही नोंद. 
या अनुवादात 'जर्नल' या इंग्रजी शब्दासाठी 'पत्र' हा मराठी शब्द वापरला आहे.



'प्रतिमान'संबंधीचं प्रसिद्धीपत्रक
'प्रतिमान - समय, समाज, संस्कृती' या नवीन हिंदी संशोधन पत्राच्या आरंभाचा प्रकाशन सोहळा २८ फेब्रुवारी २०१३ रोजी 'सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज्, दिल्ली' इथे पार पडला. अनेक अर्थांनी हा कार्यक्रम ऐतिहासिक मानला पाहिजे. हिंदी आणि उर्दू यांच्यात दीर्घकाळ टिकून असलेल्या दरीचा त्रासदायक इतिहास व हिंदुस्तानी भाषेची हरवलेली परंपरा या पार्श्वभूमीवर 'प्रतिमान'च्या प्रकाशन समारंभात झालेलं विख्यात उर्दू अभ्यासक व कवी शमसूर रहमान फारुकी यांचं व्याख्यान ऐतिहासिक ठरणारं होतं. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या त्या इतिहासात बुडी मारण्याचा प्रयत्न म्हणजे एका अर्थी अप्रस्तुत आणि क्वचित उर्मटही समजला जाऊ शकतो, कारण उर्दू आणि हिंदी दोन्ही भाषांच्या शुद्धतेबाबत आग्रही असलेल्या संरक्षक मंडळींच्या विरोधात जाणारी ही कृती ठरते. या कृतीतून स्पष्ट झालेली गोष्ट हीच की, भाषा म्हणजे तथाकथित संरक्षक दाखवतात ती नसून सर्जनशीलता आणि आदानप्रदान व्यवहार यांमधून प्रवाहित होत असते तीच भाषा असते.

या कार्यक्रमात फारूकी यांनी 'उर्दू आदबी रवायत की सच्ची त्रिवेणी' या विषयावर बोलण्याचं ठरवलं हे सयुक्तिकच होतं. आपल्या अप्रतिम व्याख्यानात फारूकी यांनी उर्दू काव्य व सौंदर्यशास्त्रीय परंपरेतील तीन प्रवाह (त्रिवेणी) - अनुक्रमे अरबी, पर्शियन व संस्कृत- उलगडून दाखवले. अदृश्य असूनही 'अस्तित्त्वा'त असलेल्या सरस्वती नदीला अलाहाबादमधे गंगा नि यमुना या नद्या सामील होतात, त्या संगमाच्या 'त्रिवेणी'चं रूपक वापरण्यामागे कदाचित फारूकी यांनाही सध्या अदृश्य असलेल्या पण महत्त्वाच्या संस्कृत काव्य परंपरेकडे लक्ष वेधायचं असावं.

अनुकरण व प्रतिनिधित्त्वामध्ये व्यग्र असलेल्या ग्रीक व पाश्चात्त्य परंपरांविरोधात युक्तिवाद करत फारूकी यांनी असं म्हणणं मांडलं की, अरबी किंवा अधिक प्रमाणात पर्शियन आणि संस्कृत परंपरांनी कला / कविता यांच्याकडे त्यांच्या निर्मितीने तयार होणाऱ्या अर्थासंदर्भात व प्रभावासंदर्भात पाहिलं. पर्शियन, उर्दू आणि क्वचित अरबी कवितेच्या प्रांतातून आणि आनंदवर्धन, अभिनवगुप्त व कुंतक या मध्ययुगीन थोर काश्मिरी सौंदर्य अभ्यासकांच्या विचारधारांमधून फारूकी सहजी विहरत होते.
सामाजिक शास्त्रांचा अभ्यास हिंदी भाषेमध्ये व्हावा यासाठी गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नशील असलेल्या आमच्यासारख्यांसाठी तर हा कार्यक्रम खूपच महत्त्वाचा होता. दोन्ही बाजूंकडच्या सनातनी विचारांना ओलांडण्यापलीकडेही काही गोष्टी आमच्या कामाचा भाग आहेत, भाषेचं जे रूप आपल्यापर्यंत आलंय त्या रूपाला समोरासमोर आव्हान देणं हा या कामाचा एक महत्त्वाचा भाग आहे. गेल्या दहा वर्षांमधे 'सीएसडीएस'च्या भारतीय भाषा उपक्रमांतर्गत (मुख्यत्त्वे अभय दुबे यांच्या एकहाती परिश्रमामुळे) अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आणि 'दिवान-ए-सराई'सारखी काही पुस्तकं 'सराई' उपक्रमाखाली सिद्ध झाली. या प्रवासात एकेका शब्दावर, संकल्पनांवर अनेक वाद, अनेकदा उग्र भांडणं झाली, अनुवादाच्या कृतीविषयीही मोठे वाद या कालावधीत झाले. 'प्रतिमान' हे पत्र फुटीरतावादी भाषिक कलह टाळून स्पष्ट भूमिका घेणार आहे. हिंदी, हिंदुस्थानी, उर्दू यांच्या विविध शैली व विविध बोलींचा उत्सव म्हणजे 'प्रतिमान'.

