Friday 22 March 2013

कादंबरीकार । पत्रकार । अनिरुद्ध बहल

अनिरुद्ध बहल
शेजारच्या या फोटोकडे पाहून हा माणूस कसा असेल असं तुम्हाला वाटतं? कोणीतरी साधा भोळा इसम दिसतोय हा तर. एका अर्थी हा इसम साधा असला तरी तितकासा भोळा नाही, हे आपल्याला कळू शकतं. पण त्यासाठी या इसमाच्या कामाची तपासणी करावी लागेल.

सध्याचं 'तेहेलका' साप्ताहिक जेव्हा केवळ वेबसाइटच्या रूपात सुरू होतं तेव्हा त्यांनी संरक्षण मंत्रालयातला भ्रष्टाचार उघडकीस आणला. त्यामध्ये जे मुख्य दोन पत्रकार सामील होते त्यातले एक अनिरुद्ध बहल आणि दुसरे मॅथ्यू सॅम्युअल. २००१ साली हे 'स्टिंग ऑपरेशन' करण्यात आलं. 'ऑपरेशन वेस्ट-एन्ड' या नावाने ते गाजल्याचं काहींना आठवत असेल. अस्तित्त्वातच नसलेला शस्त्रांचा प्रकार अस्तित्त्वात नसलेल्या शस्त्रनिर्मिती कंपनीकडून विकत घ्यावा, यासाठी या दोघांनी तेव्हाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधील मंडळींच्या गाठीभेटी घेतल्या. अर्थात, शस्त्र आणि कंपनी हे दोन्ही बनावट आहे याची काडीचीही कल्पना न आल्यामुळे लाच स्वरूपात पैसे घेऊन हा व्यवहार वरकरणी होऊन गेला. आणि त्यातून संरक्षण मंत्रालयातला भ्रष्टाचार उघड झाला. हे सगळं गुप्त कॅमेऱ्यांमधे रेकॉर्ड झाल्यामुळे पुढे भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष बंगारू लक्ष्मण, समता पक्षाच्या अध्यक्षा जया जेटली (तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निकटवर्तीय), काही सैन्याधिकारी या सगळ्यांचा कमी-अधिक बोऱ्या वाजत गेला. दहा वर्षांनी २०११मधे लक्ष्मण यांना दोषी घोषितही करण्यात आलं. हा व इतर तपशील आता अनेकदा चर्चिला गेला आहे.

आपण ह्या 'स्टिंग ऑपरेशन'चा उल्लेख केला तो अनिरुद्ध बहल यांच्या संदर्भात आणि त्यांच्याबद्दल आणखी काही खुलासा व्हावा यासाठी. याच अनिरुद्धनी पुढे संसदेत प्रश्न विचारण्यासाठी कसा पैसा घेतला जातो याबद्दलचं 'स्टिंग ऑपरेशन'ही (ऑपरेशन दुर्योधन, २००५) केलं. या 'कॅश-फॉर-क्वेश्चन' प्रकरणात अकरा खासदारांना आपली खासदारकी गमवावी लागली. हे ऑपरेशन अनिरुद्धनी 'कोब्रा पोस्ट' या त्यांनी २००३ साली सुरू केलेल्या वेबसाइटच्या माध्यमातूनच केलं होतं.

