Friday 23 November 2012

गुडबाय ठाकरेसाहेब, तुम्ही मला प्रेम करायला शिकवलंत!

- जावेद इक्बाल

१९९२चा पिसाटपणा आणि १९९३मध्ये बस नि बाजारांमधून बाहेर येणाऱ्या प्रेतांची दृश्यं यांच्यामुळे माझ्या मनात कायमच्या काही आठवणी चिकटून राहिल्या नि त्यातून लहानपणी मला प्रश्न पडला : का?

मानवी यातना कशी असते हे दाखवून देणाऱ्या माझ्या आयुष्यातल्या काही सुरुवातीच्या आठवणी याच काळातल्या. मोठं होत असताना आपल्या वाटेला पहिला किस येतो, पहिली मारामारी येते, पहिली नोकरी येते, कौमार्य सुटतं, पहिल्यांदा दारू पिण्याचा अनुभव येतो, पण आपल्याला सहानुभूतीची शिकवण पहिल्यांदा कधी मिळाली याबद्दल मात्र आपण विचार करत नाही.

आज, मी एक पत्रकार आहे. मध्य भारतात सरकार आणि माओवाद्यांकडून होणाऱ्या मानवाधिकाराचा भंग करणाऱ्या घटनांची नोंद मी करतो. आणि जेव्हा मी मुंबईत परततो, तेव्हा मी झोपडपट्टी हटावसारख्या घटनांची नोंद करतो. ही अशा माणसांची घरं असतात ज्यांना घाबरायला पाहिजे असं मला पूर्वी शिकवलं गेलं होतं.

मी ज्यांच्यासोबत काम करतो; आर्थिक स्तर, धर्म, लिंग आदींपलीकडे जाऊन ज्यांच्याबरोबर मी सर्वांत घट्ट बांध बांधू शकलोय असे हे लोक पूर्वी शिवसेनेचे कट्टर समर्थक होते. सरत्या काळाबरोबर मला समजून चुकलंय की या शहरातील सर्वांत चुकीच्या पद्धतीनं ज्यांचं चित्र रंगवलं गेलं तेही हेच लोक.

या संबंधीच्या माझ्या लहानपणीच्या आठवणींचा लेखाजोखा घेण्यासाठी मी हा लेख लिहीत नाहीये; तर या लोकांच्या सध्याच्या बिकट परिस्थितीविषयी मी हे लिहितोय. बाळ ठाकरेंच्या जाण्यानं न मेलेल्या त्यांच्या स्वप्नांबद्दल लिहितोय (कारण त्यांची स्वप्नं ठाकरे जायच्या कित्येक पूर्वीच मेल्येत.)

खूप पूर्वी इतिहासातल्या एका बिंदूपाशी हा देश समुदाय नावाची गोष्ट गमावत होता : पोलीस गोळीबार, जाळपोळ, शस्त्रांचे वार यांच्या शेकडो अफवा, आकाशात पसरलेला धूर, घाबरून दाढ्या साफसूफ केलेले हिंदू शेजारी, आमच्यासोबत राहण्यासाठी आलेले मुस्लीम शेजारी, 'अनोळखी व्यक्तीला तुझं नाव सांगू नको', आठ वर्षांचा एक निरागस मुलगा असलेला मी हे सर्व चिंताग्रस्त वातावरण आमच्या घरातल्या हॉलमधे बसून पाहात होतो. बाजूच्या गल्ल्यांमध्ये कापाकापीला ऊत आला होता.

मी अंतर्मुख मुलगा होतो, गोंधळलेला होता. अजूनही मला १२ मार्च १९९३चा तो दिवस आठवतो. बॉम्बस्फोटांमुळे आम्हाला शाळेतून लवकर घरी पाठवण्यात आलं होतं.

७ नोव्हेंबर १९९२ला पोलिसांनी पाठलाग करून, घरात घुसून गोळ्या घातल्यामुळे ज्या झोपडपट्टीतल्या ११ लोकांना प्राण गमवावे लागले, तिथला (बांद्रा-पूर्व इथल्या भारतनगरमधला) सलीम यानं पहिल्यांदा मला शहरात बॉम्बस्फोट झाल्याचं सांगितलं.

