Tuesday 13 September 2011

रघू दंडवते : निखळ मराठी गद्यशैलीचा लेखक

- चंद्रकान्त पाटील

(रघू दंडवते गेले त्याला आजच्या १३ सप्टेंबरला दोन वर्षं पूर्ण होतायंत. त्यांची आठवण काढण्यासाठी चंद्रकान्त पाटील यांचा हा लेख येथे प्रसिद्ध होत आहे. दंडवते गेले त्यानंतर 'सकाळ'मध्ये हा लेख मूळ प्रसिद्ध झाला होता, तो या ब्लॉगवर पोस्ट करायची परवानगी पाटील यांनी दिली, त्यांचे आभार मानून हा लेख इथे)

रघू दंडवते
रघू दंडवते नावाचा एक विलक्षण माणूस रविवारी रात्री नगरसारख्या शांत ठिकाणी कालवश झाला. फार थोड्या लोकांना रघू माहीत असेल; आजच्या पिढीला तर त्याची माहिती अशक्‍यच आहे. आजच्या पिढीला इतिहासाचे आणि त्यातही वाङ्‌मयेतिहासाचे जास्तच ओझे वाटते. रघू साहित्यातला एक अफलातून माणूस होता; पण लघुनियतकालिकांतल्या काही लोकांपुरतीच त्याची ओळख होती. एका प्रखर विद्रोही चळवळीत राहूनही आपल्या असण्याची फारशी जाणीव होऊ द्यायची नाही, हे रघूचं वेगळेपण होतं.

नगरच्या प्रख्यात अशा रावबहाद्दूर दंडवते यांच्या घराण्यात जन्मलेला रघू काय शिकला होता, मुंबईत कधी आला, काय नोकरी करीत होता, आयुष्यभर अविवाहित का राहिला, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरं आमच्यापैकी कुणालाही माहीत नाहीत; फक्त त्याचा लहान भाऊ आणि नाटककार वृंदावन दंडवते आणि त्याचा दीर्घकालीन अभिन्न मित्र अशोक शहाणे यांनाच ते माहीत असायची शक्‍यता आहे.

लघुनियतकालिकांच्या चळवळीतल्या आघाडीच्या शिलेदारांत रघूचं स्थान होतं. अगदी आरंभापासून रघू अशोकसोबत होता. अशोकनं 'अथर्व', 'असो'पासून 'रहस्यरंजन', 'अभिरुची' आणि 'मुंबई दिनांक'पर्यंत बरीच मुशाफिरी केली, बरीच लघुनियतकालिकं काढली, बऱ्याच नियतकालिकांना प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष मदत केली, आणि त्या सगळ्या ठिकाणी अशोकसोबत रघू होताच; अगदी अपरिहार्यपणे होता.

थोडेच; पण मार्मिक बोलणे
१९६० च्या पूर्वार्धात मुंबईत काही समविचारी लोकांचा एक मोठाच गट तयार झाला होता. त्यांना जोडणारा दुवा अर्थात अशोकच होता. अरुण कोलटकर, रघू दंडवते, भाऊ पाध्ये, अशोक शहाणे, वृंदावन, भालचंद्र नेमाडे, शरद मंत्री, मनोहर ओक, माधव वाटवे, नंदकिशोर मित्तल, यांच्यापासून ते अगदी राजा ढाले, वसंत दत्तात्रेय गुर्जर, सतीश काळसेकर, अरुण खोपकर अशा त्या काळच्या तरुणतुर्कांपर्यंत मोठाच समुदाय फोर्टातल्या एका हॉटेलात जमत असे. प्रस्थापित साहित्याबद्दलचा असंतोष, संस्कृतीतल्या नाटक, चित्रपट, चित्रकला, संगीतासारख्या सगळ्या कलांबद्दल सखोल आस्था, समाजातला दांभिकपणा आणि दाखवेगिरीबद्दल चीड, साहित्याच्या स्वायत्ततेला विरोध आणि सामाजिक बांधिलकीबद्दल प्रत्यक्ष जगण्यातूनच आलेली खोलवरची आस्था, निश्‍चित राजकीय भूमिका, अपरिहार्यतेतून आलेली प्रायोगिकता, काहीतरी नवे, वेगळे करण्याची तीव्र इच्छा, आणि प्रत्यक्ष जगण्याला सार्वभौम मानण्याची आणि जगणं शब्दात, कलेत, रंगात उतरवण्यासाठीची अस्वस्थता आणि हे सर्व करत असताना कलात्मकता ढळू न देण्याचा आटोकाट प्रयत्न - अशा अनेक गोष्टींनी हे लोक एकत्र आलेले होते. ज्या ज्या वेळी मी मुंबईला त्या हॉटेलात जात असे त्या त्या वेळी अगदी शांतपणे ऐकून घेणाऱ्यात अरुण कोलटकर आणि रघू दंडवते असायचे. त्यातही अरुणपेक्षा रघू वेगळा वाटायचा - मधेच एखाद्या मार्मिक वाक्‍याने तो सगळ्यांना विचार करायला भाग पाडायचा.


