Monday 16 September 2013

'हिमाल' त्रैमासिकाच्या निमित्ताने इतिहास व पत्रकारिता : एक बारकी नोंद

'हिमाल' : जुलै-ऑगस्ट-सप्टेबर अंक
'हिमाल' या त्रैमासिकाविषयी थोडीशी माहिती लिहून ठेवणं आणि त्या निमित्ताने पत्रकारितेसंबंधीचा एक मुद्दा नोंदवण्याचा आपल्या कुवतीनुसार प्रयत्न करणं, हा या नोंदीचा हेतू आहे. 'हिमाल' हे नेपाळमधल्या ललितपूर या शहरातून प्रकाशित होणारं इंग्रजी भाषेतलं त्रैमासिक आहे आणि त्याचं नाव नुसतं 'हिमाल' नाहीये, तर 'हिमाल : साउथ-एशियन' असं आहे. म्हणजे त्यांचा मुख्य दृष्टिकोन 'दक्षिण आशियाई' असा त्यांनीच स्पष्ट केलाय. आपल्या शेजारच्या एका लहानशा देशातून निघणारं हे नियतकालिक आहे, म्हणून नोंदीला जास्तीचं कारण मिळालं. शिवाय, 'हिमाल'चा जुलै-ऑगस्ट-सप्टेंबरचा अंक 'इंटरनेट' या विषयाला वाहिलेला आहे, हेही एक कारण. या अंकाचं मुखपृष्ठ शेजारी तुम्हाला दिसेलच. या छापील अंकातला मजकूर आपल्याला आत्ता वाचायला मिळत नसला, तरी त्यांनी खास वेबसाइटसाठी मजकूर प्रसिद्ध केलाय, त्यात इंटरनेटसंबंधी / माहिती-तंत्रज्ञानासंबंधी काही आधीचे आडाखे तपासणारा आणि काही आडाखे बांधणारा लेख, फेसबुकवरच्या 'काव्या'बद्दलचा लेख, असे काही रोचक लेख वाचायला मिळू शकतील. या अंकाबद्दल एवढंच नोंदवून पुढे वळू. पुढे म्हणजे कुठे, ते पुढे येईलच.

चालू वर्षाच्या जानेवारीपासून 'हिमाल' पुस्तकाच्या आकारात प्रसिद्ध होतंय, अशी माहिती त्यांनी वेबसाइटवर दिलेय. या छापील अंकाशिवाय वेबसाइटवरही ते स्वतंत्रपणे मजकूर प्रसिद्ध करत असतात. शिवाय जुना मजकूरही वाचायला मिळतोच. 'हिमाल'चं वैशिष्ट्य काय, तर मोठमोठे लेख छापायचे, किंबहुना मोठमोठे लेख असतात म्हणूनच छापायचं. दीर्घ लेखनाच्या पत्रकारितेची जपणूक करण्यासाठी छापील स्वरूप कायम राखणं आवश्यक वाटल्याचं 'हिमाल'वाले म्हणतात. बाकी, पुस्तक रूपामधल्या आत्ताच्या ताज्या अंकाची भारतीय चलनामधली किंमत निघाली ५३४.९६ रुपये! त्यामुळे आपण प्रत्यक्षात कधीच हा अंक हातात घेतलेला नाहीये, म्हणून त्याच्या रूपाबद्दल बोलणं अवघड आहे. पण तरी 'हिमाल'च्या अंकांमधले काही जुने लेख आपल्याला त्यांच्या वेबसाइटवर वाचता येतातच आणि त्यात त्यांना ज्या पत्रकारितेची वैशिष्ट्यं जपावीशी वाटतायंत ती कमी-अधिक प्रमाणात दिसतात.