'वैचारिक संकटा'बद्दल वारंवार दुःख व्यक्त करत असलेल्या हिंदीसारख्या भाषेत सामाजिक शास्त्रांविषयीचं एक संशोधन पत्र प्रकाशित होणं ही मुळातूनच एक महत्त्वाची घटना आहे. (१९९०च्या दशकात 'हंस' या साहित्यिक नियतकालिकाने हिंदीतील वैचारिकतेबद्दलचा वादाला वाचा फोडली होती आणि नंतर 'हिंदी प्रदेश का वैचारिक संकट' या नावाने हा वाद ओळखला गेला). भारतीय भाषिक वातावरणाशी, मुख्यत्त्वे हिंदी वातावरणाशी ज्यांचा परिचय असेल, त्यांना 'भारतीय भाषा या भावनांच्या अभिव्यक्तीसाठी चांगल्या आहेत, पण वैचारिक कामांसाठी त्यांचा तितकासा उपयोग नाही' हा काही समीक्षकांचा दावा माहीत असेल. भारतीय भाषांमधे झालेलं सामाजिक शास्त्रांसंबंधीचं संशोधकीय काम शोधायला गेलं की हा 'वैचारिकतेचा अभाव' जाणवू लागतो. असं काम फारसं सापडत नाही, हे वेगळं सांगायला नको. हा अभाव त्या भाषेची त्या विषयासंबंधीची 'कमतरता' आहे असं सिद्ध करण्यासाठी वापरला जातो. ज्याप्रमाणे आपली आधुनिकता अपूर्ण आहे, आपला निधर्मीवाद चुकीचा मांडला जातो आणि आपली भांडवलशाहीची कल्पना फोल गेलेय, त्याचप्रमाणे आपल्याला न संपणाऱ्या कमतरतांवरही विश्वास ठेवायला सांगितलं जातं. आमच्या मते, प्रश्न हा नाहीये की, भारतीय भाषांमधे सामाजिक शास्त्रांचा अभ्यास का नाही? तर, प्रश्न हा आहे की, या प्रदेशात सामाजिक विचारधारांची आणि बौद्धिकतेची रूपं कोणती आहेत आणि कोणत्या ठिकाणी असं काम सुरू असतं?

इथे आव्हान दोन पातळ्यांवरचं आहे. पहिलं म्हणजे भारतीय भाषांवर परंपरेतून ज्या विचारधारांचा आणि शैलीचा प्रभाव पडलाय त्यांची ओळख पटवून घेणं. याशिवाय आत्तापर्यंत आपली निष्क्रियता पुरेशी सिद्ध केलेल्या स्वदेशीवादी आणि पाश्चात्त्यविरोधी भूमिकेपासून स्वतःला दूर ठेवणं हे दुसरं आव्हान. त्यामुळे पारंपरिक विचारधारांच्या वैशिष्ट्यपूर्ण रूपांचं भान कायम ठेवून सामाजिक शास्त्रांचं पाश्चात्त्य ज्ञान प्रादेशिक भाषेत आणणं जसं आवश्यक आहे तसंच आपण विविध परंपरांच्या संगमाशी उभे आहोत याचं भान ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. फारूकी यांच्या 'त्रिवेणी'मध्ये तीन परंपरांच्या संगमाचा संदर्भ असेल तर आपण त्यात चौथ्या संदर्भाची भर घातली पाहिजे, आणि तो म्हणजे पाश्चात्त्य संदर्भ. हा चौथा संदर्भ आता शासकाच्या भूमिकेत नाही, तर आपल्या अभ्यासाच्या चौथ्या संदर्भापैकी एक मानावा असा आहे.