विलक्षण कवित्वाचा साक्षात्कार
साहित्याची विलक्षण जाण आणि नेमकेपणानं सार काढण्याची रघूची सवय मला मोलाची वाटायची. त्याच्यासोबत गप्पा मारताना आपले मुद्दे समोरचा माणूस चोरून घेईल, या भीतीपोटी साहित्यावर गनिमी पद्धतीनं बोलायची त्याला सवय नव्हती. आपल्याहून वयानं लहान असणाऱ्यांकडे चेष्टेखोरपणे बघायची त्याची वृत्ती नव्हती. उलट कुणाकडूनही काही नव्यानं माहीत झालं तर त्याला त्या माणसाबद्दल आदरच वाटायचा. रघूमधे खरं तर एक कुतूहलानं पछाडलेलं लहान पोर दडलेलं असायचं. एक निरागसता असायची. रघूनं फार कमी कविता लिहिल्या, पण ज्या काही कविता लिहिल्या, त्या अभूतपूर्व होत्या. खूपच कमी कविता लिहिल्यामुळे त्याला कवी म्हणायची सगळ्यांना पंचाईत वाटायची! लघुनियतकालिकांच्या कवितेत काय, मराठीच्या मध्यवर्ती प्रवाहातही रघूनं लिहिलेल्या कविता अनन्य आहेत. अगदी आरंभीच्या काळातल्या त्याच्या कवितांमधून येणारे विषय, त्यांची अत्यंत सरळ, साधी वाटणारी भाषा, रचना आणि कवितेचा एकूण रूपबंध भिडतो; पण फार महत्त्वाचा वाटत नाही. पुन्हा पुन्हा वाचल्यावरच कळतं की, कवितांचा सरळ-साधेपणा आणि बालसुलक्ष भीती वा कुतूहल फसवं आहे. त्यात विस्कटलेल्या सद्यकालीन समाजातली सामान्य माणसाची घुसमट आहे, दुःखं आहेत, भयग्रस्तता आहे. एकदा या गोष्टी उकलू लागल्या की रघूच्या विलक्षण कवित्वाचा साक्षात्कार होतो. अगदी नंतरच्या त्याच्या राजेंद्रसिंह बेदी ('एक चादर मैलीसी' या महत्त्वाच्या कादंबरीचे लेखक) यांच्यावरील दोन कवितांमध्येही ही कवित्वशक्ती जाणवते. रघूच्या आयुष्याच्या वाढत्या सांजवेळी अशोकनं प्रकाशित केलेला रघूचा 'वाढवेळ' हा छोटेखानी कवितासंग्रह वाचल्यावर कुणालाही रघूच्या विलक्षण कवित्वाची सहज कल्पना येईल.


 हिंदी सिनेमावर टवटवीत लेखन
रघूची भाषेची जाण, मराठीपणाची अस्सलता अपवादात्मक आहे. त्यानं लिहिलेली 'मावशी' ही गोष्ट भाषेच्या अंगानं आणि आशयाच्या अंगानंही उत्कृष्ट मराठी गद्याचा नमुनाच आहे. 'मावशी'मुळेच मी कायमच रघूच्या 'कादंबरी लिही' म्हणून मागे लागत असे. 'वसेचि ना' ही एक वेगळ्याच प्रकारची कादंबरी लिहून झाल्यावर रघू म्हणाला, 'तुला आता इतका पश्‍चात्ताप होईल, की तू आता कुणालाही कादंबरी लिही असं म्हणणारच नाहीस!' रघूच्या उत्कृष्ट भाषेचं आणखी एक उदाहरण म्हणजे राम मनोहर लोहिया यांच्या दिल्लीवरील हिंदी लेखाचा रघूनं केलेला अप्रतिम अनुवाद आहे. 'अभिरुची'च्या दुसऱ्या पर्वात अशोक शहाणे जेव्हा 'अभिरुची'चं संपादन करू लागला तेव्हा रघूनं हिंदी सिनेमांवर 'जंगोरा' नावानं एक सदर चालवलं होतं ते आजही वाचताना टवटवीत, नवीन वाटतं.