आता आपण २०१३ सालामधे आलो. आठवड्याभरापूर्वी याच अनिरुद्धनी काय केलं तेही कदाचित तुमच्या वाचनात आलं असेल. अगदी थोडक्यात सांगायचं तर, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक या बँकांमधल्या अधिकाऱ्यांकडे एका राजकीय नेत्याचा एजन्ट असल्याचं भासवून 'कोब्रा-पोस्ट'चा प्रतिनिधी गेला व त्याने आपल्याकडची काळ्या पैशाच्या रूपातली नकद रक्कम पांढऱ्या रूपात आणण्यासाठी काय करता येईल, याची विचारणा केली. त्यावर या बँकांमधल्या अधिकाऱ्यांनी आपली सर्वसामान्य खातेधारकांसाठी असलेली प्रक्रिया धाब्यावर बसवून चाललेल्या व्यवहारांची माहिती या 'एजन्टा'ला दिली आणि पॅन कार्डापासून कुठल्याच फुटकळ गोष्टींमधे न अडकवता आपण काळ्या पैशाला पांढरं करण्यासाठी कशी मदत करू शकतो, आपल्या योजनांमधे कसे पैसे गुंतवता येतील, बेनामी खातं कसं काढता येईल, याचा पाढा वाचला. हा पाढा म्हणजे आत्ताचं 'ऑपरेशन रेड स्पायडर'. यासंदर्भात काही बातम्या येऊन आता हे प्रकरण शांत झालेलं दिसतंय. संस्थात्मक पातळीवर जेव्हा मोठ्या प्रमाणातल्या पैशाचा व्यवहार (अफरातफरीचाही) असेल तेव्हा ग्राहकाची पुरेशी तपासणी न करता, केवायसी (नो युवर कस्टमर) नियमावली धाब्यावर बसवून व्यवहार केले जातात का? की, 'कोब्रा पोस्ट'ने उघडकीस आणलेले व्यवहार सुट्या घटना म्हणूनच झाल्या आहेत आणि संस्थात्मक प्रक्रियेतली छुपी पद्धत म्हणून त्यांचा संबंध जोडता येणार नाही? असे काही प्रश्न यातून विचारले जाऊ शकतात. यावर 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने (आरबीआय) कालच आपलं उत्तर दिलेलं आहे. या तीनही बँकांचा संस्थात्मक पातळीवर अशा व्यवहारामधे सहभाग नसल्याचं 'आरबीआय'ने स्पष्ट केलंय. काही व्यवहारांच्या पातळीवरच्या आरोपांवरून या बँकांमधे प्रक्रियात्मक भ्रष्टाचार असेल हे सिद्ध होत नाही, इत्यादी युक्तिवाद यासंदर्भात 'आरबीआय'ने केलेला आहे. त्यामुळे आता हे प्रकरणच वरकरणी संपल्यात जमा आहे. या प्रकरणात गुंतलेल्या अधिकारी वर्गावर निलंबनाची कारवाई झाल्याच्याही बातम्या येऊन गेल्या आहेत.

यानिमित्ताने खरोखरच्या सामान्य असलेल्या नागरिकांच्या मनात काही प्रश्न येऊ शकतात : एप्रिल २०११मधे भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरोधात 'दुसरं स्वातंत्र्ययुद्ध' झालं होतं, त्याचं नेतृत्त्व आता कुठे असेल? एकूण गुंतागुंत गृहीत धरली तरी राजकीय क्षेत्राच्या तुलनेत कॉर्पोरेट क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराविरोधात बोलणं कमी का असतं? मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी हे प्रकरण फारसं उचललं का नसावं?
***

आता आपण नोंदीच्या दुसऱ्या भागात मुख्यत्त्वे अनिरुद्ध बहल या इसमाभोवतीच काही बोलणार आहोत.

'ऑपरेशन रेड स्पायडर'संबंधी मराठीतून आलेल्या बातम्यांमधून आपल्याला काय समजू शकतं?

तर,

'सकाळ'च्या मते 'कोब्रा पोस्ट' हे एक मासिक आहे आणि अनिरुद्ध बहल हे त्यात काम करणारे पत्रकार आहेत.

'लोकसत्ते'च्या मते, हा एका वृत्त-संकेतस्थळाचा प्रमुख असलेला कोणीतरी पत्रकार आहे. ('कोब्रापोस्ट.कॉम' या वृत्तविषयक संकेतस्थळाचा प्रमुख असलेल्या अनिरुद्ध बहल या पत्रकाराने राजधानीत बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत आपण संबंधित बँकांच्या शाखांचे अनेक तासांचे चित्रीकरण केल्याचाही दावा केला.)

'महाराष्ट्र टाइम्स'च्या बातमीत ''कोब्रा पोस्ट'चे पत्रकार अनिरुद्ध बहल हे एका राजकीय नेत्याचे एजंट म्हणून या बॅंकांकडे गेले होते. त्यांनी काही ब्लॅक मनी व्हाइट करण्याची विनंती केली. तेव्हा पॅन किंवा केवायसी (नो युवर कस्टमर) क्रमांकाची मागणी न करता त्यांचे पैसे बँकेत स्वीकारले गेले. त्यातूनच या रॅकेटचा पर्दाफाश झाला' असं म्हटलंय.

या बातम्या तपशिलातून वाचता येतीलच. आणि त्यातील गोंधळही स्पष्ट होईल. एक तर, 'सकाळ'च्या संदर्भात 'कोब्रा पोस्ट' हे मासिक नाही हे स्पष्ट करावं लागेल. 'लोकसत्ते'ने 'पीटीआय'च्या बातमीचं भाषांतर केलंय, त्यातून अनिरुद्ध बहल हा कोणीतरी नवखा पत्रकार असल्याचं वाटू शकतं. आणि 'महाराष्ट्र टाइम्स'च्या बातमीत तपशिलाच्याच काही चुका आहेत. उदाहरणार्थ, ''केवायसी' क्रमांक' असली काही गोष्ट अस्तित्त्वात नाही, इत्यादी. भाषेबद्दल काहीच बोलायला नको.

