Wednesday 1 August 2012

पाऊस : थेंब

थेंबात कोसळलेला पाऊस   (फोटोंचे हक्क 'रेघे'कडे)
त्या ठिकाणी पाऊस नुसता कोसळतोच. 'पडणं' वगैरे गोष्टी त्याच्या लेखी फुटकळ आहेत. नुसता बेफाट कोसळतो पाऊस. बेफाट कोसळतो ते कोसळतोच, वर बोंबलतो. बोंबलतो ते बोंबलतोच, पण माणसांचे आवाज बंद होतात त्याच्यापुढे. उरलेल्या वेळात माणूस प्राण्याला तोड नाही. पण त्या वेळी माणसांचे आवाज त्या ठिकाणी तरी बंद झालेले असतात. हे काही खूष होऊनच लिहिलंय असं नाही, किंवा खूप काही वाईट म्हणून लिहिलंय असंही नाही. पण दिसतं ते तरी असं असतं, माणसांचे आवाज ऐकू येईनासे होतात असा तो बोंबलणारा पाऊस त्या ठिकाणी कोसळतो.

असा पाऊस थेंबाथेंबांमधून कोसळत राहातो. पाण्याचा पडदा नुसता सरसरत असतो इकडेतिकडे. छत्र्याबित्र्या, रेनकोटबिनकोट हे तर निरर्थकच ह्या पावसापुढे.

त्या ठिकाणी एक रस्ता आहे मोठाच्या मोठा. किती मोठा, तर खूप मोठा. असा खूप मोठा रस्ता आहे, पण गाड्यांपुढे रस्त्यांना काय किंमत असतेय ओ. तर पाऊस पडला नि फाफलला रस्ता. गाड्या तुंबल्या पाण्यासारख्या. वरतून पाऊस, डावीकडून पाऊस, उजवीकडून पाऊस, खालून वाहणारा पाऊस नि गाड्या एकामागे एक तुंबत गेलेल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तुफान लाल मातीचं पाणी वाहत निघालेलं.

गाड्यांचं तसं झाल्यामुळे झालं काय की, चालणाऱ्यांची किंमत वाढली, कारण ते काय भिजतभिजत त्यांचं त्यांचं चालत राहिले.

थेंबात दुनियेला उलटं फिरवणारा पाऊस
तिथून बाजूला गेलेला रस्ता एकटा गपगार. तिकडे गाड्या वळण्याची शक्यताच नव्हती कारण पुढे काही मुद्दाम जाण्यासारखं नव्हतं. म्हणजे नाही म्हणायला घरं आहेत, पण फार काही वेगळं नाहीये. निव्वळ रस्ता आहे, मोठा नाहीये, पण आहे, त्याचात्याचा आहे.

तर त्या रस्त्यावरही चालता येतं. तसं चालताना पाऊस जास्त दिसला. आणि अजून एक असं झालं की थेंबात कोसळलेला पाऊसही दिसायला लागला. चालताना जरा तो स्पष्ट दिसू शकतो. थेंबात कोसळलेल्या पावसात दुनिया उलटी फिरते. पाऊस मुद्दाम काही करत नाही, पण होतं ते असं. किंवा दिसतं ते तरी असं. थेंबातल्या पावसात आजूबाजूचं जग उलटं लटकतं.

थेंबात दुनियेला उलटं फिरवणाऱ्या त्या पावसासमोर आपण काय बोलणार? सुन्नच झालं सगळं.

सगळं गडद दाट होत गेलेलं. मळभ वर पसरलेलं. आजूबाजूला पाऊस पसरलेला. आणि समोर पन्हळीतून गेलेल्या जाड तारेत थांबलेला थेंब दिसला. तिथेही जग उलटच टांगलेलं. पण जग होतं, पाऊस होता आणि थेंबसुद्धा होता. थेंबाथेंबात पाऊस कोसळत होता आणि पसरत होता-
तारेवरची कसरत

1 comment:

  1. एका थेंबात जगाला उलटं करणारा पाऊस , आयला!

    ReplyDelete