'आता कविताही लिहा की।'
एरवी शांत बसणारा रघू मधूनच मार्मिक बोलायचा हे वर आलंच आहे. त्याला विनोदाचं चांगलंच अंग होतं, आणि त्याचा विनोद 'अस्वली' होता, म्हणजे गुदगुल्या करून मारणारा होता. त्याचं एक उदाहरण मला अरुण खोपकरनं सांगितलं ते असं- आजन्म समाजवादाचा वसा घेतलेले एक थोर कवी अधिकारवाणीनं रघूला म्हणाले, ''तू 'मावशी' नावाची एक फार चांगली गोष्ट लिहिल्याचं मला दोघा-तिघांनी सांगितलं. तर आता नीट योजनाबद्ध कथा लिहून एक संग्रह करायचं बघ. अरे, आपण सातत्यानं लिहिलं पाहिजे. सातत्य ठेवल्यामुळेच माझा चौथा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे बघ.'' इतका वेळ शांतपणे ऐकून घेणारा रघू चेहऱ्यावर निरागसता आणून म्हणाला, ''अरे वा! छान! चार कवितासंग्रह प्रकाशित झाले हे उत्तम. पण आता एखादी कविता लिहायचं मनावर घ्या की!'' नंतर रघू निमूटपणे निघून गेला, पण ते समाजवादी कवी मात्र फारच घायाळ झाले!

सत्तरच्या दशकात जेव्हा मी अशोक - रघूला भेटायला आणि मुक्कामाला त्यांच्या घरी कांदिवलीला गेलो होतो, तेव्हाचं ते घर अजूनही माझ्या मनात तसंच 'वसलेलं' आहे. अशोक आणि रघू त्या वेळी अत्यंत साधेपणानं राहत होते. साधेपणा किती, तर त्यांच्या घरात तेव्हा सगळीच्या सगळी भांडी मातीची होती, अगदी तव्यापासून झाऱ्या - चमच्यापर्यंत आणि एका खोलीत सगळ्या भिंतींना लावून मराठी, इंग्रजी, बंगाली, हिंदी, उर्दू पुस्तकांच्या थप्प्या रचलेल्या होत्या. पुस्तकांचा ठोक व्यापार करणाऱ्याचं दुकानच वाटायचं त्यांचं घर! आणि घरातले सगळेच्या सगळे कपडे खादीचे होते. गांधी, 'स्मॉल इज ब्यूटिफुल' आणि स्वातंत्र्यपूर्व काळातल्या व स्वातंत्र्यानंतरच्या दोन दशकांपर्यंतच्या समाजवादावर रघूची अपार श्रद्धा होती. नंतरच्या काळात ही श्रद्धा कोलमडली; पण रघूची खादी आणि विडी अखेरपर्यंत सुटली नाही.

अविचल नैतिक बाणा, जगण्यातून हद्दपार केलेली तंत्रज्ञानप्रणीत आधुनिकता, साधेपणा, खास मराठी वळणाच्या भाषेची अंगभूत लकब, अशा अनेक वैशिष्ट्यांसह रघू जगला. साहित्यात रघूनं भव्यदिव्य असं किंवा पुढच्या पिढीला आदर्शवत वाटेल, असं काही केलं नाही. पण साहित्यिक संस्कृतीत रघूसारखी जाण असलेली माणसं जे काही थोडंथोडकं करून ठेवतात, त्यानंच साहित्यिक संस्कृतीचा पोत बळकट व्हायला, हळूहळू का असेना, मोलाची मदत होत असते! पोत म्हटल्यावर एकेका धाग्याची ओळख अशक्‍यच आहे. म्हणूनच रघूच्या निधनाची बातमी देताना रघूची ओळख मधू दंडवते यांचा भाऊ अशीच असणार - माझ्यासारख्यांना कितीही वाईट वाटलं तरी!
***

No comments:

Post a Comment