'प्रतिमान' या पत्राद्वारे जे करण्याचा मानस आहे त्यानुसार विद्यार्थ्यांनी सामाजिक शास्त्रांची तंत्रं आणि अभ्यासपद्धती तर आत्मसात करणं अपेक्षित आहेच, शिवाय विचारधारांच्या रूपांकडे लक्ष देणंही आवश्यक आहे. 'प्रतिमान' ज्या अधिक मोठ्या प्रकल्पाचा भाग आहे त्या प्रकल्पांतर्गत गेल्या तीन दशकांमधल्या हिंदी प्रकाशनांचा प्राथमिक अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की, विद्यापीठांबाहेरही यासंबंधी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. विद्यापीठातल्या शिक्षकांनी योगदान दिलं आहेच, पण ते मुख्यत्त्वे लिट्ल मॅगझिनांमधून, चळवळींमधून, सार्वजनिक वादांच्या व्यासपीठांवरून पुढे आलेलं दिसतं.

त्यामुळे भारतीय भाषांमधे सामाजिक शास्त्रांचा गंभीर अभ्यास (समाजचिंतन) करण्याच्या प्रयत्नात मुळात या भाषांमधून यासाठी उपलब्ध असलेली रूपं व मार्गांचा विचार करणं हे अधिक मोठं आव्हान ठरू शकतं. भाषा ही केवळ कल्पनांचं वाहन म्हणून काम करते यावर आमचा विश्वास नाही, सामाजिक शास्त्रांचा केवळ अनुवाद करून कुठल्यातरी कथित वैश्विक अनुभवाच्या छायेखाली काम करत राहण्यावरही आमचा विश्वास नाही. आम्हाला असं वाटतं की भाषा ज्या कल्पनांना आकार देते व त्यांचा प्रसार करते त्या कल्पनांशी ती अनिवार्यपणे जोडलेली असते. वास्तविक पाहाता, एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या पहिल्या पन्नास वर्षांमधे मोठ्या प्रमाणावर सामाजिक व राजकीय विचारांनी थिट्या अभ्यासांना जन्म दिला याचं मुख्य कारण सामाजिक शास्त्रं इंग्रजीकडे सुपूर्त केली गेली हे आहे. सामाजिक शास्त्रांच्या पवित्र जगामधे जे विहरू शकतील त्यांनाच खऱ्या अर्थाने अभ्यासाच्या जगातही प्रवेश करता येईल. हिंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेला प्रकाशन व वाचन व्यवहार हा एक संकेत धरला तर त्यातून काही मोठे बदलही दिसण्याची शक्यता आहे. या बदलांच्या प्रक्रियेतून 'सामाजिक शास्त्रं' वेगळी कशी राहतील?

'सीएसडीएस'चा भारतीय भाषा उपक्रम व वाणी प्रकाशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून 'प्रतिमान' हे पत्र दर सहा महिन्यांनी प्रकाशित होईल.

Saturday 2 March 2013

आण्विक धोरण : हितसंबंधांमधला विरोधाभास

- नित्यानंद जयरामन

(नित्यानंद हे कुडानकुलम आण्विक प्रकल्पविरोधी आंदोलनातील चेन्नईस्थित कार्यकर्ता आहेत. त्यांचा हा लेख त्यांनी कालच 'रेघे'कडे पाठवला होता आणि मराठीत तो प्रकाशित व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी त्यांच्या पातळीवर एखाद्या मराठी वर्तमानपत्रात तो छापून यावा यासाठी प्रयत्न केले, पण काही कारणांमुळे ते होऊ शकलं नाही. मूळ इंग्रजी लेख 'एशियन एज'च्या मुंबई आवृत्तीतल्या संपादकीय पानावर आज प्रसिद्ध झाला आहे. मराठी भाषांतर 'रेघे'वर प्रसिद्ध होऊ शकत असल्यास पाहावं असं नित्यानंद यांचं म्हणणं होतं. अन्यथा वाया जात असलेल्या या मराठी भाषांतराला 'रेघे'चं व्यासपीठ द्यायला हरकत नाही, असं वाटल्यामुळे ही नोंद. प्रश्न एवढे गुंतागुंतीचे असतात की त्याच्या अनेक बाजू तपासायला हव्यात. आता ही एक बाजू सध्या आपल्याकडे स्वतःहून व्यासपीठाच्या शोधात आलेली आहे, तर तिला ते देणं एवढ्याच भूमिकेतून आपण ही नोंद 'रेघे'वर करत आहोत.)

