Saturday 18 April 2015

कोणत्या प्रकारचा मुकेपणा?

एक प्रकारचा मुकेपणा
- विलास सारंग

It is all very fine to keep silent, but one must also consider the kind of silence one keeps.

(मुकाट राहणं वगैरे ठीक, परंतु कोणत्या प्रकारचा मुकेपणा आपण राखतो याचाही विचार करायला हवा.)

- सॅम्युअल बेकेट ('दि अन्-नेमेबल')

उद्या सकाळी सगळे वेळेवर जमतील. ह्या खुर्चीचा कधीतरी भुगा-भुगा होऊन जाईल. तऱ्हेतऱ्हेचे प्राणी सरपटत किनाऱ्यावर येतील. ही वही भरून जाईल. रस्ता ओलांडू पाहणारी बहुतेक माणसं पलिकडल्या बाजूला पोहचतील. सगळ्या वस्तू त्रिकोणी बनतील. तीनचार अधिकारी हरेक जिनसेवर I. S. I.चा शिक्का मारीत सुटतील. या ना त्या हाताकरवी पानं उलटली जातील. माणसं मरतील. जनावरं जगतील. दिवे भडकतील. कॅलेंडरं सदेह स्वर्गाला जातील.

                                                                 असे प्रश्न मला का पडतात? चारांपैकी कोणत्या भिंतीत गुप्तधन पुरलेलं आहे? उरलेले संदर्भ केव्हा सापडतील? तो कधी गेला? हे कधी आले? खिडक्या आपोआप कशा बंद झाल्या? कोणाकोणाच्या पायाला सूज आली आहे? मागे उल्लेखिलेले पर्वतप्राय प्राणी केव्हा दृग्गोचर होती? हे कसले आवाज कानांवर पडताहेत? ही पुस्तकं कोरी का? या टाचण्यांची दोन्ही टोकं तीक्ष्ण कशासाठी? 

आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले. जे आले ते फूटपट्टीच्या भावाने विकले गेले. त्याने वेगवेगळे आविर्भाव करून पाहिले. ट्यूबमधून टूथपेस्ट बाहेर येताच ते दशदिशांना पळाले. तिचे डोळे गेले.
                                                                                                                      पक्षी उडाला, तर फांदी 
मोडेल. आम्हाला हमी दिली गेली, तर आम्ही फोन करण्याचा प्रयत्न करू. तोंड उघडलं, तर अळ्यांची घृणास्पद हालचाल दृष्टोत्पत्तीस येईल. अनवधानाने मान वळवली, तर हृदयक्रिया बंद पडेल.

पेपरवेटशी चाळा
करणं धोक्याचं आहे.

...

मौज प्रकाशन । पहिली आवृत्ती: जून१९८६
मुखपृष्ठ: बाळ ठाकूर
एक प्रकारचा मुकेपणा, ही कविता आणखी आहे पुढं. छापील पुस्तकातली मांडणी इथं या पडद्यावर तशी करता आलेली नाही, जमेल तेवढी तशी ठेवायचा प्रयत्न केला आहे, पण बहुधा ती प्रत्येकाला आपापल्या पडद्यानुसार वेगवेगळी दिसत असणार, त्यामुळं मांडणीतल्या दोषाबद्दल माफी.

ही कविता, मौज प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या 'कविता : १९६९-१९८४' या सारंगांच्या पुस्तकात आहे. सारंगाचं १४ एप्रिलला निधन झालं. त्यानंतर मराठी वृत्तवाहिन्यांना काही करावंसं न वाटणं साहजिक आहे. मराठी-इंग्रजीत इतकी वर्षं लिहिता असलेला लेखक मुंबईत गोरेगावातून आपल्याला सोडून जातो, याच्याशी इंग्रजी वर्तमानपत्रांना काही देणंघेणं नाही, हेही साहजिक आहे. मराठी वर्तमानपत्रांमधे काही ना काही आलं. लोकसत्तेनं १५ एप्रिलला पहिल्या पानावरची मुख्य बातमी सारंगांच्या जाण्याची केली होती, शिवाय विशेष संपादकीयही लिहिलं, हे नोंदवण्यासारखं. शिवाय, इतर मराठी वर्तमानपत्रांमधे पण काही ना काही आलं. कदाचित उद्याच्या किंवा त्याच्या पुढच्या रविवार पुरवण्यांमधे अजून काही करतील. पण सारंगांच्या बाबतीत जे बोललं जाईल- एवढ्या वेळेपुरतं तरी, ते नक्की काय आहे, त्यात असलेला कमी-जास्त मुकेपणा नक्की कशा प्रकारचा आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं. माध्यमं कशाबद्दल बोलतात नि कशाबद्दल मुकी राहतात, या दुसऱ्या एका प्रश्नाचं उत्तर आपल्या कुवतीनुसार शोधण्यासाठी आपण पाच वर्षं रेघ मारत बसलोय. त्याच्याशी सारंगांचा काही ना काही संबंध आहे, हे वरच्या कवितेतल्या काही ओळींवरून वाचकांनाही वाटेल, अशी आशा आहे. किंवा मग रेघेवर आत्तार्यंत किमान सहा नोंदींमधे आलेले सारंगांचे संदर्भ पाहता येतील-