उदाहरणार्थ, रोमिला थापर यांचा 'दक्षिण आशियाई भूतकाळाचा शोध' हा जुलै २००८च्या अंकातला लेख घ्या. जवळपास साडेसहा हजार शब्दांचा हा लेख आहे. या लेखात थापर यांनी भारतीय इतिहासाकडे पाहताना पाश्चात्त्य दृष्टीतून बाहेर येण्याची जाणीव, या जाणिवेला असलेले अनेक संदर्भ यांच्याबद्दल लिहिलंय. यात मग सत्ताधाऱ्यांच्या घडामोडींमधून इतिहास पाहण्याऐवजी लोकांच्या घडामोडींमधून इतिहासाची मांडणी करण्याचा एक खास डाव्या विचारसरणीतला मुद्दा आहे आणि आपल्या इतिहासाकडे पाहण्याच्या दृष्टीत वसाहतिक व राष्ट्रवादी वृत्तींनी कसे घोटाळे केले इथपासून भारतीय इतिहासाकडे पाहताना जातवास्तवाचं भान कसं आवश्यक आहे, इथपर्यंत विविध मुद्दे येतात. इथे थापर एके ठिकाणी म्हणतात :
...जागतिक इतिहासाचा अभ्यास केवळ नागरसंस्कृतींचा गठ्ठा अशा स्वरूपात केला जाऊ शकतो, हा कालबाह्य विचार अजूनही अस्तित्त्वात आहे. पण 'नागरी' लोकांच्या सोबतीने 'अ-नागरी'ही असतात, त्यांना 'कायद्याशिवाय जगणारे दुय्यम वंश' संबोधलं जात असे. वसाहतिक व्याख्यांनुसार उच्चजातीय हिंदू म्हणजे 'नागर' होते, तर वनांमध्ये राहणारे व निम्नजातीय किंवा त्या खालील लोक हे 'प्रिमिटीव्ह' (ढोबळ अर्थाने - आदिम / आदिवासी) अशा लेबलाखाली गणले गेले. हे लेबल आजतागायत लोकप्रिय रूचीमध्ये रुळून गेलेलं आहे.
अजून बरेच मुद्दे थापर यांच्या प्राथमिक स्वरूपाच्या आणि सुंदर असलेल्या लेखात आहेत, पण आपण त्या मुद्द्यांच्या खोलात जाऊ शकत नाहीयोत, कारण ती 'रेघे'ची मर्यादा आहे. आता ह्या मर्यादेसकट परत आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊ. थापर यांच्या लेखातून जो बिंदू आपण नोंदवला त्यातून 'हिमाल'चा दृष्टिकोन थोडासा स्पष्ट होईल, पण बाकी पत्रकारितेचा यात अजून काय संबंध?