आण्विक विधी संघटनेच्या (न्युक्लियर लॉ असोसिएशन - एनएलए) इच्छेनुसार सगळं झालं तर आज (२ मार्च) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय महादेव ठिपसे आणि आण्विक ऊर्जा नियंत्रण मंडळाचे (अॅटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड - एईआरबी) अध्यक्ष एस. एस. बजाज 'एनएलए'च्या दुसऱ्या वार्षिक परिषदेला हजर असतील. भारतात होत असलेल्या या सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवरचा मुख्य विषय आहे : 'भारतातील आण्विक ऊर्जा क्षेत्र : व्यावसायिक संधी आणि कायदेशीर आव्हानं'. या सभेमध्ये 'आण्विक ऊर्जा प्रकल्पांमधे नियंत्रणात्मक सहभाग' या विषयावरच्या परिसंवादात न्यायाधीश ठिपसे अध्यक्षस्थानी असणार आहेत, असं कार्यक्रमपत्रिका सांगते. 'एईआरबी'चे अध्यक्ष एस. एस. बजाज या परिसंवादातील मुख्य व्याख्याते असणार आहेत. आधीच्या नियोजनानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अध्यक्षीय भाषण करणार होते, पण त्यांचं नाव नंतर वगळण्यात आलं.

कुडानकुलम प्रकल्पानंतर लोकांशी संवाद साधण्याच्या विषयासंबंधी या कार्यक्रमात वक्ते बोलणार आहेत. आण्विक ऊर्जा प्रकल्पांना लोकांनी स्वीकारावं यासाठी कोणते मार्ग अवलंबावे यासंबंधीही यावेळी भाषणं होणार आहेत. आण्विक नुकसान कायद्यासंबंधी वादग्रस्त नागरी उत्तरादायित्त्वाच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा होणार आहे. 'एईआरबी'चे अध्यक्ष श्री. बजाज  आणि न्यायमूर्ती ठिपसे यांचा या कार्यक्रमातला सहभाग निश्चित झाला तर त्यातून काही प्रश्न उपस्थित होतात. जैतापूरमधल्या आण्विक ऊर्जा प्रकल्प उभारण्यापासून 'अरेव्हा' कंपनीला कसं रोखावं, या विषयावर कोकण बचाव समितीने परिसंवाद आयोजित केला तर त्याला एखादा न्यायाधीश किंवा 'एईआरबी'चे अध्यक्ष उपस्थित राहू शकतील का? बहुधा नाही.

आण्विक ऊर्जेच्या वादग्रस्त मुद्द्यावरच्या या परिषदेच्या आयोजकांची भूमिका स्पष्ट आहे. भारतात २०५०पर्यंत आण्विक ऊर्जानिर्मिती ४,७८० वॅटपासून पावणेतीन लाख वॅटवर नेण्याचं आश्वासन सरकारने दिलं आहे. या आश्वासनातून निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संधींपुढच्या कायदेशीर आव्हानांमधला जोर कमी करण्यासंबंधी काय करता येईल याचा शोध, हा आयोजकांचा हेतू आहे. या परिषदेतील व्याख्यात्यांमधे आण्विक ऊर्जा विभाग, आण्विक ऊर्जा नियंत्रण मंडळ, ऊर्जा संशोधन संस्था, अलस्टॉम, अरेव्हा, एनपीसीआयएल आणि एल अँड टी आदी संस्था-कंपन्यांमधले अधिकारी समाविष्ट करण्यात आले आहेत. आण्विक दुर्घटनांमधे संबंधित कंपनीवर असलेले उत्तरादायित्त्व अति बंधनकारक आहे व आण्विक यंत्रणा पुरवठादारांसाठी अडथळा आहे अशी या सर्वांची स्पष्ट भूमिका आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अणुउद्योगाच्या सर्व समस्यांना उत्तर देण्यासाठी त्यांच्या क्षमतेनुसार सर्व त्या गोष्टी केल्या. भारतातील आण्विक कार्यक्रमाचे निरीक्षक आणि भौतिकशास्त्रज्ञ सुव्रत राजू यांनी म्हटल्याप्रमाणे, 'अमेरिकी हितसंबंधांशी प्रामाणिक राहण्याच्या मार्गात देशांतर्गत राजकीय अडथळे येऊ देत नाही ती सरकारं विश्वसनीय ठरतात.' आण्विक उत्तरादायित्त्व कायद्यावर संसदेत मोठ्या प्रमाणावर वाद झाल्यानंतर आण्विक यंत्रणा पुरवठादारांना उत्तरादायी ठरवणारं कलम कायम ठेवण्यात आलं, पण सरकारने आपली 'विश्वसनीयता' सिद्ध करण्यासाठी कायद्यातील नियमावलीमधे पळवाटा घालून ठेवल्या. या पळवाटा घटनाबाह्य असल्यासंबंधीचा खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात चालू आहे.