त्या दिवशी तो माझ्याकडे आला नि काय घडलंय ते मला सांगितलं हे अजून मला स्पष्ट आठवतंय, पण त्या दिवशी भारतनगरमधे काय झालं ते मी त्याला कधीच विचारलं नाही.

'त्या दिवशी कसं वातावरण होतं?' मोठं झाल्यावर मी त्याला विचारलं.
'किती वाजलेत?' त्यानं मला विचारलं.
'दुपारचे तीन.'
'आत्ता दुपारी तीन वाजता जर तुला गोळ्या घातल्या, तर तुला उद्या दुपारी तीन वाजताच रुग्णालयात दाखल करता येईल. एवढ्या मोठ्या रांगा होत्या', त्यानं शांतपणे सांगितलं.
***

९३ सालच्या बॉम्बस्फोटांनंतर मी पेपरांमधे आलेले छिन्नविछिन्न शरीरांचे फोटो पाहिले. जळालेली, तुटलेली शरीरं. ही आधी जिवंत माणसं होती. कुठलीही गोष्ट 'सेन्सॉर' न झाल्याबद्दल मला बरं वाटलं. पाचशे वर्षांपूर्वी कबीरानं लिहिलेले शब्द माझ्या मनातल्या तेव्हाच्या भावना जास्त योग्य पद्धतीनं स्पष्ट करू शकतील-

ही खूपच संभ्रमाची स्थिती आहे.
वेद, कुराण, स्वर्ग, नरक, स्त्री, पुरुष,
मातीचं मडकं हवेनं नि शुक्राणूंनी उडवलं जातं...
मडकं पडून फुटतं, तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणता?
मूर्खा, तू मुद्दा चुकवलायंस.

ती सर्व त्वचा नि हाडं असतात, मूत्र नि घाण असते,
एक रक्त, एक मांस.
एका थेंबापासून विश्वापर्यंत.

आणि अशी मडकी फुटत राहिली. गेल्या काही वर्षांत गजबजलेल्या कुठल्याही रस्त्याच्या कुठल्याही कोपऱ्यात एखादी अनोळखी वस्तू दिसल्यावर या शहरानं प्रचंड भीती मनात घेतलेली आहे.

आणि मडकी फुटत राहिली. एका धर्मांध गटाला दुसऱ्या धर्मांध गटाला धडा शिकवावा वाटू लागला. मालेगाव, हैदराबाद, मुंबई (अनेकदा), दि्ल्ली आणि गुजरातमधील २००२ची दंगल. ज्यांना आपत्ती सहन करावी लागली ते धर्मांधच होते का पण?

विक्रोळीच्या रमाबाई नगरमध्ये ११ जुलै १९९७ रोजी झालेल्या पोलीस गोळीबारात ११ दलित मृत्युमुखी पडले. यावेळी आम्हाला घरी लवकर पाठवताना काय सांगितलं गेलं? 'आंबेडकरांच्या पुतळ्यावर चपला दिसल्या आणि काही दलितांनी दंगल सुरू केली.' दंगल. पोलीस जेव्हा झोपडपट्टीत गेले आणि निर्दोष लोकांना त्यांनी मारलं तेव्हा हत्याकांड हा शब्द वापरला गेला नाही. तेव्हाच एका तरुण मुलाचं डोकं '.३०३'नं उडवलं गेलं.
***

माझ्या शरीराच्या, माझ्या आठवणीच्या मडक्यातून कापत गेलेलं १९९२ हे एक धारदार ब्लेड. मी जसजसा मोठा झालो, तसतसं ते सगळं स्पष्ट होऊ लागलं : १९८४चं शीख हत्याकांड, आसाममधला हिंसाचार, बिहारमधे आपल्या अधिकारांसाठी लढणाऱ्या दलितांची हत्याकांडं, तामिळनाडूत ४२ जणांना जाळण्यात आलेलं किल्वेनमणी हत्याकांड, काश्मीर... जिथं आजतागायत हिंसाचार सुरूच आहे आणि दांतेवाडामधे कधी आपल्या सुरक्षा दलांकडून किंवा कधी माओवाद्यांकडून सुरू असलेला हिंसाचार.