संबंध आहे. त्यासाठी पत्रकारितेचा इतिहासाशी जो संबंध असतो, त्याबद्दल काही शोधण्याचा प्रयत्न करू. इतिहासाचं ज्ञान नसलं, तरी भान असायला हवं, मग पत्रकारितेला काही अर्थ राहील नि काळाशी तिची कायतरी सांगड घालता येईल. थापर यांच्या ज्या लेखाचा उल्लेख वर केला, त्यात त्या शेवटाकडे असंही म्हणतात :
जी गोष्ट घडली होती असं मानणं आपल्याला आवडतं त्यात आणि पुरावे आपल्याला काय सांगतात यात अतिशय बारीक रेषा असते.
थापर यांचं वाक्य मुख्यत्त्वे इतिहासाबद्दल / इतिहासलेखनाबद्दल आहे. पण पत्रकारितेतल्या लेखनालाही हे लागू होईल. आता हे लागू कसं होईल ते शोधण्यासाठी आपल्याला ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते शरद् पाटील यांची मदत घेणं भाग आहे. थापर यांच्या लेखाचा जो रोख आहे त्या रोखाने काही अधिक मूलभूत काम शरद् पाटील यांनी केल्याचं अनेकांना माहीत असेल. त्या संपूर्ण कामाबद्दल काही साधं लिहू धजण्याचीही 'रेघे'ची आत्ताची क्षमता नाहीये. पण पाटलांनी एके ठिकाणी एक वाक्य लिहिलंय, ते असं :
इतिहासज्ञाचे काम ऐतिहासिक घटनेच्या सिद्ध सत्यतेबद्दल शंका उपस्थित करीत राहणे हे नसून, त्या घटनेला जन्म देणाऱ्या कारणाचा वा कारणांचा शोध घेणे हे असते.
(दास-शूद्रांची गुलामगिरी, मावळाई प्रकाशन, आवृत्ती दुसरी - २००८)
या वाक्यात एका अर्थी इतिहासज्ञाच्या कामाची मर्यादाही स्पष्ट केलेय. अशी पत्रकारितेचीही मर्यादा स्पष्ट करता आली, तर बरं होईल. पाटील यांच्या वरच्या वाक्यातल्या सगळ्या शब्दांचे अर्थ आपल्या मुद्द्याला जोडून शोधता येतील. मग कदाचित- पत्रकाराचं काम समकालीन घटनेच्या सिद्ध सत्यतेबद्दल वारंवार शंका उपस्थित करत राहणं हे असून त्या घटनेला जन्म देणाऱ्या कारणाचा वा कारणांचा शोध घेणं हेही त्यात येतं, असं कोणी म्हणू शकेल. काम मोठं जोखमीचं आहे आणि एकट्याचं नाहीच नाही. कारण एकच व्यक्ती असण्याची मर्यादा - डोक्याची नि वेळेची. 'रेघे'च्या डोक्याची ताकद आत्ता फारच मर्यादित असल्यामुळे आपल्याला यापेक्षा हा मुद्दा आणखी खोदत जाणं शक्य होत नाहीये. हे तसं लाज वाटणारं आहे,  पण कदाचित शंभर-दीडशे वर्षांनी तितपत ताकदीचे झालो तर 'रेघे'वर या मुद्द्याच्या आणखी खोलातलं काही शोधू. (बाकी, शरद् पाटलांचं वय तसंही एकोणनव्वद वर्षं एवढं आहे नि उंची सहा फूट. म्हणजे आपली काही स्पर्धा होऊ शकत नाही.)

नोंदीची सुरुवात 'हिमाल'च्या अंकाची माहिती देण्यापासून झाली. त्यानंतर 'हिमाल'च्या दृष्टिकोनाच्या निमित्ताने आपण 'इतिहास' या गोष्टीकडे वळलो, आणि तिथून 'पत्रकारिता नि इतिहास' याबद्दल एक बारकी नोंद पूर्ण करण्यापर्यंत येऊन पोचलो. 'लॅफम्स क्वार्टर्ली' या आणखी एका त्रैमासिकाच्या निमित्ताने आपण यापूर्वीही 'रेघे'वर या मुद्द्याकडे जाणारी नोंद केलेली आहे. त्याला जोडून आजची नोंद पाहता येईल.

जाता जाता : शरद् पाटलांबद्दल 'गुगल'च्या मदतीने सहज शोध घेतला तर एका पत्रकाराच्या एका लेखावर पोचायला झालं. आत्ताच्या मे महिन्यामध्ये निधन झालेले प्रामाणिक पत्रकार श्रावण मोडक यांनी 'पुस्तकविश्व' या संकेतस्थळाच्या २०१०च्या दिवाळी अंकासाठी 'कृतज्ञ' असा एक लेख लिहिला होता. आपल्याला ज्या पुस्तकांमुळे भान आलं त्यातल्या काही पुस्तकांची कृतज्ञतापूर्वक नोंद करणं एवढा साधासा विषय आहे लेखाचा. या लेखात शरद् पाटलांच्या खंडाचा उल्लेख आहेच. आपल्या नोंदीतल्या म्हणण्याशी थेट संबंधित नसलेला, तरीही एका अर्थी त्याला आधारासारखा लेख वाटला म्हणून..

बाकी, सुरुवात 'हिमाल'वरून केलेली, तर शेवटही तिथेच जाऊन करू. सगळंच काय पटावं असं काही नाही, पण काय आहे याची तरी नोंद करावी, एवढाच हेतू. आता हे 'हिमाल' म्हणजे आहे तरी काय, ते आपण कितपत चांगल्या पद्धतीने नोंदवलं काय माहीत, पण त्यांनीच ते एका पोस्टरमध्ये असं नोंदवलंय पाहा :

हिमाल : पोस्टर

No comments:

Post a Comment