आण्विक उत्तरादायित्त्वाचा मुद्दा घालवण्यासाठी कार्यरत असलेल्या परिषदेत एका न्यायाधीशाने व 'एईआरबी'च्या अध्यक्षांनी सहभागी झाल्याने न्यायव्यवस्था व नियंत्रणसंस्था यांच्या निरपेक्ष असण्यावरच शंका उपस्थित होऊ शकते. न्यायाधीशांना आणि 'एईआरबी'च्या अध्यक्षांना स्वतःची मतं असण्याचा अधिकार आहेच, पण आण्विक लॉबीइस्टांच्या व्यासपीठावर ती मांडणं अयोग्यच ठरेल.

आण्विक ऊर्जेसंबंधीचा वाद महत्त्वाचा आहे. पण गढूळ वातावरणात चर्चा होऊ शकत नाही. आण्विक ऊर्जेविरोधात उपोषणाला बसलेले मच्छिमार आणि शेतकरी राष्ट्रविरोधी असल्याचा, त्यांना परदेशांतून निधी येत असल्याचा, ते माओवादी असल्याचा आरोप केला जातो. आण्विक ऊर्जेचा पर्याय स्वीकारताना काळजी घ्यावी अशी मतं मांडणाऱ्या आणि कुडानकुलम प्रकल्पविरोधकांना पाठिंबा देणाऱ्या वैज्ञानिकांना, लेखकांना आणि कार्यकर्त्यांना भारतात येण्यासही बंदी करण्यात येते.

कोलारॅडो विद्यापीठातले विख्यात भूगर्भशास्त्रज्ञ प्राध्यापक रॉजर बिल्हॅम यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात नवी दिल्ली विमानतळावरून परत पाठवण्यात आलं. जैतापूर भागाच्या भूकंपप्रवणतेसंबंधी आपण एक शोधनिबंध लिहिल्यामुळे भारत सरकारने आपल्याला काळ्या यादीत टाकलं असल्याचा आरोप बिल्हॅम यांनी केला होता. गेल्या सप्टेंबरमधे मसाहिरो वतारिदा, शिन्सुके नकाई आणि योगो उनोदा या तीन जपानी कार्यकर्त्यांना चेन्नई विमानतळावरून परत पाठवण्यात आलं. या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी त्यांना विचारलं की, 'त्यांनी कुडानकुलमसंबंधीच्या आंतरराष्ट्रीय निवेदनावर स्वाक्षरी केलेय का, तर मग ते आण्विक ऊर्जाविरोधक आहे'. त्यामुळे त्यांना परत जावं लागलं.

कुडानकुलममधे 'एनपीसीआयएल'च्या आण्विक प्रकल्पाविरोधातील शांततापूर्ण आंदोलन आता दुसऱ्या वर्षात आहे. दोन लाखांहून अधिक लोकांवर तीनशेहून अधिक पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील बहुतेक तक्रारी कुडानकुलममधल्या पोलीस स्थानकातच दाखल आहेत. यातील दहा हजारांहून अधिक आरोपी निनावी आहेत आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा किंवा राष्ट्राविरोधात युद्ध पुकारल्याचा खटला दाखल करण्यात आलाय. आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या व्यक्तींना इदिन्थकराई या गावात जवळपास कोंडण्यात आलंय. या गावात प्रवेश करणं मुश्किल आहे.