विलास सारंग, फ्रान्झ काफ्का व पत्रकारिता
रस्त्याकडची खिडकी
आल्बेर काम्यू : ४ जानेवारी
प्रकाश नारायण संत : दहा वर्षं। आठवण व पळवाट
'अन्वीक्षण' त्रैमासिकाच्या निमित्ताने नोंद
'लॅफम्स क्वार्टरली', आधी होऊन गेलेले लोक आणि सदानंद रेगे

अजूनही असतील कदाचित नोंदी, पण एवढं काही काटेकोर मोजलेलं नाही. सारंग म्हणजे अशा अनेक संदर्भांचं जाळं होते. साहित्यातून बोलण्याऐवजी साहित्याबाहेरच कायतरी मोठमोठ्यानं बोलणं, आणि सोईस्कर गप्प बसणं, आणि त्यातून बंडखोरी-बंडखोरी असंच सारखं खेळत बसणं, हे खूप आपल्याकडं जरा जास्तच वाढलंय. यावर काही तपासणी करून शोधणं शक्य आहे का ते माहीत नाही, पण जाणवलेलं नोंदवलं. सारंगांच्या शब्दांमधे, सगळं इन्ब्रीडिंगनं कोळपलेलं वाटतं. पण तरीही सारंग या साहित्य- वाङ्मयाच्या जाळ्यात आपली वीण इतकी वर्षं मन लावून घालत बसले होते. ती वीण आता थांबली.


दुसरी गोष्ट- वसंत गुर्जर यांच्या 'गांधी मला भेटला' या कवितेवरून सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात झाल्याची बातमी मात्र मराठीसोबतच इंग्रजी वर्तमानपत्रांमधेही आलेय! (इकॉनॉमिक टाइम्सडीएनएटाइम्स ऑफ इंडिया । लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स). ही कविता बीभत्स आणि अश्लील असल्याच्या आरोपावरून गेली कित्येक वर्षं हा खटला चालू आहे. नुसती कविता असली तर कोण कशाला वाचेल, पण ती बीभत्स-अश्लील असल्याचा आरोप असेल, त्यातही तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला असेल, तर एवढ्या बातम्या! पतित पावन संघटनेनं यासंबंधी मुळात तक्रार दाखल केली होती. या संदर्भात वकील, प्रकाशक वगैरे मंडळी मदतशीर निघाल्यामुळं गुर्जरांना न्यायालयाच्या वाऱ्या करण्याचा आणि आर्थिक खर्चाचा भार उचलावा लागलेला नाही, हेच त्यातल्या त्यात समाधान मानू. गुर्जरांचं वय पाहून त्यांच्या बाबतीत काही लोकांना आस्थेपोटी या शंका असल्याचं कळलं, म्हणून हे स्पष्टीकरण इथं नोंदवूया. ही माहिती गुर्जरांकडूनच मिळाली. पण भविष्यात त्यांना त्रास होईल किंवा नाही, हे आत्ता आपल्याला सांगता येणार नाही.  (गुर्जरांबद्दल अधिक माहितीसाठी हे पाहता येईल: vasantdattatreyagurjar.blogspot.in). या खटल्यासंबंधी गुर्जरांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेली प्रतिक्रिया अशी आहे:
''मी कवितेत जे काही म्हटलेय ते गांधींसंदर्भात नाही, तर गांधींच्या पश्चात सगळ्याच पातळ्यांवर भारताचं जे अवमूल्यन झालेय, त्यावर टीका करणारी ही कविता आहे. गांधींच्या पश्चात माजलेली ही अराजकता असल्यामुळेच, ही कविता ज्या पोस्टरवर छापून आली होती, त्या पोस्टरवर गांधीजींचे पाठमोरे रेखाचित्र छापण्यात आले होते. पण कवीला अपेक्षित असलेला व्यंग्यार्थ, कवितेवर खटला दाखल करणा‍ऱ्यांना कळलाच नाही, ही अभिव्यक्तीची शोकांतिका आहेच, पण त्यांना गांधी कळला नाही, याचेही हे उत्तम उदाहरण आहे.''
खटल्यामध्ये कवितेचं जे प्रकाशन गृहीत धरलंय ते ऑल इंडिया बँक असोसिएशनच्या नियतकालिकामधलं-१९९४ सालचं आहे. त्यापूर्वी १९८४ साली- ती कविता मुळात पोस्टर रूपात प्रकाशित झाली होती, ते पोस्टर चार घड्या केल्यावर हाताच्या आकारात बसतं आणि मग ते असं दिसतं:

