Wednesday 19 December 2012

१२/१२/१२ : अबुझमाडच्या जंगलात

'तेहेलका'च्या वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या मजकुराचं मराठी भाषांतर. मूळ मजकूर- The Truth Behind the 12/12/12 Abujmarh Encounter
***


मुंगेली मडावी (फोटो : तेहेलका)
महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवर, अबुझमाड जंगलातल्या वाला या गावात मुंगेली मडावी रडायचं थांबत नाहीत. त्यांचा १८ वर्षांचा मुलगा चैनू याचं नक्षलवाद्यांनी १२ डिसेंबरला अपहरण केलं. लगेच काही दिवसांनी पोलीस चकमकीत त्यांचा मुलगा मारला गेला. मुलाच्या मृत्यूबद्दल नक्षलवाद्यांना दोषी धरायचं की पोलिसांना हे अजूनही मडावींच्या ध्यानात येऊ शकलेलं नाही.

नक्षलवादी शस्त्रप्रशिक्षणासाठी मुलांना जबरदस्तीने उचलून नेऊ लागले, त्यानंतर बस्तरच्या उत्तर भागात परालकोट पंचक्रोशीत नक्षलवादी आणि पोलीस दोघांविरोधतही तीव्र रोष निर्माण झाल्याचं दिसतं. या संदर्भात पोलिसांनी १२ डिसेंबर २०१२ रोजी कारवाई केली.

१२/१२/१२ असं गुप्त नाव देण्यात आलेल्या या कारवाईत १२ डिसेंबरला अबुझमाडच्या जंगलात अडीचशे पोलिसांनी प्रवेश केला आणि वाला नि सित्राम या दोन खेड्यांच्या दरम्यानच्या कुठल्यातरी ठिकाणी उभारलेला नक्षलवादी तळ उद्ध्वस्त केला. आपण आठ नक्षलवाद्यांना मारलं असून नऊ जणांना अटक केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. चैनू मडावीचं शव आणि 'आयईडी' (इम्प्रोव्हाईज्ड एक्स्प्लोजीव्ह डिव्हाईस) माध्यमांना पुरावा म्हणून दाखवण्यात आलं. ही कारवाई अत्यंत यशस्वी झाल्याचं पोलीस सांगत असले, तरी 'तेहेलका'च्या तपासणीत असं दिसून आलं की, नक्षलवादी नि पोलिसांच्या उंदरा-मांजराच्या खेळात गावकरी भक्ष्यस्थानी अडकले आहेत.

कांकेरचे पोलीस अधीक्षक राहुल भगत म्हणाले की, जंगलात शस्त्रांचं प्रशिक्षण शिबीर सुरू होतं असं ताब्यात घेण्यात आलेल्या सामग्रीवरून स्पष्ट होतं. पकडण्यात आलेल्यांच्या अंगावर नेहमीच्या कपड्यांवर नक्षलवादी गणवेष घातलेला होता. पण त्यापैकी बहुतेक जण १५ वर्षांखालचे असल्यामुळे त्यांना बालसुधार गृहात पाठवण्यात आलं.

अटक झालेल्या नऊ जणांपैकी सहा जण सित्राम गावातील आहेत. त्यांपैकी चार जण - शांती नुरेटी, मुकेश्री यादव, राजी कवसी व सचिन मडावी - हे १३-१४ वर्षांपेक्षा जास्त वयाचे नाहीत, असं गावकरी सांगतात. रामसू नायक नि अमन सिंग ठाकूर हे उर्वरित दोघे २० वर्षांचे आहेत.

बुधवारी (१२ डिसेंबरला) नक्षलवाद्यांनी प्रत्येक घरातून एक व्यक्ती - मुख्यत्त्वे मुलं- शस्त्रप्रशिक्षणासाठी पकडून नेली आणि शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जोरदार गोळीबाराचा आवाज ऐकू आला, असं गावकरी सांगतात. नक्षलवाद्यांनी जबरदस्तीने नेलेल्या सर्व मुलांना पोलिसांनी अटक केल्याचं नंतर गावकऱ्यांच्या लक्षात आलं.

पोलीस आल्याआल्या नक्षलवादी पळून गेले, असं नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या एका १६ वर्षांच्या मुलाने सांगितलं. मागे राहिलेल्यांना पोलिसांनी घेराव घातला आणि चैनूला हातातली बंदूक खाली ठेवायला सांगितलं, चैनूने तसं करण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या. पोलिसांनी पहिल्यांदा गोळ्या झाडल्याचं या मुलाने सांगितलं.

मुलांना प्रशिक्षणाला पाठवण्यास जे लोक नकार देतील त्यांना नक्षलवाद्यांनी धमक्या दिल्या आणि दंडही ठोठावला, असं गावकरी सांगतात. प्रशिक्षण तळावरून अटक करण्यात आलेल्या सचिन मडावी या आठवीत शिकणाऱ्या मुलाची आई सुनिता मडावी सांगतात की, काही वर्षांपूर्वी सचिनच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तोच कुटुंबातला एकमेव कमावता व्यक्ती होता. कथित चकमकीनंतर पोलिसांनी त्याला अटक करून जेव्हा ओळख पटवण्यासाठी गावात आणलं तेव्हा आपल्याला त्याच्या समोरही येऊ दिलं नाही, असा आरोप सुनिता करतात. पण, दोन दिवसांनी त्या पंखजूर पोलीस स्थानकात गेल्या तेव्हा त्यांना आपला मुलगा नक्षलवादी गणवेषात दिसला.