दुसरीकडे, आण्विक ऊर्जेचं समर्थन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय 'एनजीओ'ने मुंबईतल्या फाईव्हस्टार हॉटेलात आयोजित केलेल्या परिषदेत भारत सरकार सहभागी होतं. अशा परिस्थितीत आण्विक ऊर्जेसंबंधीच्या निःपक्ष चर्चेत सरकार सहभागी होईल हे दिवास्वप्न आहे. पण किमान न्यायाधीशांनी आणि नियंत्रक संस्थांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्तिगत पातळीवर अशा परिषदांना उपस्थित राहाणं टाळावं अशी अपेक्षा तरी आपण करू शकतो.

Friday 1 March 2013

एका आझाद इसमाची गोष्ट

अमन सेठी
अमन सेठी सध्या 'द हिंदू'चा आफ्रिकेतला प्रतिनिधी म्हणून काम करतोय. आदिस अबाबाला असतो. आधी त्याने याच वर्तमानपत्रासाठी छत्तीसगढमधेही काम केलेलं आहे. मूळचा दिल्लीतला आहे. २००५पासून 'हिंदू'सोबत आहे. 'अ फ्री मॅन' हे अमनचं पहिलंच पुस्तक. 

'रेघे'वर आपण केवळ पुस्तक परीक्षण असं काही काम ठेवलेलं नाही, आणि खरंतर ही नोंद तशी नाहीही. हे पुस्तक म्हणजे पत्रकारितेशी मजबूत संबंधित आणि पुन्हा स्वतंत्र पुस्तक म्हणूनही सुंदर अशी गोष्ट असल्यामुळे आपण तिची नोंद करतोय, माध्यमं आणि साहित्य अशा दोन्ही विभागात बसणारी. आणि सामाजिक समस्येवर लिहिण्याचा आव आणत स्वतःच्या पोकळ संवेदनशीलतेचं प्रदर्शन करणाऱ्या पत्रकारी लिखाणासारखं हे नाही, तर आपण कुठे आहोत आणि एकूण आपला आसपास कुठे आहे याची पुरेशी जाणीव ठेवून लिहिलेलं हे पुस्तक आहे, असं वाटलं म्हणून त्याची नोंद 'रेघे'वर. मुख्य प्रवाह बाजूला ठेवला तरी स्वतंत्रपणे पत्रकारांना काय करता येण्यासारखं आहे, याची नोंद करणं हाही एक हेतू.
***

भारताला स्वातंत्र्य मिळालं १९४७ साली. त्यानंतर आत्तापर्यंत आपण स्वतंत्रच आहोत. आपण म्हणजे भारतातले नागरिक.
पण एकूणच स्वातंत्र्य म्हणजे काय?
***


मोहम्मद अश्रफ मूळचा बिहारमधल्या पाटण्याचा. पण गेली काही वर्षं तो दिल्लीतल्या सदर बाझार परिसरातल्या बारा टूटी चौकात रोजंदारीवर काम करतोय. त्याला हवं तेव्हा तो काम करतो, अन्यथा बिडी फुंकत, कधी दिवसेंदिवस दारू पीत वेळ काढत राहातो. हेच त्याचं स्वातंत्र्य!
म्हणून पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणाचं नाव 'आझादी'.

अश्रफचं हे स्वातंत्र्य समजून घ्यायला त्या चौकात अमन चार-पाच वर्षं फिरत होता. तिथल्या कामगारांसोबत वेळ घालवत होता. त्यांच्याशी त्याची दोस्तीही जमलेली. पण ही दोस्ती म्हणजेही फारच तकलादू चीज असावी, याचीही जाणीव अश्रफसकट सगळ्यांनाच आहे की काय? कारण सगळे हे कामगार पुन्हा सुटेसुटे एकेकटेच आहेत. मूळचं घर कुठाय, घरी कोण कोण राहातात, लग्न झालंय की नाही, मूळचं ठिकाण सोडून इथे येऊन राहाण्याचं कारण काय, घरी कधी जाता, या प्रश्नांची काही ना काही उत्तरं पुस्तकातून अमन आपल्यापर्यंत पोचवत राहातो. या प्रश्नांमधून हाताशी लागतो तो भयाण एकटेपणा. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे 'अकेलापन'.