अत्याचार आणि हत्याकांडांच्या चष्म्यातूनच मला भारताची कल्पना करता आली. विरोधाच्या उबदार मांसामधून घुसणारं गरम लोखंड म्हणजे भारतीय लोकशाही. मशिनगननं शांत पाडलेली भारतीय लोकशाही.

मानवी सभ्यता (सिव्हिलायझेशन) म्हणजे पिळवणूक. विरोधाला पायदळी तुडवणं म्हणजे सभ्यता. 'का' असं विचारणाऱ्या भुकेल्या माणसाच्या गळ्यावर चाप बसवणं म्हणजे सभ्यता.

जंगलात राहणाऱ्या आणि देशातील सर्वांत एकाकी असल्याची भावना मनात असलेल्या एका माणसाची बेकायदेशीर हत्या म्हणजे भारतीय लोकशाही. तुम्ही जंगलात मेलायंत याचा कोणालाही पत्ता नाही आणि तुम्ही काय म्हणालात याचाही पत्ता नाही.

मानवी न्यायापर्यंत नेणारा अशक्यवत वाटावा असा खडतर प्रवास म्हणजे भारतीय लोकशाही. इथं सीमांच्या इतिहासांमधलं प्रेम हेच विनाअट प्रेम बनतं.

आणि तरीही उदारीकरणानंतर मध्यमवर्गातल्या उजव्या प्रवृत्तींनी उचल खाल्ली. नेहमीच कोणीतरी 'परका' असावा लागतो; ज्याचं भय वाटावं, ज्याला उद्ध्वस्त करावं, नष्ट करावं, असा शत्रू.

हिंसाचार आणि द्वेष यांचंच राजकारण केलेल्या ताकदवान व्यक्तींना बहुसंख्याकांची ताकद मिळते. दाबलेल्या जनतेचा वापर करून गुन्हे करणं, पददलितांचे नायक हिरावून घेणं, तथाकथित अस्मितेचा अभिमान पसरवणं, अशी काम या व्यक्ती करतात.

स्वतःला उच्च समजणाऱ्या माणसाची बरोबरी तुम्ही करू शकत नाही.
***

कोणे एके काळी, एक फ्रेंच अराजकतावादी म्हणाला होता की, संपत्ती ही चोरी असते. पण सध्याच्या काळात, ओळख हा खून आहे. अण्वास्त्रं बाळगून असलेल्या जगात चांगली कुंपणं चांगले शेजारी घडवू शकत नाही.

१९९२मध्ये मला असं सांगण्यात आलं की माझ्यावर अन्याय होतोय. पण मी तसं समजण्यास नकार दिला. कोणताही दक्षिण भारतीय माझी नोकरी चोरत नव्हता, माझ्या शहरात कोणीही साम्यवादी व्यवसायांची विल्हेवाट लावत नव्हता आणि माझ्या घरात कोणताही मुस्लीम शरीया कायदा लागू करण्याच्या प्रयत्नात नव्हता. कॉलेजात माझी जागा कोणीही दलित चोरत नव्हता. मी पुरुष असल्यामुळे किंवा प्रियकर असल्यामुळे एखाद्या स्त्रीची लैंगिकता मला धोकादायक ठरतेय असंही मला वाटत नव्हतं.

मी अन्यायग्रस्त होण्यास नकार दिला आणि त्यामुळे मी माझी ओळख शोधत राहिलो नाही. मी घाबरलो नाही आणि कोणत्याही अधिकारी व्यक्तीला प्रश्न विचारण्याची माझी क्षमता हाच माझा विशेषाधिकार होता. सरकारपासून, शाळेपर्यंत आणि अगदी माझ्या कुटुंबातील पूर्वग्रहांपर्यंत मी प्रश्न विचारायला लागलो. हे सगळं सुरू झालं जेव्हा मला मानवी यातना ही वैश्विक गोष्ट असल्याचं लक्षात आलं. आणि हे सगळं १९९२मध्ये सुरू झालं.

