Tuesday 16 April 2013

भारतीय रेल्वे : मार्क्स । मर्ढेकर । आणि दोन फोटो

भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी मुंबईतल्या बोरीबंदर स्टेशनातून (म्हणजे आत्ताच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून) ठाण्याच्या दिशेने धावली. ह्या घटनेची तारीख होती १६ एप्रिल १८५३. या घटनेचं १६०वं वर्षं साजरं करत 'गुगल'ने आज त्यांचा लोगो त्यासंबंधी केलाय :



हे तुमच्या पाहण्यात आलं असेल. 'गुगल'ने हे डुडल केलंयच तर त्या निमित्ताने आपण काही गोष्टी 'रेघे'वर नोंदवून ठेवू.
***

ज्या वर्षी ही रेल्वेगाडी धावली, त्याच वर्षीच्या जुलै महिन्यात कार्ल मार्क्सनी एक लेख लिहिला होता : भारतातील ब्रिटिश सत्तेचे भविष्यातील परिणाम. भारतात वर्षानुवर्षं रुतून असलेली जातिव्यवस्थाधारित श्रमविभागणी रेल्वेच्या व्यवस्थेने येणाऱ्या आधुनिक उद्योगांमुळे संपेल, असं मार्क्सनी या लेखात म्हटलंय. भारताच्या प्रगतीच्या आणि सत्तेच्या आड येत असलेले हे अडथळे आहेत, आणि रेल्वेच्या आगमनाने ते संपतील, असा अंदाज त्यांनी बांधला. हा फोल गेलेला अंदाज बऱ्यापैकी प्रसिद्धही आहे. रेल्वेच्या पसरलेल्या जाळ्याचं अंतर तपासलं तर भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वेयंत्रणा आहे असं आपल्याला सांगितलं जातं. जातिव्यवस्थेची अशी तपासणी केल्यावर काय हाती लागेल? माहीत नाही. तर मार्क्सरावांचा हा अंदाज चुकला.

याच लेखात मार्क्स असंही म्हणतात की, ब्रिटिशांचं भारतातलं (स्वतःच्या फायद्यासाठीचं) साधारण काम, असलेल्या गोष्टी 'उद्ध्वस्थ करणं' आणि नव्यानं 'उभारणी करणं' अशा स्वरूपाचं आहे. यात मग ब्रिटिशांनी आणलेल्या 'फ्री प्रेस'चाही उल्लेख ते करतात. नवनिर्मितीच्या प्रक्रियेतील एक नवा आणि ताकदवान घटक म्हणजे ही स्वतंत्र माध्यमांची व्यवस्था, असं मार्क्स म्हणतात. या अंदाजात काही तथ्य असेल बहुधा. पण त्याचीही तपासणी मात्र वारंवार व्हायला हवी.

अर्थात, मार्क्सनी एवढ्या लांबून भारताबद्दल अंदाज बांधणं जरा धाडसाचंही आहे आणि त्यात त्रुटी तर उघड उघड आहेतच.

तर, आता आपण आपल्या जवळ राहाणारे बाळ सीताराम मर्ढेकर यांनी रेल्वेशी संबंधित किंवा एकूणच काही संबंध जोडून काही म्हटलंय का पाहूया. मर्ढेकरांची 'फलाटदादा फलाटदादा' ही एक कविता आपल्याला इथे देता येईल, पण एकूण 'रेघे'वर आत्तापर्यंत जोडून आणलेला संदर्भ पाहता आपण मर्ढेकरांना दिसणाऱ्या मुंग्यांकडेच पाहूया.

मी एक मुंगी, हा एक मुंगी,
तो एक मुंगी, तूं एक मुंगी,
ही एक मुंगी, ती एक मुंगी,
पांच एथल्या, पांच फिरंगी;

सहस्त्र जमल्या, लक्ष, कोटिही,
अब्ज अब्ज अन् निखर्व मुंग्या;
अनंत अगणित साऱ्या जमल्या-
किती वारुळी, किती लफंग्या!

कुणी डोंगळे काळे काळे;
कुणी तांबड्या, भुरक्या मुंग्या;
कुणि पंखांच्या पावसाळि वा
बेडर ग्रीष्मांतल्या लवंग्या!

सावधान कुणि रांग धरूनी
एकामागुन एक चालती;
कुणी बावळ्या अप्पलपोट्या
मिळेल साखर तेथे चरती;

व्रतस्थ बनती चावा काढित
कुणि; कुणि पाजित मधुरस इतरां
जन्म कंठती; फळविती कुणि अन्
सम्राज्ञीला प्रसन्न चतुरा!

ह्या मुंग्यांतिल एकेकीला
बनेल खाउनि राजा कोण;
पार्थिवतेच्या पराकोटिचें
अपार्थिवाला नेइल लोण?

- आला आला स्वस्त दरावर आला हो आला
हा मुंग्यांचा लोंढा आला! खोला, फाटक खोला!


दहा दहाची लोकल गाडी
सोडित आली पोकळ श्वास;
घड्याळांतल्या कांट्याचा अन्
सौदा पटला दीन उदास.

ह्या नच मुंग्या : हींच माणसें :
असेच होते गांधीजीही,
येशु क्रिस्त अन् कृष्ण कदाचित्
कालिदास अन् टैकोब्राही.

ह्या नच मुंग्या : हींच माणसें,
मनें अनामिक जरि साऱ्यांचीं,
लक्तरलेल्या मिनिटांचा वर
सदैव बुरखा; लाज स्वतःची.

अंगावरती जिरलेले किति
तऱ्हेतऱ्हेचे मादक धर्म;
अन् वासांची त्यांच्या कॉक्-टेल
तर्र झोकुनी फलाटफार्म.

जशि पाप्याची नजर फिरावी
अनोळखीच्या उरावरूनी,
ह्या साऱ्यांची भेकड वृत्ती
वावरते तशि जगण्यामधुनी.

ह्या नच मुंग्या : हींच माणसें :
मायबाप अन् भाऊबहिणी
ह्यांना असती; होतिल आणिक
मुलें मुली अन् पुतण्यापुतणी.

(मर्ढेकरांची कविता, पान ८८-९०)
ही कविता अजून पुढे आहे, पण आपला संदर्भ स्पष्ट करण्यापुरती इतकीच इथे दिली. पूर्ण वाचण्यासाठी मौज प्रकाशनाने काढलेल 'मर्ढेकरांची कविता' हे पुस्तक पाहता येईल. आपल्या तुलनेने लहान संदर्भाच्या नोंदीमध्ये मर्ढेकरांनी अनेक संदर्भांची गर्दीच करून ठेवलेय, असं आपल्याला वाटलं असेल आणि ही कविता वाचून 'शब्द फुटेनासं होणं' अशी काही परिस्थिती आपली झाली असेल तर शब्दांपेक्षा जास्त बोलके असल्याचा दावा ज्यांच्याबद्दल केला जातो ते फोटो पाहणंच बरं. त्यातून कदाचित आणखी संदर्भ स्पष्ट होतील.

रेल्वे आणि पेपर : फोटो पहिला
रघू राय । चर्चगेट रेल्वे स्टेशन (फोटो : 'मॅग्नम'कडून)



रेल्वे आणि पेपर : फोटो दुसरा
फोटो : रेघ

थांबू.

No comments:

Post a Comment