ह्या पुस्तकाची चांगली बाजू काय, तर आपण सामाजिक प्रश्न मांडतोय आणि आपल्याला त्याबद्दल किती कळवळा आहे याविषयी लेखकाने कोणताही आव आणलेला नाही. जी आपसूक कळ कोणत्याही जाग्या असलेल्या डोक्यातून उठेल ती पुस्तकात आहे, पण त्यापलीकडे जाऊन अनावश्यक उरबडवेपणा नाही किंवा आपणच तितके संवेदनशील असला बडेजावही नाही. त्यामुळे अमनभाई बारा टूटीचा एक सुटा का होईना भाग बनू शकतो. तो तिथे पुस्तक लिहायला आलाय आणि आपण त्याच्याशी बोलतोय त्याची नोंद पुस्तकात होणार आहे, आपल्याशी त्याचा वास्ता फक्त पुस्तकातल्या नोंदीपुरताच आहे, याची जाणीव अश्रफभाईला आणि चहाची टपरी चालवणाऱ्या काकाला, लल्लू, रेहान, मुन्ना या इतर मंडळींनाही आहे. त्यांनी अमनला तरीही जितक्यास तितकं तरी स्वीकारलंय.

म्हणजे कधीकधी अश्रफ अमनला मूर्खात काढायलाही कमी करत नाही आणि तेही पुस्तकात नोंदवलेलं असतं. कधी ह्या ग्रुपमधल्या एका कामगाराला टीबी होतो, तेव्हा खरं एकटेपणातलं भयाणपण समोर येतं नि मग हॉस्पिटलसाठी आणि उपचारांसाठी अमनला खटपट करायला लागते. ती तो जमेल तेवढी करतोही. पण तरीही तिसरं प्रकरण नावातच सांगतं ती गोष्ट उरतेच : 'लावारिस'.

मग कोणी वेडा होत चाललेला कामगार मनुष्य अखेरीस ठार वेडा होऊन ट्रकमागे नागडा धावताना दिसतो. पण कोणी काही करू शकत नाही.

आपलं शरीर जोपर्यंत ठिकाठाक आहे तोपर्यंत असलेलं हे स्वातंत्र्य आहे. आपल्याला हवं तेव्हा काम करण्याचं. आपल्याला हवं त्याला फाट्यावर मारण्याचं. अमन ज्या ग्रुपमधे रुळलाय तो ग्रुप रोजंदारी करून पैसे कमावतोय, कुणाकडे कायमस्वरूपी नोकरी करण्यात त्यांना रस नाही. कधी रंगाऱ्याचं काम कर, कधी हमाली, असं त्यांनी कामाचं स्वरूप ठेवलंय. हेच त्यांच्या लेखी स्वातंत्र्य आहे.

पण मग बारा टूटीमधे सरकारी कारवाई होऊन अनधिकृत बांधकाम पाडण्याची सुरुवात झाल्यावर ही मंडळी कुठे जातात? राष्ट्रकुल स्पर्धांसाठी चकाचक होऊ घातलेल्या दिल्लीत अशी कोण कोण मंडळी आणखी कुठे स्थलांतरित झाली?

अश्रफ कोलकात्याला आपल्या जुन्या मित्राकडे गेला. दिल्लीला येण्यापूर्वी तो कोलकात्याला होता तेव्हा त्या दोघांनी एकत्र व्यवसाय केला होता, पण नंतर काही कारणाने अश्रफ दिल्लीला गेला. आता तिथून निघून जावं लागल्यामुळे तो कोलकात्याला परत येतो, पण मित्र तर आधीचा फुटकळ व्यवसाय बंद करून व्यवस्थित दुकान सुरू करून आहे, लग्न झालेलं आहे, व्यवस्थित कुटुंब आहे. अश्रफसाठी तो अजनबी ठरतो. चौथ्या आणि शेवटच्या प्रकरणाचं नाव : 'अजनबी'.
***

गुंतागुंतीचं गणित समजावून सांगितल्यासारखं अश्रफने एकदा सांगितलेलं, ''आदर्श काम तेच ज्यात कमाई आणि आझादी यांचा परफेक्ट बॅलन्स असतो.
''काम हे काम असतं कारण त्यात कमाई असते. कमाई नसेल तर ते काम नाही, तो छंद होईल. काही लोक त्याला सेवा म्हणतात. काही लोक त्याला उपक्रम म्हणतील. पण ते काम नक्कीच नाही. काम म्हणजे जे केलं की माणसाला पैसे मिळतात. ते पैसे म्हणजे त्याची कमाई.
''आमच्यापैकी बरेच जण कमाईकडे पाहून काम निवडतात. महिन्याला सहा हजार रुपये! अशा पैशांनी माणूस श्रीमंत होईल. पण एक महत्त्वाची गोष्ट ते गमावतात. कोणती महत्त्वाची गोष्ट?
आझादी, अमन भाई, आझादी.
''आझादी म्हणजे मालकाला बाझवत गेलास असं सांगण्याचं स्वातंत्र्य. मालक फक्त आपल्या कामावर मालकी सांगू शकतो, तो आपल्यावर मालकी सांगू शकत नाही.''