सचिनची आजी मौनीबाई सांगतात की, 'नक्षलवादी नेहमीच जबरदस्तीने मुलांना घेऊन जातात. सचिनचंही तसंच झालं. आम्ही शेतात झोपलेलो, तेव्हा अचानक नक्षलवादी आले नि जबरदस्तीने सचिनला घेऊन गेले'.

राजी कवासीचे वडील जुदूही या माहितीला दुजोरा देतात. ते सांगतात की, 'राजी तिच्या काकांबरोबर नारायणपूरमधे राहायची आणि मला भेटायला आठवड्याभरापूर्वीच गावी आली होती. ती पूर्वी कधीच नक्षलवाद्यांबरोबर नव्हती, पण ती पकडली गेली.'

शांती नुरेटीचे वडील संकू नुरेटी म्हणाले, 'सध्या कापणीचा मोसम असल्यामुळे आमचं सगळं कुटुंबच शेतात झोपलं होतं. तेव्हाच नक्षलवादी शांतीला घेऊन गेले.'

हीच कथा गावातल्या इतरांच्या तोडूनही ऐकायला मिळाली.

मसुराम उसेंडी (फोटो : तेहेलका)
सित्राम गावापासून नऊ किलोमीटरवर असलेले वाला गाव परालकोट पंचायतीमधे येतं. पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी समको हिचे वडील मसुराम उसेंडी यांचा आपल्या मुलीची व्यथा कोणी कधी मांडेल यावर विश्वासच बसत नाही. समको गेली दोन वर्षं अंगणवाडीमधे आचारी म्हणून काम करत होती. बुधवारी दुपारी ती घरी जेवण तयार करत असताना नक्षलवादी जबरदस्तीने तिला जबरदस्तीने घेऊन गेले. वाला गावातून समकोबरोबर आणखी पाच जणांना नक्षलवाद्यांनी पळवून नेलं.

चैनूची आई मुंगेली सांगते, 'चैनू भीतीपोटी नक्षलवाद्यांसोबत जायचा आणि त्याला त्यांच्या बंदुका उचलायला सांगितलं जायचं.' वालापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या पंखजूर पोलीस स्थानकात आपल्या मुलाचं शव ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या मुंगेली यांना अंत्यविधीसाठी पोलिसांकडून बाराशे रुपये देण्यात आले. पण परिसरातील दुर्गमतेमुळे त्या मुलाचं शव गावी परत आणू शकल्या नाहीत नि त्यांनी पंखजूरमधेच त्याला दफन केलं.

चैतुराम नुरेटी (फोटो : तेहेलका)
नक्षलवाद्यांकडून प्रशिक्षण मिळालेला पण पोलिसांच्या कारवाईपासून पळण्यात सफल झालेला सोळा वर्षांचा चैतुराम नुरेटी सांगतो, 'प्रशिक्षणासाठी आणखी तरुणांना आणायला मला जवळच्या कोंगे गावात पाठवलं होतं. पोलिसांची कारवाई झाली तेव्हा मी तळावर नव्हतो. कारवाई झाली त्या दिवशी सकाळी मुलांना शारीरिक कवायती शिकवल्या जात  होत्या.'

रुकानी आणि समारी मेतामी या अनुक्रमे आठ आणि दहा वर्षं वय असलेल्या मुलींशीही 'तेहेलका'ने संवाद साधला. त्या दोघीही प्रशिक्षण तळावर होत्या, पण प्रशिक्षण कशाचं होतं हे सांगणं त्यांना जमलं नाही. पण पोलीस आल्यावर नक्षलवादी पळून गेले आणि नंतर पोलिसांनी गोळीबार सुरू केला, असं मात्र त्यांनी सांगितलं.

पोलीस अधीक्षक राहुल भगत म्हणतात, 'नक्षलवादी लहान मुलांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देत होते. या कारवाईदरम्यान मानवाधिकारांचा भंग होणार नाही याची आम्ही अतिशय काळजी घेतली. (मृतांपैकी) दोन्ही मुली रमबती सोरी आणि मसलो परालकोट या स्थानिक दलमच्या सदस्य होत्या.' तळावरच्या कपाटातलं सामानही त्यांनी जाळल्याचा दावा पोलिसांनी केला, पण 'तेहेलका'ला घटनास्थळी कोणतंही कपाट सापडलं नाही.
रुकानी व समारी मेतामी (फोटो : तेहेलका)

या मोठ्या यशाबद्दल पोलीस स्वतःची पाठ थोपटत असताना, नक्षलवादी मात्र गप्प आहेत. गावकरी आपल्या मुलांच्या भवितव्याबद्दल संभ्रमित आहेत. आपण मुलांना भेटण्यासाठी तुरुंगात गेलो असताना पोलिसांनी आपल्याकडून कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

या भागातल्या गावांमधल्या मुलांची सुरक्षा हा चिंतेचा विषय बनला असून पुढच्या शुक्रवारी त्यासंबंधी बैठक बोलावण्यात आली आहे. जंगलातील आतल्या भागांमधील लोकांनाही बैठकीसाठी बोलावणं पाठवण्यात आलंय. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा अवस्थेत गावकरी अडकले असून, एकीकडे त्यांना नक्षलवाद्यांच्या प्रशिक्षण शिबीरांना जबरदस्तीने स्वतःच्या मुलांना पाठवावं लागतंय तर दुसरीकडे त्यांनाच पोलिसांकडून अटक होतेय नि तेच जहाल नक्षलवादी असल्याचं चित्र उभं केलं जातंय.

1 comment:

  1. सुन्न करणारं आहे सगळं. चार भिंतीत सुरक्षित, सोयीने दु:ख व्यक्त करत बसण्यापेक्षा आपण काही करू शकतो का? काही मार्ग आहे का?...अश्विनी

    ReplyDelete