बंदुकीच्या पडून असलेल्या गोळीवरच्या फुलपाखरानं पंखांची उघडझाप करेदरम्यान शहराच्या स्मृती बदलत जातील आणि त्या दरम्यान ठाकरेसाहेब मी तुम्हाला निरोप देतोय, तुमच्या द्वेषभावनेनं मला प्रेमाची भावना शिकवली. गुडबाय ठाकरेसाहेब, तुमच्या द्वेषभावनेमुळे मला लाखो लोकांवर प्रेम करायची शिकवण मिळाली आणि ती माझ्यापासून तुम्ही हिरावून घेऊ शकणार नाही.
***

जुना भूतकाळ आणि नजीकचा भूतकाळ
गेली काही दशकं शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या सांताक्रूझ-पूर्व परिसरातल्या गोळीबार भागातल्या घर पाडण्याच्या कारवाईच्या नोंदी मी करतोय.

फसवणुकीच्या मार्गानं संमती घेऊन बिल्डर आपली घरं पाडत असल्याबद्दल इथले रहिवासी निदर्शनं करतायंत. प्रशासनाच्या या कारवाईदरम्यान अनेकदा लाठीमार, पोलीस तक्रारी अशा गोष्टी होत राहातात. सरकारपासून न्यायालयापर्यंत बहुतेकांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास नकार दिलेला आहे.

बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ७ डिसेंबर १९९२ रोजी पोलिसी हिंसाचार आणि इतर हिंसाचाराच्या घटनांमधे गोळीबारचा समावेश होता. लोकशाही हक्क संघटनेच्या अहवालानुसार १२ जणांचा सुरे खुपसून मृत्यू झाला, सात जण पोलीस गोळीबारात मृत पावले, आठ दुकानं जाळली गेली, चार गाड्या, सहा हातगाड्या आणि अनेक झोपड्या जळाल्या.

संघटनेच्या अहवालानुसार, 'व्ही. एन. देसाई रुग्णालयात एका पोलियो रुग्णाच्या पोटात गोळ्यांनी जखम केली होती. दुसऱ्या एका महिलेच्या डोक्यात गोळी घुसून तिने प्राण सोडला होता.'

'इथूनच ते आले नि मशिदीत जाणाऱ्यांवर हल्ला केला,' एक मुस्लीम रहिवासी सांगतो.
'तुझी आत्ता ज्या लोकांसोबत उठबस आहे त्याच लोकांशी आम्ही १९९२मधे लढलो', तो पुढं सांगतो.

'मग गोष्टी बदलल्या कधी?'

'हे सगळं सुरू झालं तेव्हा. बिल्डर लोकांनी आम्हाला एकत्र आणलंय.'

२४ नोव्हेंबर २०१०ला अलाउद्दीन अब्बास आणि मोहम्मद अफझल यांची घरं तोडण्यासाठी सरकारी अधिकारी पोलिसांबरोबर आले. त्यावेळी त्यांच्या संरक्षणासाठी जवळपास सर्व रहिवासी एकत्र जमले होते.

त्यांनी पोलिसांना एकाही विटेला स्पर्श करू दिला नाही. शेजाऱ्यांना त्यांनी एकटं सोडलं नाही. त्या अरुंद गल्ल्यांमधले हिंदू, ख्रिश्चन रहिवासी पोलिसांकडे नि अधिकाऱ्यांकडे बघून निदर्शनं करत होते.

पूर्वीचे शिवसेना समर्थक आणि गोळीबार परिसरातील बचावासाठी काम केलेले आबा तांडेल सांगतात, '१९९२मधल्या त्या दिवशी मी माझ्या कुटुंबीयांबरोबर घरी येत होतो. रेल्वे स्टेशनाबाहेरच ते एका माणसाला जाळत होते. आणि आम्ही गप्प राहून गल्लीत वळलो आणि घरी आलो.'