वृत्तसंस्थेकडून आलेल्या बातम्या उप-संपादकीय पातळीवर भाषांतरित करताना प्रत्येक बातमीचा विषय आपल्याला मुळातून माहीत असण्याची शक्यता नाही, हे मान्य केलं तरी एकदम वेगळ्या विषयावरच्या बातमीचा तपशील इंटरनेटवर पाच मिनिटांच्या योग्य शोधाद्वारे थोडा अधिक पक्का करता येऊ शकतो, हे तत्त्व सांभाळलं तर आपलं काम करायलाही मजा येते आणि वर्तमानपत्राची किंमत देणाऱ्या वाचकांची किंमतही ठेवली जाते हे उप-संपादकीय मत नोंदवून पुन्हा अनिरुद्ध बहल नावाच्या कादंबरीकार-पत्रकाराकडे वळूया.

पहिली गोष्ट, अनिरुद्ध बहल यांच्यासंबंधी अत्यंत तपशिलावर लेख इंग्लंडच्या 'इंडिपेंडन्ट'मधे वाचता येईल.

आता तुम्ही 'न्यूजलाँड्री'वरच्या मुलाखतीचा हा व्हिडियो पाहू शकता :


अनिरुद्ध बहल हा माणूस मूळचा कादंबरीकार. 'बंकर थर्टीन', 'द एमिसरी' अशा त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत आणि त्या आपण वाचलेल्या नाहीत. तरी त्यांच्या मूळचा कादंबरीकार असण्याचा आणि त्यांच्या पत्रकारितेचा गंमतीशीर संबंध आहे, असं तेच म्हणतात म्हणून ही नोंद.

आपण आधी नोंदवलेल्या 'कॅश फॉर क्वेश्चन' प्रकरणात अनिरुद्धनी खासदारांना विचारण्यासाठी दिलेल्यातले उदाहरणादाखल दोन प्रश्न कसे होते पाहा :

1) Has the Railway Ministry placed any order for purchase of the Yossarian Electro Diesel engine from Germany? Is the ministry aware that the Tom Wolfe committee report in Germany has halted its induction into the Eurorail system?

कच्चं भाषांतर : जर्मनीकडून योसेरियन इलेक्ट्रो डिझेल इंजिन विकत घेण्यासंबंधी कोणता व्यवहार रेल्वे मंत्रालयाने केला आहे का? हे इंजिन युरोपीय रेल्वे यंत्रणेमधे सामावून घेण्याची प्रक्रिया जर्मनीतल्या टॉम वूल्फ समितीने सादर केलेल्या अहवालामुळे खंडित झाल्याची कल्पना मंत्रालयाला आहे का? 

2) Has the government given sanction for the seed trial of Salinger Cotton of Monsanto? If so, has a report been prepared on Catch-22 cotton so far?

कच्चं भाषांतर : मोन्सान्तो कंपनीच्या सॅलिंजर कापसाच्या बियाण्याच्या चाचणीला सरकारने परवानगी दिली आहे का? जर असेल, तर कॅच-२२ कापसासंबंधीचा अहवाल तयार झाला आहे का?

या प्रश्नांमधे अनिरुद्ध बहलांमधला कादंबऱ्यांचा वाचक सर्जनशील होतो. 'कॅच २२' ही गाजलेली अमेरिकी कादंबरी, तिच्यातला कॅप्टन युसेरियन, कादंबरीकार टॉम वूल्फ, 'कॅचर इन द राय'वाला जे. डी. सॅलिंजर यांची नावं वाट्टेल तशी वापरून हा माणूस त्या वरकरणी निरर्थक प्रश्नांमधे मसाला भरतो. याला आपले खासदार फशी पडले हे विशेष!