चित्रात दिसणाऱ्या अंधुक रेषा गांधींच्या पेहेरावातल्या

खरं म्हणजे पतित पावन संघटनेला गांधींबद्दल एकदम आस्था दाटून येणं हे या संघटनेच्या एका प्रकारच्या मुकेपणाचंच लक्षण आहे. किंवा चलनी नोटेवर गांधींचा चेहरा छापून, त्यांच्या पाठीमागं काय चाललंय याविषयी बोलतानाही काही मुकेपणा अपेक्षित आहेसं दिसतोय. किंवा एकूणच साहित्याचंही आपण काय करतोय, हाही नक्की कोणत्या प्रकारचा मुकेपणा आहे, हेही माहीत नाही. सारंगांची मराठी पुस्तकं प्रख्यात असलेल्या मौज प्रकाशनानं काढली, काही इंग्रजी पुस्तकं 'पेंग्वीन'नं काढली, त्यामुळं त्यांच्याबद्दलचा मुकेपणा कसाही असला, तरी किमान पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. गुर्जरांची पुस्तकं (प्रास प्रकाशन, वाचा प्रकाशन, राजा ढाले प्रकाशन) आता बाजारात उपलब्ध नाहीत. पत्रकार मंडळी प्रश्न विचारण्याऐवजी हल्ली उत्तरंच घेऊन बसलेली असतात स्टुडिओत नि रकान्यांमधे, तर हा मुकेपणा कसला आहे याचं उत्तर त्यांना माहीतच असेल, आपण मात्र इथं सारंगांच्या जाण्याचं आणि गुर्जरांची पुस्तकं उपलब्ध नसण्याचं दुःख म्हणून ही लहानशी नोंद करून ठेवूया. गुर्जरांच्या प्रतिक्रियेत उल्लेख झालेली अभिव्यक्तीची शोकांतिका, आपला मुकेपणा कोणत्या प्रकारचा आहे त्याचं अंधुक उत्तर देतेय काय?

1 comment:

  1. < साहित्यातून बोलण्याऐवजी साहित्याबाहेरच कायतरी मोठमोठ्यानं बोलणं, आणि सोईस्कर गप्प बसणं, आणि त्यातून बंडखोरी-बंडखोरी असंच सारखं खेळत बसणं, हे खूप आपल्याकडं जरा जास्तच वाढलंय. यावर काही तपासणी करून शोधणं शक्य आहे का माहीत नाही, पण जाणवलेलं नोंदवलं. > हे आधीपासून होतंच, आता सोशल मीडियामुळे जास्त वाढल्यासारखं भासतंय.
    मुळात साहित्यिक काही पूर्णवेळ साहित्यिक नसतात आणि बाकीवेळ आपापल्या तर्‍हेचं माणूसच असतात. त्यामुळे साहित्यिक नसतानाच्या वेळेत ते साहित्यबाह्य गोष्टी करणारच.
    याबाबत काल एक नोंद लिहिली होती, ती अशी होती :
    लेखक हाच जेव्हा काही लेखकांचा लेखनविषय बनतो तेव्हा, किंवा लेखनविषयाहून लेखकपणाभोवतीचं असलं-नसलेलं वलय कुरवाळत बसावं वाटतं तेव्हा... असे प्रॉब्लेम सुरू होतात. दारूपायी लेखक बरबाद झाले, असं गेल्या पिढीतले काही निर्व्यसनी हळहळत म्हणत; तसंच पुरस्कार, मानसन्मान, सरकारी वा बिगरसरकारी संस्थांमधली पदं यातही बरेच बरबाद झाले. मग मला वा माझ्या आवडत्या अमुकला काय मिळालं वा मिळालं नाही आणि ते दुसर्‍यांना कसं मिळालं ही फणफण सुरू होते. यात पुस्तकांची तुलनेत अधिक विक्री, लोकप्रियता, मिळणारं मानधन ही कारणंही समाविष्ट आहेत. पुढचं लेखन सुचत नसलं किंवा दोन लेखनांच्या दरम्यान दरी/अंतर असलं की असले उद्योग सुचतात. काही लोक या 'दरम्यान'चा मासिकं प्रकाशित करणं, अनुवाद करणं, संपादनं करणं असल्या साहित्याशी निगडित, पण लेखनबाह्य कामांसाठी चांगला उपयोग करतात. काही असल्या गोष्टींमध्ये वेळ घालवतात. लेखक राजकारणी, धनदांडगे, बाजारू, चमचेखोर, वशिलेबाज यासह वा याखेरीज भष्टाचारी, दारूबाज, बाईबाज / पुरुषबाज, लाचार, भेकडभित्रे इत्यादी असे अजूनही बरेच काही असू शकतात. जातीधर्मलिंगभेदही आहेतच. बाकी आयुष्यात ते काहीही असोत, त्यांचं लेखन कसं आहे हाच एक निकष लावून पाहिल्यावर जे उत्तर सापडेल ते खरं असेल. त्यात मतभेद असतील, असावेत. लेखनाबाबत उलटसुलट चर्चा व्हाव्यात. ते योग्य.

    ReplyDelete