Thursday 3 January 2013

मुक्ताबाईच्या निबंधातला काही भाग

सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त ज्या मुलीचा निबंध देण्याची इच्छा होती, असं मागच्या नोंदीत म्हटलंय, त्या निबंधातला निवडक भाग धनंजय कीर यांनी लिहिलेल्या 'महात्मा जोतीराव फुले' (पान ४७-४८, पॉप्युलर प्रकाशन) या चरित्रग्रंथात आहे, तिथून तो इथे नोंदवतो आहे.

चौदा वर्षांची मुक्ताबाई नावाची मुलगी हा निबंध लिहिते आहे. सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या शाळेत ती तीन वर्षं शिकत होती.
***

ब्राह्मण लोक असें म्हणतात कीं, वेद तर आमचीच मत्ता आहे. आम्हीच त्याचें अवलोकन करावें. तर यावरून उघड दिसतें कीं, आम्हांस धर्मपुस्तक नाहीं. जर वेद ब्राह्मणासाठीं आहेत तर वेदाप्रमाणे वर्तन करणें हा ब्राह्मणांचा धर्म होय. जर आम्हांस धर्मासंबंधीं पुस्तक पाहण्याची मोकळीक नाहीं तर आम्ही धर्मरहित आहों असें साफ दिसतें कीं नाहीं बरे? तर हे भगवान, तुजकडून आलेला कोणता धर्म तो आम्हांस कळीव, म्हणजे आम्ही सर्व त्याच्यासारिख्या रीतीनें अनुभव घेऊं.

इमारतीच्या पायांत आम्हांस तेलशेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा क्रम चालविला होता. त्या समयी महार अथवा मांग यातून कोणी तालीमखान्यापुढून गेला असता गुलटेंकडीच्या मैदानांत त्याच्या शिराचा चेंडू व तलवारीचा दांडू करून खेळत होते. अशी जर मोठ्या सोवळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी, तर विद्या शिकण्याची मोकळीक कोठून मिळणार? कदाचित् कोणास वाचता आलें आणि तें जर बाजीरावास कळलें तर तो म्हणे कीं, हे महारमांग असून वाचतात. तर ब्राह्मणांनी का त्यांस दप्तराचे काम देऊन त्यांच्या ऐवजी धोकट्या बगलेंत मारून विधवांच्या हजामती करीत फिरावें की काय? असें बोलून तो त्यास शिक्षा करी.

हा जुलूम विस्तारानें लिहूं लागलें तर मला रडूं येते. या कारणास्तव भगवंतानें आम्हावर कृपा करून दयाळू इंग्रजी सरकारास येथें पाठविलें. आणि या राज्यांतून आमचीं दुःखें निवारण झालीं तीं अनुक्रमाने पुढें लिहितें. किल्लाच्या पायांत घालण्याची बंदी झाली. आमचा वंशही वाढत चालला. महारमांग यांतून कोणी बारीक पांघरूण पांघरलें असतां ते म्हणत कीं, त्यांनीं चोरी करून आणलें. हें पांघरूण तर ब्राह्मणांनीच पांघरावें. जर महारमांग पांघरतील तर धर्मभ्रष्ट होतील असें म्हणून ते त्यांस बांधून मारीत. पण आतां इंग्रजांच्या राज्यांत ज्यास पैसा मिळेल त्यांनीं घ्यावें. उच्च वर्गांतील लोकांचा अपराध केला असतां मांगाचे किंवा महाराचें डोकें मारीत होते ती (चाल) बंद झाली. जुलमी बिगार बंद झाली. अंगाचा स्पर्श होऊं देण्याची मोकळीक कोठें कोठें झाली. गुलटेकडीच्या बाजारांत फिरण्याची मोकळीक झाली.
***

4 comments:

  1. या निबंधाच्या काही भागाचं इंग्रजी भाषांतर इथे सापडलं - http://www.anti-caste.org/about-the-griefs-of-the-mangs-and-the-mahars-1855-by-muktabai.html

    ***

    शिवाय अनिरुद्ध कुलकर्ण्यांच्या ब्लॉगवरच्या नोंदीतही काही संदर्भ आहे - searchingforlaugh.blogspot.in/search?q=muktabai

    ReplyDelete
  2. चौदा वर्षांची मुक्ताबाई नावाची मुलगी हा निबंध लिहिते........

    ReplyDelete
  3. Thank you for this post....Ashwini

    ReplyDelete
  4. _/\_ मला रडूं येते- by 14 वर्षांची मुलगी..!

    ReplyDelete