पान १९


अमन : घर बांधत असताना तुम्ही वेळ कसा घालवता?
कामगार : आम्ही काम करतो.
अमन : पण काम करताना तुम्ही कशाचातरी विचार करत असता का?
कामगार : प्रत्येकच जण करतो.
अमन : तुम्ही कशाचा विचार करता?
कामगार : काम करताना मी कामाचाच विचार करतो
.
पान ३७

रात्रीचे दोन वाजलेत आणि माझा फोन वाजतोय. हल्ली अधूनमधून असं होत असतं. बहुतेकदा तो अश्रफच असतो आणि बहुतेकदा तो प्यालेला असतो. जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ रात्रीही चालू असणारा टेलिफोन बूथ आहे.
''अमन सरजी, फोन करायला खूप उशीर झाला नसेल असं मला वाटतं, पण अश्रफला तुम्हाला 'हॅलो' म्हणावं वाटतंय.''
''हॅलो, अश्रफ.''
''हॅलो, अमनभाई. तुम्ही झोपलेलात काय?''
''होय.''
''हां. मी एवढंच सांगायला फोन केला की, काल चौकात एक मुलगी आलेली आणि तिने किती कामगार आहेत ते विचारलं. मी सांगितलं, 'पन्नास', मग तिने सगळ्या कामगारांना रांगेत उभं राहायला सांगितलं. मग तिने प्रत्येकाच्या हातात दहा रुपयांची नोट दिली आणि ती निघून गेली. हॅलो? ऐकताय ना?''
''हो्.''
''खूप उशीर झालाय ना?''
''होय, अश्रफभाई.''
''मला वाटलं तुमच्या अभ्यासासाठी हे तुम्हाला ऐकायला आवडेल म्हणून मी फोन केला. बाकी, आम्ही सगळे आता पीत बसलोय आणि तुमच्याबद्दलच बोलतोय. म्हणून म्हटलं, तुम्हाला फोनच लावावा.''
''होय. बरंच केलंत.''
''गुड नाईट, अमनभाई.''
''गुड नाईट, अश्रफ.''
पान ४६

''तुम्ही हे काय करताय, अमनभाई?''
''काय करतोय, अश्रफभाई?''
''हेच आमच्यासारख्या लोफर लोकांसोबत वेळ आणि पैसा घालवून दारू पिताय. आम्ही तुम्हाला काय शिकवणारोत?''
''मी पुस्तक लिहायचा प्रयत्न करतोय.''
''पण ते कोण वाचेल?''
''माहीत नाही. कदाचित माझे मित्र ते विकत घेतील किंवा दिल्लीतली आणखी काही माणसं घेतील.''
''पण तुम्हाला पैसा मिळेल का?''
''पैसे मी आत्ताही बऱ्यापैकी मिळवलेत.''
''किती पैसे?''
''एक लॅपटॉप घेता येईल इतके.''
''मग ठिकाय.''
सदर बाझारातल्या इतर लोकांप्रमाणे मलाही पैसे कमावता येतायंत याने सुटल्यासारखं वाटून अश्रफ रस्त्याशेजारी झाडाखाली असलेल्या लहानशा मंदिराजवळ थांबला. ''आईशप्पथ, अमनभाई, तुम्ही खूप पैसे कमवाल.''
''तुम्हीसुद्धा कमवाल, अश्रफभाई.''
''आणि लल्लू - तो माझा मिडियम-टाईप मित्र असला तरी तो माझा एकमेव मित्र आहे, अमनभाई. माझा एकमेव मित्र. आणि रेहानसुद्धा.''
''आणि काकासुद्धा.''
''आपण सगळे श्रीमंत होऊ, अमनभाई.''
''होय, अश्रफ, एके दिवशी आपण सगळे श्रीमंत होऊ.''

पान ८०

व्हिन्टेज / रॅन्डम हाउस इंडिया आवृत्ती - २०१२