हे तपशिलातल्या गंमतीचं उदाहरण झालं, याशिवाय आपल्या कादंबरीकार असण्यातली लेखनाची आवड आणि पोटासाठी कमाईची गरज जिथे भागवता येईल त्या पत्रकारितेत अनिरुद्ध आले असं ते वरच्या व्हिडियो मुलाखतीत सांगतात. कादंबरीकाराच्या कल्पनाविश्वातून त्यांना 'अंडर-कव्हर' गोष्टी शोधायची आवड लागलेय का? कादंबरीकाराच्या विश्वातली रोमहर्षकता ते आपल्या पत्रकारितेतही शोधत असतील का? या रोमहर्षकतेचाच भाग म्हणून आणि लोकांच्या वागण्यातला बनावटपणा बाहेर काढण्यासाठी बनावट मुलाखतकार बनून 'व्ही टीव्ही'साठी त्यांनी (मुख्यत्त्वे) सेलिब्रिटींच्या मुलाखतींचा 'द टोनी बी शो' केला असेल का? कथानक कुठल्याही काळातलं असलं तरी कादंबरी समकालीन संदर्भांच्या संदर्भात लिहिलेली असण्याची शक्यता मोठी असते, हे गृहीतक पुढे ठेवलं तर पत्रकारितेतल्या मूल्यांशी तिची काही प्रमाणात सांगड बसते का?

मजेशीर प्रश्न आहेत.

याशिवाय एक प्रश्न वरती दिलेल्या व्हिडियोत पाहता येईल. 'ऑपरेशन वेस्ट-एन्ड'चं श्रेय मुख्यत्त्वे 'तेहेलका'चे संपादक म्हणून तरुण तेजपाल यांना मिळाल्यासंदर्भात बोलत असताना 'न्यूजलाँड्री'कडून हा प्रश्न येतो : ''अशा वातावरणात सत्त्व असलेल्यांपेक्षा जे स्वतःला बाजारात मांडू शकतात तेच लोक यशस्वी होतात?''

बहल : पण हे जगाच्या सुरुवातीपासूनच अस्तित्त्वात असलेलं तथ्य नाहीये का?

याच प्रश्नात जराशी भर घातली गेल्यानंतर बहल पुढे म्हणतात, ''आता दूरचित्रवाणीवरच्या बातम्यांकडे पाहा. पत्रकारितेतलं अ-आ-ई माहीत नसलेल्या निवेदकांनासुद्धा तिथे महत्त्व दिलं जातं. मी कधी कधी माध्यमशिक्षण देणाऱ्या संस्थांमधे व्याख्यानाला जातो. तिथली परिस्थिती पाहून वाईट वाटतं. बहुतेकांना टीव्हीवर अँकर व्हायचं असतं. त्यांना पत्रकारितेसाठी आवश्यक सचोटी, उत्कट तळमळ, पाच 'डब्ल्यूं'विषयी (का-कधी-कुठे-कसं-कोणी) त्यांना काहीच देणंघेणं नसतं. त्यांना फक्त प्रसिद्ध व्हायचं असतं.''
***

प्रश्न : कादंबरीकाराला / लेखकालाही प्रसिद्ध व्हायचं असतं. पण तो सत्त्वासह प्रसिद्ध होऊ इच्छितो का? म्हणजे सत्त्व सोडून प्रसिद्धीसाठी प्रसिद्धी यापेक्षा कादंबरीकाराला अपेक्षित प्रसिद्धी हे काहीतरी वेगळं असेल का?

उत्तर : माहीत नाही.
***


अनिरुद्ध बहल (फोटो - इथून)

3 comments:

  1. What did bank sting operation achieve? Almost nothing other than entertainment....Dy Governor of RBI says: nothing is wrong with the banking system,..actually no crime was recorded....media have nothing else to do and hence they did it....

    A big opportunity wasted....he should have gone through one complete transaction...

    The banks involved are big advertisers in the newspapers you mention...bank heads are TV geneic personalities...Their careers witll flourish...one of them is likely to be our future finance minister....

    life will go on....TV is almost always only entertainment...These days is anything not?.

    ReplyDelete
  2. सुंदर झालंय...'प्रत्येक बातमीचा विषय आपल्याला मुळातून माहीत असण्याची शक्यता नाही, हे मान्य केलं तरी एकदम वेगळ्या विषयावरच्या बातमीचा तपशील इंटरनेटवर पाच मिनिटांच्या योग्य शोधाद्वारे थोडा अधिक पक्का करता येऊ शकतो' :) 'सकाळ'च्या मते 'कोब्रा पोस्ट' हे एक मासिक आहे ??? हा..हा..

    ReplyDelete
  3. शेवटचा प्रश्न अनुत्तरीत करतो. या पोस्ट साठी विशेष आभार...मराठी वृत्तपत्रांचा दळभद्रीपणा दाखवल्याबद्दल. म्हणजे तो अधून मधून दिसतोच. पण असं कधीतरी मधेच खूप स्पष्ट होतं.

    ReplyDelete