आज, गोळीबार परिसरात शिवसेनेचं अस्तित्त्व उरलेलं नाही. स्थानिक अपक्ष उमेदवाराचं मन वळवून गेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. रहिवाश्यांच्या चळवळीला पाठिंबा द्यायचं आश्वासन शिवसेनेनं दिलं होतं. पक्षातील काही मंडळी व्यक्तिगत पातळीवर 'आज कारवाई होणारेय, तयार राहा' अशी माहिती पुरवतात इतकंच, या शिवाय झोपडपट्टीवासियांच्या आंदोलनाला 'सामना'मधे क्वचित बातमी रूपात जागा मिळते, या पलीकडे मात्र काहीच नाही.
***

तरी या शहरानं आणि विशेषकरून इथल्या माणसांनी शिवसेनेची ताकद पाहिलेय. तोडफोडीची कारवाई सुरू झाली की जे लोक त्या विरोधात एकत्र येतात ते एकतर शेजारीपाजारी असतात किंवा इतर झोपडपट्ट्यांमधले याच मुद्द्याने त्रस्त झालेले रहिवासी असतात.

तिथे शिवसेना नसते. मराठी अस्मिता नसते. गर्दी नसते. न्यायासाठी लढणारे लोक असतात ते स्वतः तेच फक्त.

'१९९५मध्ये बाळासाहेबांनी आम्हाला घराचं स्वप्न दिलं होतं', शिवसेनेचे आणखी एक समर्थक दत्ता माने सांगत होते. बाळासाहेबांच्या अंत्यविधीवेळी ते शिवाजी पार्कला गेले नाहीत. त्या दिवशीही ते स्वतःचं काम करायला नालासोपाऱ्याला गेले.

१३ जुलै २०११ला बॉम्बस्फोटांच्या ठिकाणी माझ्याबरोबर दत्ता माने आले होते. आमचं काम संपलं तेव्हा दत्ता थकलेले जाणवत होते. आम्ही त्या ठिकाणापासून लांब आलो तसे ते वळून वळून पत्रकारांच्या गाड्यांकडे पाहात होते. तिथून दहा सेकंदांवर फूटपाथवर झोपलेल्यांकडे पाहून ते म्हणाले, 'यांचे फोटो कोण काढणारेय?'

ज्या माणसाचं घर पाडलं जाण्याची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर लटकतेय, तो माणूस त्याच्या पत्रकार मित्राला विचारतोय की माध्यमं घर नसलेल्यांबद्दल विचारच कसा काय करत नाहीत?

दुसऱ्या दिवशीच्या पेपरांमधे बॉम्बमधे छिन्नविछिन्न झालेल्या देहांचे फोटो पाहिले तेव्हा मला आठवले ते त्या दिवशी पहाटे तीन वाजता ऑपेरा हाऊस किंवा झवेरी बाजार परिसरात शांतपणे फूटपाथवर झोपलेले लोक.

दत्ता हा विश्वासघात झालेला माणूस ठरला.

दत्ता मानेंबरोबरच मी अंबुजवाडीला गेलो. मुंबईचा कचरा टाकला जातो त्या झोपडपट्ट्यांमधे गेलो. गोळीबारपासूनही खालच्या स्तरावरची ही ठिकाणं. गरीबांहून गरीब मंडळींची ठिकाणं. अनेक मुस्लीम मंडळी इथं राहातात आणि आपलं घर हटवलं जाण्याची भीती डोक्यावर घेऊन जगतात. त्यांनाही मी विचारतो, 'कोणी मुस्लीम संघटना इथं येऊन तुम्हाला पाठिंबा देते काय? रझा अकादमी किंवा असं कोणी? कोणी मौलाना?'

त्यांचं एकमुखानं दिलेलं उत्तर असतं : नाही.

बाळ ठाकरे     (हा फोटो रघू राय यांनी काढलेला, त्यामुळे सगळं आलयंच त्यात!)
***

जावेदचा हा लेख 'रेडिफ'वर प्रसिद्ध झाला होता, त्यानेच आपलं लक्ष तिथे वेधलं.

1 comment:

  1. आंधळी कोशिंबीर खेळताना डोळ्यावर पट्टी बांधून एकदा गिरकी घेतली की वाटतं तेच वाटतंय लेख वाचून. इक्बालजी तुमच्या आशय आणि समर्पकतेला दाद तरी कशी द्यावी? 'निंदकाचे घर असावे शेजारी' हे कित्ती सोप्पं वाक्यं आहे जे जे जसं जसं घडतंय त्यातुलनेन. असो.

    ReplyDelete